या मंदीत कल्पनेच्याही पलीकडे वेगाने काम करावं लागेल – जागतिक बँकेचा इशारा!

जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये अनेक विकसनशील देशांचा आर्थिक डोलारा ढासळू शकतो. शिवाय, जगातल्या गरीबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी या देशांनी विचारही केला नसेल, इतक्या वेगाने पावलं उचलावी लागतील, असा स्पष्ट इशारा वर्ल्ड बँकेकडून देण्यात आला आहे.

world bank

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना त्याचे आर्थिक परिणाम भोगावे लागणं अपरिहार्यच असल्याचं दिसून येत होतं.
आता त्यावर जगातल्या सर्वात महत्त्वाच्या अशा जागतिक बँकेने शिक्कामोर्तब केलं आहे. ‘कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. उत्पादनं, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होणं साहजिक आहे. आणि याचा सर्वाधिक फटका जगातल्या विकनसशील म्हणजेच विकासाच्या वाटेवर असलेल्या देशांना बसणार आहे. या देशांनी पुढचं अजून मोठं आर्थिक नुकसान आणि मंदीचं प्रचंड मोठं संकट टाळण्यासाठी याआधी कल्पना देखील केली नसेल, इतक्या वेगाने पावलं उचलणं गरजेचं आहे’, असा स्पष्ट इशारा जागतिक बँकेच्या (World Bank) पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रांताच्या उपाध्यक्षा व्हिक्टोरिया कवाक्वा यांनी दिला आहे. त्यामुळे भारत आणि आशियातल्या इतर देशांसाठी देखील हा धोक्याचा इशाराच मानला जात आहे.

चीनचा विकासदर ०.१ टक्क्यांवर येऊ शकतो!

जागतिक बँकेने सांगिल्याप्रमाणे या मंदीचा सर्वाधिक फटका पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रांतामध्ये येणाऱ्या देशांना बसणार आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा फटका बसला म्हणून या देशांच्या वार्षिक जीडीपी अर्थात विकास दराचे अंदाज २.१ टक्क्यांपर्यंत खाली आहेत. अनेक अविकसित देशांमध्ये तर जीडीपीचा दर वजा ०.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. २०१९मध्ये या प्रांतांमधल्या विकसनशील देशांचा जीडीपी ५.८ टक्क्यांच्या आसपास होता हे विशेष! चीनमध्ये तर २०१९मध्ये असलेल्या ६.१ टक्के जीडीपीवरून या वर्षी तो जास्तीत जास्त २.३ किंवा कमीत कमी थेट ०.१ टक्क्यांच्या पातळीवर उतरू शकतो असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.

इतर देशांशी सहकार्याने प्रकल्प राबवणं गरजेचं!

या देशांना आर्थिक मंदीचा फटका बसणं अपरिहार्य आहे. त्यासाठी या देशांनी तातडीने देशातली आरोग्य सेवा क्षमता वाढवण्यासाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी, दुर्बल घटकांना सबसिडी देण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे, असा सल्ला देखील जागतिक बँकेने दिला आहे. याशिवाय, या भागातल्या देशांनी इतर देशांशी सहकार्याच्या प्रकल्पांवर भर द्यायला हवा. यातून उत्पादन, सेवा आणि पुरवठा वाढून आर्थिक स्थैर्य येण्यासाठी मदत होईल, असं जागतिक बँकेने सांगितलं आहे.

गरीबांची संख्या वाढणार!

कोरोना साथीचा सर्वाधिक फटका जगातल्या बहुतेक सर्वच गरीबांना बसणार आहे. जर आर्थिक स्थिती अशीच बिघडत राहिली, तर साथ आटोक्यात आल्यानंतर जगात तब्बल १ कोटी १० लाख नव्या गरीबांची भर पडली असेल, असं देखील जागतिक बँकेनं सांगितलं आहे.


CoronaVirus- कोरोना संदर्भात एप्रिल फुल मेसेज व्हायरल कराल, तर शिक्षा होईल!