३६९ फूट उंच, ३० हजार टन वजन; जगातील सर्वांत उंच शंकराची भव्य मूर्ती पाहिली का?

bhagwan shankar

नवी दिल्ली – राजस्थानमधील राजसमंद येथील जगातील सर्वांत उंच शंकराच्या मूर्तीचा ( World’s Tallest Lord Shiva Statue) लोकार्पण सोहळा आजपासून सुरू झाला असून ६ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या भव्य मूर्तीचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या हस्ते होणार आहे. तसंच, यासाठी प्रसिद्ध कथावाचक मुरारी बापूसुद्धा उपस्थित राहणार आहेत. या नऊ दिवसांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे.

१ लाख ३७ हजार ७०० स्क्वेअर फुटावर बांधलेली शिवाची 369 फूट उंचीची मूर्ती ध्यानमुद्रीत आहे. जगातील सर्वात उंच अशी ही मूर्ती आहे. हा ३६९ फूट उंच पुतळा जगातील एकमेव असा पुतळा असेल, ज्यामध्ये भक्तांसाठी लिफ्ट, जिने आणि हॉल बांधण्यात आला आहे. या मूर्तीला विश्वास स्वरुपम (Vishwas Swaroopam) असं नाव देण्यात आलं आहे.

जगातील ही सर्वांत मोठी भगवान शंकराच्या मूर्तीवर आतून वरच्या भागात जाण्यासाठी ४ लिफ्ट आणि तीन पायऱ्या आहेत. ही भव्य मूर्ती घडवण्यासाठी कारागिरांना तब्बल १० वर्षे लागली. तसंच, ३०० कामगार या मूर्तीसाठी काम करत होते. यासाठी तीन हजार टन स्टील आणि लोखंड आणि २.५ लाख क्युबिक टन काँक्रिट आणि रेतीचा वापर करण्यात आला आहे.


उदयपूर शहरापासून जवळपास ४५ किमी अंतरावर ही मूर्ती आहे. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारे शिल्पकार नरेश कुमावत यांनी सांगितले की, राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील ताट पदम उपवन येथील मदन पालीवाल यांच्या माध्यमातून त्यांना महादेवाची सर्वात उंच मूर्ती तयार करण्याची संधी मिळाली, जी आता पूर्णपणे तयार आहे.

मूर्ती बनवणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे. त्यांचं काम जवळपास ६५ देशांमध्ये चालू आहे. जपान, कॅनाडा, अमेरिकासहीत विविध देशात या कुटुंबाकडून मूर्ती घडवल्या जातात. मदन पालीवाल यांनी त्यांना एक स्ट्रक्चर तयार करून दिलं होतं, ज्यानुसार त्यांना मूर्ती अपेक्षित होती.