श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती : बायको-मुलाने काढला बापाचा काटा, सहा महिन्यांनी उलगडा

दिल्लीतील छतरपूर विभागात घडलेल्या श्रद्धा हत्याप्रकरणाशी हे प्रकरण मिळते-जुळते आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही हत्या मे महिन्यातच घडल्या आहेत. छतपूर विभागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या आफताबने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली होती. तसंच, तिच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडे करून जंगलात ठिकठिकाणी फेकण्यात आले होते. याप्रकऱणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

नवी दिल्ली – संपूर्ण देश श्रद्धा हत्याप्रकरणामुळे हादरलेला असताना आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. मे महिन्यात दिल्लीच्या पांडव नगर येथील रामलीला ग्राऊंड आणि नाल्यात मानवी अवयव सापडले होते. याप्रकरणी आता दिल्ली पोलीस गुन्हे विभागाने आरोपींना अटक केली आहे. अंजन दास असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून त्याची पत्नी पूनम आणि सावत्र मुलगा दीपक यांनी मिळून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.

अंजन दास याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याला विषारी औषध टाकून त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करून चाकूने त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. श्रद्धा हत्येप्रकरणाप्रमाणेच ही हत्या झाल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आरोपी पूनम हिनेही अनेक लग्न केले होते.

सहा महिने चौकशी

पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, ३० मे रोजी पोलिसांना हे मानवी शरीर सापडलं होतं. याप्रकरणात पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज सापडले होते. ज्याच्या आधारे पोलिसांनी सहा महिने कसून चौकशी केली. चौकशीअंती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आता पोलीस अंजन दासच्या अवयवाच्या तुकड्यांची डीएनए चाचणी करणार आहे.

सूनेवर वाईट नजर

सावत्र मुलगा दीपकच्या पत्नीवर अंजन दास याची वाईट नजर होती. दीपक हा पूनमच्या पहिल्या पतीचा मुलगा होता. आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याने दीपकचा अंजन दासवर प्रचंड राग होता.

श्रद्धा हत्याप्रकरणाशी साधर्म्य