आपच्या आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

आप आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोयल हे दिल्लीतील रिठाला येथील आमदार आहेत.

Rape Victim
बलात्कार

आप आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोयल हे दिल्लीतील रिठाला येथील आमदार आहेत. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली होती. गोयल यांनी कार्यालयातच माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

सविस्तर माहिती अशी की

दिल्लीत राहणाऱ्या ४० वर्षांच्या महिलेने प्रशांत विहार पोलीस ठाण्यात मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या पतीचे २००८ साली निधन झाले असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, गोयल यांनी मला स्वत:च्या घरी भेटायला बोलावले. त्यांनी घरात माझ्यावर बलात्कार केला. यानंतर त्यांनी महिनाभरानंतर स्वत:च्या कार्यालयातही माझ्यावर बलात्कार केला. मी यासंदर्भात स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. यानंतर गोयल यांनी माझी माफी मागितल्याने मी त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दिली नाही, असे महिलेचे म्हणणे आहे.

तक्रार न देण्यासाठी टाकला दबाव

गेल्या महिन्यात गोयल यांच्या भावाने मला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले. मी पोलिसांकडे तक्रार देऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव देखील टाकण्यात आला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अखेर अत्याचार असह्य झाल्याने २५ फेब्रुवारी रोजी महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोयल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत बलात्काराचे आरोप फेटाळले आहे. मी महिलेला ओळखतो. पण बलात्काराचा आरोप खोटा आहे. संबंधित महिला माझी बदनामी करत आहे, असे गोयस यांनी सांगितले.