युवकाला लघवी पाजून मारहाण; नैराश्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली

vikas sharma suicide
आत्महत्या केलेला युवक

मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एका १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या आधी त्याने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तसेच एक चिठ्ठी लिहून आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. या युवकाने कथन केलेला प्रसंग धक्कादायक असा म्हणावा लागेल. आपण अजूनही २१ शतकातच आहोत ना? यावर विश्वास ठेवाव की नाही. हे यावरुन दिसून येते.

शिवपुरी जिल्ह्यातल्या साजोर नामक गावात बुधवारी विकास शर्मा नावाचा एका युवक आपल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात एक व्हिडिओ आढळला. ज्यामध्ये त्याने त्याच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितले आहे. “विकासच्या घराजवळ असलेल्या एका मंदिरात तो जल अर्पण करण्यासाठी गेला होता. त्यासाठी त्याने एक तांब्या घेऊन मंदिरासमोर असलेल्या हापश्यावर गेला. पाणी हापसत असताना पाण्याचे काही थेंब बाजूलाच बसलेल्या मनोज कोळी, तारावती कोळी आणि प्रियंका कोळी यांच्या भांड्यावर उडाले. त्यावरुन त्या सर्वांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर कोळी कुटुंबाने विकासला जबर मारहाण करत त्याच्याच तांब्यात त्याला लघवी पाजली.”

vikas sharma suicide letter

या घटनेनंतर विकास नैराश्यग्रस्त झाला होता. घरी गेल्यानंतर त्याने सुसाईड नोट लिहीली. त्यानंतर आपला व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याने आत्महत्या केली. या व्हिडिओत त्याने आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वरील तिघांची नावे घेतली आहेत. माझ्यावर झालेल्या प्रसंगामुळे मला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे, असे विकासने लिहून ठेवले आहे.

विकासच्या आत्महत्येचा पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कोळी कुटुंबाला अटक केली. आत्महत्येक कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन तिघांवर ३०६ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.