Coronavirus: विषाणू मानवाला उत्पन्न करता येत नाही; वुहान प्रयोगशाळेचे अमेरिकेला उत्तर

wuhan virology lab
वुहान विषाणू प्रयोगशाळा

चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोना व्हायरसचा प्रसार जगभर झाला असा आरोप जगभरातून करण्यात येत होता. तसेच अमेरिकेनेही कोरोना व्हायरसचे पाप चीनचे असल्याचे म्हटले होते. तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत चीनने पारदर्शकता दाखवली नसल्याचाही आरोप अनेक देश करत आहेत. त्यानंतर आता वुहानमधील विषाणू विज्ञान प्रयोगशाळेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला असून आतापर्यंत २३ लाख लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले असून १ लाख ६० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले होते की, कोरोना व्हायरस चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून निघून जगभरात पसरला का? याचा आम्ही तपास करणार आहोत. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात जेव्हा पहिल्यांदा वुहान येथे कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले होते, तेव्हा हा व्हायरस वुहानच्या मटण मार्केटमधून संक्रमित झाला असावा, असा कयास बांधण्यात येत होता. विशेष म्हणजे या मटण मार्केटच्या शेजारीच चीनची वुहान विषाणू विज्ञान संस्थेची (WIV) प्रयोगशाळा आहे.

डब्लूआयव्ही या प्रयोगशाळेने फेब्रुवारी महिन्यात देखील एका पत्रकाद्वारे आपल्यावरील आरोप फेटाळले होते. कोविड १९ चा स्त्रोत ही वुहानची विषाणू प्रयोगशाळा असल्याचा आरोप प्रयोगशाळेतील प्रमुख युआन झिमिंग यांनी फेटाळून लावला होता. ते म्हणाले की, आमच्या प्रयोगशाळेत विषाणूंवर संशोधन केले जाते, “ही खरी गोष्ट आहे. विषाणू कसे हाताळायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. मात्र कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून पसरला असे म्हणणे चुकीचे आहे.”

आमच्या प्रयोगशाळेत प्रत्येक संशोधनासाठी आचारसंहिता आखून दिलेली आहे. लोकांना जेव्हा दोषारोप करण्यासाठी कुणीही भेटत नाही, तेव्हा असे बिनबुडाचे आरोप केले जातात. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपाबाबत बोलताना युआन म्हणाले की, अमेरिकेचे आरोप अतिशय दुर्दैवी आहेत. तथ्य न तपासता जगभरातील लोकांना संभ्रमित केले जात आहे. कोविड १९ हा विषाणून मानवनिर्मित असू शकत नाही. तसेच असे कोणतेही पुरावे सध्या आपल्यासमोर नाहीत, ज्याने हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होईल.