Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Wrestler Protest : देशातील खेळाडूंची हीच का किंमत? महिला खेळाडू लैंगिक शोषणावर...

Wrestler Protest : देशातील खेळाडूंची हीच का किंमत? महिला खेळाडू लैंगिक शोषणावर मोदींच्या मौनाने कुस्तीपटू संतप्त

Subscribe

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन आता चिघळले आहे. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे म्हणजेच डब्लूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन आता चिघळले आहे. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे म्हणजेच डब्लूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 23 एप्रिलला सुरू झालेले हे आंदोलन आजही सुरू आहे. रविवारी (ता. 28 मे) दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या कुस्तीपटूंनी मेहनतीने कमावलेली पदकं गंगेत विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला. पण देशात इतकं काही सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी ‘ब्र’ पण काढलेला नाही. त्यामुळे दर महिन्याच्या अखेरीस येऊन ‘मन की बात’ करणारे मोदी या प्रकरणात शांत का आहेत? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. तसेच देशासाठी मोठ्या मेहनतीने सुवर्ण पदके कमावणाऱ्या खेळाडूंची आज जर का ही अवस्था असेल तर उद्या नक्कीच क्रीडा क्षेत्रात करिअर करताना अनेक लोक विचार करतील, हे मात्र नक्की.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनावर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अक्षरी काढलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील प्रभावी नेता म्हणून ओळखले जाते. पण या प्रकरणावर त्यांची असलेले चुप्पी मात्र अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करत आहेत. एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या घोषणा देण्यात येतात.. महिला सन्मानाच्या गोष्टी करण्यात येतात. पण गेल्या महिन्याभरापासून जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंना कोणीही न्याय देऊ शकलेले नाही. उलट या मुलींचे अनेकांकडून मनोबल खच्चीकरण करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे मोदींनी या प्रश्नी अद्यापही कोणतीही कारवाई का केलेली नाही? आज या कुस्तीपटूंनी आपले मेडल गंगेत वाहण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा मोदी नेमके शांत का? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.

- Advertisement -

जेव्हा या मुलींनी देशासाठी पदके आणली तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरपूर्वक चहाला बोलावले होते. या माझ्या घरातील मुली आहेत, असे म्हणत त्यांच्याकडून कौतुक करण्यात आले होते. पण आता गेले कित्येक महिने त्या महासंघाच्या अध्यक्षाकडून लैंगिक शोषण झाले म्हणून लेखी नोंद करत आहेत. आपले कौतुक करणाऱ्या मोदींकडून त्या न्यायाची अपेक्षा करीत आहेत. चहाला बोलावणारे मोदी त्यांना साधे चर्चेला बोलावत नाहीत किंवा त्यावर भाष्यही करायचे टाळत असल्याने या कुस्तीपटूंनी न्यायाची मागणी कोणाकडे करायची, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

मुलींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पीडितांची बाजू ऐकूण घेणे अपेक्षित होते. भाजपचे सरकार येण्याआधी महिला सुरक्षित नसल्याचा कांगावा करणाऱ्या इराणी यावर अवाक्षरही बोलत नाहीत. हे सगळे पाहता भाजपच्या राज्यातील हाच का महिलांचा सन्मान, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.

- Advertisement -

बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून या वर्षी जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पूनिया, रवी दहिया आदींच्या नेतृत्वात जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्यास सुरूवात केली होती. ज्यानंतर या देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. ज्यानंतर केंद्रातील सरकारने या आंदोलक कुस्तीपटूंसोबत चर्चा करण्यास सुरूवात केली. पण आंदोलक कुस्तीपटू चर्चेच्या माध्यमातून पण ऐकायला तयार नसल्याने अखेरीस क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. बॉक्सर मेरी कोम यांच्या अध्यक्षतेमध्ये ही सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. जी अद्यापही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या समितीतील सदस्य कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, की नाही याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

मेरी कोम अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून महिनाभरात अहवाल देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. ज्यानंतर या प्रकरणी सुरू असलेले जानेवारी महिन्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले होते. पण महत्त्वाची बाब म्हणजे विनेश फोगाट हिने ऑक्टोबर 2021मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ब्रृजमोहनच्या काळ्या कृत्यांबाबत तिने मोदींना माहिती दिली. पण दीड वर्ष उलटूनही मोदींनी या प्रकरणी कोणतीच कारवाई केली नाही.

जानेवारी महिन्यामध्ये जी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने साडेतीन महिने होऊनही कोणताही अहवाल सादर केला नाही आणि आरोपीवर कारवाई केली नाही. ज्यानंतर न्याय मिळत नाही म्हणून सगळेच नामवंत कुस्तीपटू पुन्हा 23 एप्रिलपासून ‘जंतरमंतर’वर धरणे देऊन बसले आहेत. गंभीर आरोप असूनही पोलीस तक्रार नोंदवायला तयार नव्हते. शेवटी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ब्रिजभूषण यांच्यावर ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार बृजभूषण सिंह यांना अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात त्वरित अटक करणे अनिवार्य होते. परंतु पोलिसांनी ते धाडस दाखवले नाही. ब्रृजभूषण काही वाहिन्यांवर मुलाखती देत आहेत. ‘गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा म्हणत असतील तर मला अटक करा’, असे खुलेआम सांगत फिरत आहेत. याचा काय अर्थ घ्यायचा? असा प्रश्न आता यामुळे निर्माण झाला आहे. तर आजही परिस्थिती उद्भवून देखील कारवाई का करण्यात येत नाही, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सहा वेळा खासदार आणि एक दशकापेक्षा अधिक काळ कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले 66 वर्षीय बृजभूषण सिंह उत्तरप्रदेशातील कैसरगंज लोकसभा क्षेत्रात बाहुबली म्हणूनही ओळखले जातात. स्वत: पैलवान असलेल्या बृजभूषण यांनी उत्तरप्रदेशात अनेक व्यायामशाळा उभारल्या आहेत. तरुणांना मैदानात उतरवले. त्यांच्या काळात भारताला जे यश मिळाले ते त्यांच्या डोक्यात शिरले, असेही अनेकांकडून बोलले जात आहे. ज्या ‘जंतरमंतर’वर आंदोलन सुरू आहे, तिथून शंभर मीटर अंतरावर ब्रृजभूषणचा शासकीय बंगला आहे. गेले महिनाभर हे आंदोलन सुरू आहे. परंतु या बंगल्यात लोकांची ये-जा नियमीत सुरू आहे. त्याशिवाय ते प्रसार माध्यमांसमोर येऊन मुलाखती देखील देत आहेत.

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी तर बृजभूषण यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचे मोठे फलक जंतरमंतरवर झळकवले आहेत. खुनापासून तर गॅंगस्टर अ‍ॅक्टपर्यंतचे गंभीर गुन्हे या फलकावर पाहायला मिळाले आहेत. सरकार गप्प आहे. त्यांना अटक केल्यास उत्तरप्रदेशात भाजपला धक्का बसू शकतो,असे पक्षाला बहुधा वाटते, त्यामुळे सरकार किंवा भाजपचा कोणताही राष्ट्रीय नेता या प्रकरणी काहीच बोलायला तयार नाही, असे बोलले जात आहे.

शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनास डागाळण्याचे दिल्ली पोलिसांकडून प्रयत्न देखील करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा त्यांच्यासोबत तर क्रूरतेची वागणूक देखील करण्यात आली. ज्यावेळी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू होते, त्यावेळी त्या ठिकाणी तीन दिवस पाऊस आला. या पावसामुळे आंदोलकांच्या फुटपाथवर असलेल्या गाद्या ओल्या झाल्या होत्या. तेव्हा मुलींची गैरसोय होऊ नये, म्हणून ‘आम आदमी पार्टी’चे आमदार सोमनाथ भारती यांनी फोल्डिंग बेड आणले. ते देखील पोलिसांनी अडवले व बेडची परवानगी नाही म्हणत आमदार भारतीला अटक केली. यात त्यांचा नेमका गुन्हा काय? असे त्यावेळी विचारण्यात आले. त्यावेळी आंदोलनाच्या ठिकाणचे पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले आणि वीजही बंद करण्यात आली होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल आंदोलकांना भेटायला आल्या, तर त्यांना भेटू दिले नाही. सहा महिला पोलिसांनी त्यांना फरफटत नेत गाडीत कोंबले.

काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुडा समर्थन द्यायला आले होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री एक पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोप करण्यात आला. त्याने महिला कुस्तीपटुंची छेड काढली. संगीता फोगाट हिचे केस धरून ओढले. त्यामुळे सगळे पोलीस एक झाले आणि आंदोलकांना कोणत्याही सुविधा मिळू नये याचे प्रयत्न त्यांच्याकडून अनेकदा केले गेले. त्यावेळी साक्षी मलीक, विनेश फोगाट यांना धाय मोकलून रडताना सुद्धा देशाने पाहिले आहे. पदक मिळाले म्हणून आनंदाश्रू वाहणारे हे खेळाडू आणि आज स्वतःला न्याय मिळावा, म्हणून रडणारे हे खेळाडू यामध्ये किती अंतर आहे, हे विचार करण्यासारखे आहे.

या कुस्तीपटूंच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या महिला पत्रकार साक्षी जोशी यांना सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना भेटण्यास मज्जाव केला होता. साक्षीने कारण विचारले तर त्यांचा मोबाईल आणि कॅमेरा हिसकावून घेतण्यात आला. महिला पोलिसांनी त्यांचे केस ओढले होते. त्यांचा पायजामा फाडला आणि व्हॅनमध्ये कोंबून मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला नेले होते. त्यानंतर रात्री दीड वाजता साक्षी जोशी यांना सोडत पोलीस स्टेशन बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे लोकशाहीतील चौथ्या स्तंभाला करण्यात आलेला विरोध? हे कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येतोय की यामागे आणखी कोणते कारण आहे, हे स्पष्ट होणेही तितकेच गरजेचे आहे.

- Advertisment -