नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महिलेवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गुरुवारी उशिरा रात्री ही घटना घडली. पीडित महिलेचे वय साधारण २८ ते ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींपैकी एकाला पीडित महिला पूर्वीपासूनच ओळख होती.

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ कर्मचार्‍यांना अटक केली असून यातील २ मुख्य आरोपी हे रेल्वेचे कर्मचारी असल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गुरुवारी उशिरा रात्री ही घटना घडली. पीडित महिलेचे वय साधारण २८ ते ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींपैकी एकाला पीडित महिला पूर्वीपासूनच ओळख होती. गुरुवारी रात्री त्या आरोपीने पीडितेला काही तरी बहाणा करून रेल्वे स्थानकावर बोलावले. त्यानंतर आरोपी तिला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ आणि ९वरील एका खोलीत घेऊन गेला.

या खोलीचा वापर फुटओव्हर ब्रिजखालील इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि इतर कामासाठी होत होता. त्यानंतर मुख्य आरोपीने त्या खोलीत त्याच्या इतर ३ साथीदारांना बोलावले. यावेळी सर्व आरोपी नशेत होते. सर्वांनी पीडित महिलेला धमकावत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर पीडितेला घटनास्थळावर त्याच अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले. त्यानंतर पीडितेने मध्यरात्री २.३० वाजता पीसीआर कॉल केला. त्यानंतर तातडीने जीआरपी आणि रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. संपूर्ण घटना पीडितेकडून ऐकून घेत आरोपींचा तपास सुरू केला आणि ४ आरोपींना अटक केली.

राजधानी दिल्लीसारख्या शहरात चक्क रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडल्याने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे.