घरदेश-विदेशजगातील सर्वात लांब 'एमव्ही गंगाविलास' रिव्हर क्रूझचा शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

जगातील सर्वात लांब ‘एमव्ही गंगाविलास’ रिव्हर क्रूझचा शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (13 जानेवारी 2023) वाराणसी येथे ‘एमव्ही गंगाविलास’ या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याद्वारे भारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरू होईल, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले.

देशातील सर्वोत्कृष्ट सेवा जगासमोर आणण्यासाठी ‘एमव्ही गंगाविलास क्रूझ’ची निर्मिती करण्यात आली आहे. ही लक्झरी क्रूझ भारतातील 5 राज्ये आणि बांगलादेशमधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल. आपल्या 51 दिवसांच्या प्रवासात ही रिव्हर क्रूझ जागतिक वारसास्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदीचे घाट यासोबतच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटनस्थळांना भेटी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ही क्रूझ वाराणसीतील प्रसिद्ध ‘गंगा आरती’पासून ते बौद्ध धर्मासाठी अत्यंत श्रद्धेचे ठिकाण असलेल्या सारनाथचे दर्शन घडवेल. क्रूझ या प्रवासात मायोंग (गुवाहाटीपासून जवळ असणारे मायोंग हे गाव प्राचीन काळापासून काळ्या जादूसाठी ओळखले जाते) आणि मजुली या सर्वात मोठ्या बेटाला भेट देईल. सोबतच आसाममधील वैष्णव पंथीयांचे सांस्कृतिक केंद्रालाही भेट दिली जाईल. बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठाला देखील प्रवासी भेट देतील. या भेटीमुळे प्रवाशांना भारताचा अध्यात्म आणि ज्ञानाचा समृद्ध वारसा जवळून पाहता येईल. समुद्रपर्यटन आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या उपसागरातील सुंदरबनच्या जैवविविधतेने नटलेल्या समृद्ध जागतिक वारसा स्थळांवरून तसेच एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही ही क्रूझ प्रवास करेल.

देशात रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्याची गरज सोनोवाल यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राच्या पर्यटन विकासामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

- Advertisement -

अशी आहे क्रूझ
‘एमव्ही गंगाविलास क्रूझ’ 62 मीटर लांब, 12 मीटर रुंद आणि 1.4 मीटरच्या ड्राफ्टसह लक्झरी प्रवासाचा आनंद देणारी आहे. यात तीन डेक आणि 36 पर्यटक क्षमतेचे 18 सुट्स आहेत. या सुट्समध्ये लक्झरी सोयीसुविधा आहेत. एमव्ही गंगाविलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवास करतील. दिब्रुगडमध्ये एमव्ही गंगाविलासच्या आगमनाची अपेक्षित तारीख 1 मार्च 2023 आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -