७ एप्रिल हा दिवस आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण असतो. दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जागतिक स्तरावर भयानक रुप दाखवले. जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने जगात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान आज आपण जागतिक आरोग्य दिवस ७ एप्रिलला का साजरा केला जातो? याचा इतिहास आणि महत्त्व काय? हे आपण जाणून घेणार आहोत.
जागतिक आरोग्य दिवसाचा इतिहास
१९४८मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. याच्या दोन वर्षानंतर १९५० मध्ये जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा पुढाकार घेतला. अशा प्रकारे जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली.
जागतिक आरोग्य दिवस ७ एप्रिलला का साजरा केला जातो?
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिलला झाली होती. त्यामुळे डब्ल्यूएचओच्या स्थापना दिनानिमित्ताने जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. १९५० साली पहिल्यांदा डब्ल्यूएचओशी जोडलेल्या सर्व देशांनी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला होता. त्यानंतर जसे जसे इतर देश डब्ल्यूएचओसोबत आले, ते देखील ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा करू लागले.
जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याचा उद्देश
जगभरातील सर्व देशांना समान आरोग्य सुविधांचा प्रसार होण्यासाठी, लोकांना जागरुक करण्यासाठी, आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी, जागतिक आरोग्यासंबंधित समस्यांवर विचार करण्यासाठी आणि त्या विचारांवर काम करण्यासाठी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. या दिवशी आरोग्य सेवा, सुविधा आणि देखभाल संबंधित विषयांवर जागृकता पसरवण्याची मोहिम राबवली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. ही संघटना जगभरात चांगल्या आरोग्यासाठी काम करते. डब्ल्यूएचओ संयुक्त राष्ट्रासोबत एजेंसी, सरकारी आरोग्य प्रशासन, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक गट आणि इतर संस्थांच्या सहकार्याने कार्य करते. देशातील सरकारच्या विनंतीनुसार आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी मदत करते. व्यावसायिक गट आणि तज्ज्ञांच्या मदतीला प्रोत्साहन देते.
जागतिक आरोग्य दिवस २०२२ची थीम
या वर्षीय जागतिक आरोग्य दिवस २०२२ची थीम ‘Our Planet, Our Health’ आहे. या वर्षाच्या थीमचा उद्देश आपल्या ग्रहावर राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे आहे. भारत जागतिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने ‘योग अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. हे आयुष मंत्रालयाद्वारे आयोजित केले जात आहे.
हेही वाचा – Weight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश