चौथ्या मजल्यावरुन पडून ‘झी’ राजस्थानच्या न्यूज अँकरचा मृत्यू

पोलिसांनी राधिका ज्या ठिकाणावरुन खाली पडली त्या ठिकाणाची तपासणी केली तसंच राधिकाच्या रुमची तपासणी केली असता तिच्या रुममधून दारुच्या बॉटल जप्त केल्या.

zee news rajasthan anchor radhika kaushik
झी न्यूज राजस्थान अँकर राधिका कौशिक

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका न्यूज अँकरचा मृत्यू झाला आहे. राधिका कौशिक असं या न्यूज अँकरचे नाव असून ती झी राजस्थान या वृत्तवाहिनीमध्ये कामाला होती. राधिका तिचा सहकारी राहुल अवस्थी यांच्यासोबत नौएडाच्या सेक्टर – ७७ मील अंतरीक्ष फॉरेस्ट अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होती. शुक्रवारी पहाटे त्यांची पार्टी सुरु होती. राधिकाचा सहकारी राहुल अवस्थी हा देखील न्यूज अँकर आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता राधिकाचा अचानक चौथ्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला.

घरात सापडल्या दारुच्या बॉटल

बिल्डिंगच्या वॉचमनने या घटनेसंदर्भात पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राधिकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी राधिका ज्या ठिकाणावरुन खाली पडली त्या ठिकाणाची तपासणी केली तसंच राधिकाच्या रुमची तपासणी केली असता तिच्या रुममधून दारुच्या बॉटल जप्त केल्या.

दोघांमध्ये झाले होते भांडण

प्राथमिक तपासणीमधून हे समोर आले आहे की, राधिका आणि राहुल अवस्थी दोघेही दारुच्या नशेत होते. दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. त्यानंतर राहुल टॉयलेटमध्ये निघून गेला असता राधिका चौथ्या मजल्यावरुन खाली पडली अशी माहिती राहुलने पोलिसांना दिली. राधिकाने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली आहे याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

राहुल अवस्थीची चौकशी सुरु

राधिका कौशिक मूळची जयपूरची असून ती मागच्या चार महिन्यांपासून नोएडामध्ये राहत होती. राधिकासह आणखी दोन तरुणी या फ्लॅटमध्ये राहत होत्या. पण राधिकाच्या मृत्यूच्यावेळी त्या घरामध्ये नव्हत्या. दोन्ही तरुणी कॉलसेंटरमध्ये काम करतात आणि त्यांची नाइट शिफ्ट होती. याप्रकरणी पोलिसांकडून राहुल अवस्थीची चौकशी सुरु आहे. राधिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.