लखनऊ – महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले आहे. विधानसभेतून त्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशापर्यंत उमटले आहेत. औरंगजेबाच्या मुद्यावरुन उत्तर प्रदेश विधानसभेतही राजकारण पेटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या पाचव्या दिवशी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमींवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पार्टी औरंगजेबाला आदर्श मानत आहे. औरंगजेबाच्या पित्याने शाहजहांने त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे की, खुदा करे की ऐसा कमबख्त किसी को पैदा न हो, औरंगजेबाने त्याच्या पित्याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले होते. अशा औरंगजेबाजे गुणगाण करणाऱ्या कमबख्तला पक्षातूनही बरखास्त केले पाहिजे. त्यांना यूपीला पाठवा त्यांच्यावर आम्ही उपचार करु. त्यांना भारतातही राहण्याचा अधिकार दिला पाहिजे का? समाजवादी पार्टीने यावर उत्तर दिले पाहिजे, अबू आझमीला पक्षातूनही काढून टाकले पाहिजे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजावादी पक्षाच्या नेत्यांना उद्देशून म्हटले की, माझ्या समाजवादी मित्रांना विचारू इच्छितो की भारताच्या वैभावशाली परंपरेचा तुम्हाला गौरव नाही का. किमान राम मनोहर लोहिया यांचा तरी मान राखला पाहिजे. त्यांनी भारतीय एकतेचे तीन आधार असल्याचे सांगितले होते, भगवान राम, शीव आणि भगवान कृष्ण. मात्र आजचे समाजवादी हे लोहियांच्या विचारांपासून दूर गेले आहेत. भारताच्या गौरवाला ते मानात नाहीत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
हेही वाचा : Abu Azmi : औरंगजेब उत्तम प्रशासक, आबू आझमींकडून उदात्तीकरण; एकनाथ शिंदे काय म्हणाले…
निलंबनाच्या कारवाईला अखिलेश यादवांनी म्हटले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला
अबू आझमी यांच्या निलंबनाचा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निषेध केला आहे. अखिलेश यादव यांनी समाज माध्यमातून महाराष्ट्र सरकारची कारवाई ही एका विचारधारेतून झालेली कारवाई असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, निलंबनाची कारवाई जर एखाद्या विचारधारेने प्रभावित होऊन केली जात असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामी यात काय अंतर राहिले, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की, काही लोकांना वाटते की ‘निलंबन’ केले म्हणजे सत्याचा आवाज दाबला जाईल, तर हे त्यांचे नकारात्मक विचार आणि बालिशपणा आहे.
हेही वाचा : Abu Azmi : औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले, अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी विधान सभेतून निलंबित