ब्रिजभूषण सिंह यांना पदावरून हटवले; कुस्तीपटूंचे आंदोलन मागे

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कस्तुपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. याच्या चौकशीसाठी व सिंह यांच्या राजीनाम्यासाठी महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले. तीन दिवस हे आंदोलन सुरु होते. प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट या आंदोलनात पुढे होती.

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यात चौकशी अहवाल देणार आहे. तोपर्यंत हीच समिती कुस्ती संघटनेचे काम बघणार आहे. चौकशी होईपर्यंत सिंह यांनाही अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आले आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कस्तुपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. याच्या चौकशीसाठी व सिंह यांच्या राजीनाम्यासाठी महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले. तीन दिवस हे आंदोलन सुरु होते. प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट या आंदोलनात पुढे होती. या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांसोबत मंत्री ठाकूर यांची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.

या बैठकीनंतर मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. महिला कुस्तीपटूंच्या सर्व आरोपांची गंभीर चौकशी करून त्याचा अहवाल चार आठवड्यात सादर होईल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत सिंह हे पदापासून दूर राहतील. ते चौकशीला सहकार्य करतील.चौकशी होईपर्यंत कुस्ती महासंघाचे काम ही समिती करेल.

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, क्रीडा मंत्री ठाकूर यांनी निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

कुस्तीपटू महिलांवर बंद खोलीत अत्याचार होत होते. ज्या मुलींचे शोषण होत होते त्यांच्याकडे याचे पुरावेही आहेत, असा धक्कादायक आरोप कुस्तीपटू फोगटने केला आहे. सिंह हे महिला कुस्तीपटूंशी संपर्क साधतात. लखनऊमध्ये त्यांचे घर आहे. त्यामुळे महिला कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबिर तेथेच आयोजित केले जाते. जेणेकरून तेथे महिला कुस्तीपटूंचे सहज शोषण करता येते. अनेक महिला कुस्तीपटूंचे येथे शोषण झाले आहे, असा दावा फोगाटने केला आहे. त्यामुळे क्रीडा मंत्री ठाकूर यांनी नेमलेल्या चौकशीतून नेमके काय सत्य बाहेर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.