नवी दिल्ली : 2006 मध्ये केरळमधील कोल्लम भागात एका महिलेची आणि तिच्या 17 दिवसांच्या जुळ्या मुलींची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी सीबीआयने 19 वर्षांनंतर दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर आता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवण्यात आले आहे. (With the help of AI the 19-year-old triple murder case in Kerala was solved)
मिळालेल्या माहितीनुसार, 2006 मध्ये स्थानिक पंचायत कार्यालयातून परत येत असताना, संतम्मा यांना त्यांची मुलगी रंजिनी आणि तिच्या 17 दिवसांच्या जुळ्या मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या होत्या. तिघांच्याही गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. संतम्मा यांच्या तक्रारीनंतर केरळ पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते पठाणकोट येथील लष्करी तळापर्यंत पोहचले. मात्र त्याआधी लष्करी तळावर तैनात असलेले दिविल आणि राजेश हे फरार झाले होते. यानंतर पोलिसांना दोन्ही आरोपींचा माग काढण्यात अपयश आले. मात्र आता केरळ पोलिसांनी 19 वर्षांनी या हत्याकांडाचे प्रकरण यशस्वीरित्या सोडवले आहे. एआय तंत्रज्ञानामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, एकाच गावातील रहिवासी असलेल्या रंजिनी आणि दिविल यांचे नातेसंबंध होते. रंजिनी जेव्हा गर्भवती राहिली, तेव्हा दिविलने तिच्यापासून स्वतःला दूर केले आणि तो पठाणकोटमध्ये राहू लागला. यानंतर रंजिनीने जानेवारी 2006 मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. तसेच दिविलला शिक्षा व्हावी यासाठी तिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राज्य महिला आयोगाने दिविलला त्याचे पितृत्व सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यास भाग पाडणारा आदेश दिला. यानंतर माजी सैनिक असलेल्या दिविल आणि त्याचा मित्र राजेश यांनी रंजिनीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राजेश याने अनिल कुमार असल्याचे भासवून रंजिनीशी मैत्री केली आणि तिला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली.
हेही वाचा – Meerut Crime : पती-पत्नीचे हायपाय बांधलेले, तर 3 मुलींचे बेडच्या आतमध्ये आढळले मृतदेह
एकेदिवशी आरोपी राजेशने रंजिनीच्या आईला काही सरकारी कामानिमित्त स्थानिक पंचायत कार्यालयात जाण्यास भाग पाडले आणि त्यानंतर दिविल आणि राजेशने मिळून रंजिनी आणि तिच्या दोन्ही मुलींची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी मृत रंजिनीची आई संतम्मा हिने तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलीस पठाणकोटमधील लष्करी छावणीतपर्यंत पोहचले. परंतु आरोपी आधीच पळून गेले होते.
असा लागला हत्येचा छडा
दरम्यान, केरळ पोलिसांच्या तांत्रिक गुप्तचर शाखेने (CBI) २०२३ मध्ये या प्रकरणांची पुनर्तपासणी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. रंजिनीच्या मारेकऱ्यांचा माग काढत असताना, त्यांनी दोन्ही आरोपींचे जुने फोटो वयाने वाढवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून 19 वर्षांनंतर आरोपी कसे दिसतील याचा अंदाज येईल. त्यानंतर आरोपींच्या फोटोंची तुलना सोशल मीडियावर असलेल्या इतर फोटोंशी करण्यात आली. सोशल मीडियावर शोध घेतल्यानंतर एका लग्नाच्या फोटोतील एक चेहरा 90 टक्के आरोपी राजेशशी मिळताजुळता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी राजेश हा पुद्दुचेरीमध्ये राहत होता आणि तो इंटीरियर डिझायनर म्हणून काम करत होता. यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी दिविललाही शोधून काढले. हत्येच्या 19 वर्षांनंतर सीबीआयने पुद्दुचेरीमधून 4 जानेवारी रोजी दोघांनाही अटक केली. विष्णू आणि प्रवीण कुमार अशी दोन्ही आरोपींनी ओळख निर्माण करून ते इंटीरियर डिझायनर म्हणून काम करत होते.
हेही वाचा – Pune Crime News : पुण्यात बीपीओ कंपनीत तरुणीवर धारदार चाकूने वार करणारा म्हणतो, मला तिला मारायचे नव्हते…