चंदीगड : विश्वविजेती बॉक्सर स्वीटी बुरा आणि भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुड्डा यांचा संसार मोडण्याच्या वाटेवर आहे. कारण स्वीटी बुरा हिने पती दीपकवर 1 कोटी रुपये आणि फॉर्च्युनर मागितल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे दीपक हुड्डाने सुद्धा पत्नी स्वीटी आणि तिच्या कुटुंबीयांवर त्याची संपत्ती हडप करण्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता या दोघांनीही एकमेकांविरोधात रोहतक आणि हिसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वीटी बूराने या प्रकरणी कोर्टात नुकसान भरपाई आणि घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. (World champion boxer Sweety Boora harassed for dowry by husband Deepak Hooda)
स्वीटी बुरा आणि दीपक हुड्डा यांच्या या प्रकरणाबाबत हिसारच्या पोलीस अधिक्षकांकडून माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणी कबड्डीपटू दीपक हुड्डाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, तो आला नाही. तर स्वीटी बुरा हिने हिसार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दीपक आणि स्वीटीचा 7 जुलै 2022 मध्ये झासा होता. लग्नात स्वीटीच्या कुटुंबीयांनी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला होता. परंतु, आता 4 दिवसांपूर्वी दीपक आणि त्याच्या बहिणीने फॉर्च्युनर कार मागितली आणि तिच्यावर खेळ सोडण्यासाठीचा दबाव आणला, असा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा… Supreme Court : अल्पवयीन मुलीची साक्ष वैध, हत्या प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
तसेच, 2024 मध्ये दीपक हुड्डाने मेहम विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुद्धा स्वीटीला तिच्या कुटुंबीयांकडून 1 कोटी रुपये आणण्यास सांगितले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये स्वीटीला मारहाण करून घरातून हकलून देण्यात आले. ज्यानंतर स्वीटीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आणि 50 लाख रुपये भरपाई आणि दीड लाख रुपये महिन्याच्या खर्चाची सुद्धा मागणी केली आहे, असे स्वीटी बुराने सांगितले आहे. तर, दीपक हुड्डानेही पत्नी स्वीटी बुराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्वीटी बूराचे आई वडील व्याजावर पैसे मागण्याच्या बहाणे मला फसवत राहिले. हिसारमध्ये त्यांनी प्लॉट खरेदी केले होते, असे आरोप दीपककडून करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.