घरआली दिवाळी २०१८दिवाळीचा पाडवा दागिन्यांनी सजवा

दिवाळीचा पाडवा दागिन्यांनी सजवा

Subscribe

दिवाळी म्हटलं की रोषणाई, खाण्यापिण्याची, कपडेलत्त्यांची रेलचेल तर असतेच. पण त्याशिवाय दिवाळीमध्ये दागिन्यांच्या खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व असते. दिवाळीचा पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि यादिवशी सोने खरेदी किंवा दागिन्यांची खरेदी करणे शुभ समजले जाते. त्यामुळे दिवाळीच्या आधीपासूनच एक आठवडा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी दागिन्यांची खरेदी करण्यात येते. पण प्रत्येकालाच वेगळे आणि हटके दिसायला आणि आपण जो दागिना घालणार आहोत तोदेखील हटके असायला हवा असे वाटत असते. सगळ्यांपेक्षा आपण इतर लोकांमध्ये कसे वेगळे उठून दिसू याकडे बर्‍याचदा आपला कल असतो. त्यामुळे कपड्यांना साजेसे दागिनेही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील दागिन्यांच्या बाजारामध्ये काही हटके दागिने आपल्याला दिसत आहेत.

चांद – बाली – हैदराबादच्या मुघल शासकांचा आणि निजामांचा प्रसिद्ध असा कानातील दागिना म्हणजे चांदबाली. चांदबालीमध्ये वेगवेगळे डिझाईन्स असतात. पण सध्याचा हा ट्रेंड आहे. चंद्रकोर आणि बाली अर्थात याला जोडलेल्या रिंगमुळे या चांदबाली असे नाव आहे. मात्र पारंपरिक असो वा आधुनिक दोन्ही प्रकारच्या लुकवर चांदबाली उठून दिसतात. त्यातही पारंपरिक कपड्यांवर चांदबाली जास्त छान दिसतात. कॅरेटलेनने अशा आधुनिक चांदबालींचे कलेक्शन दिवाळीला आणले आहे.

- Advertisement -

ब्रेसलेट – बर्‍याचदा मुलांना किंवा मुलींना नक्की काय दागिना करायचा हा प्रश्न पडतो. तेव्हा ब्रेसलेट हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. बांगड्या घालणं हल्ली बर्‍याच मुलींना आवडत नाही आणि मुलांनाही काहीतरी वेगळं देण्यासाठी ब्रेसलेट हा योग्य पर्याय आहे. शिवाय नाजूक वा आपल्याला आवडतील अशा प्रकारचे ब्रेसलेटही आवडीप्रमाणे करून घेता येतात. दरम्यान, लग्न झालेल्या मुलींसाठी आता ब्रेसलेट मंगळसूत्र हादेखील वेगळा दागिना उपलब्ध आहे.

नेकलेस – कोणत्याही स्त्रीला नेकलेस हा दागिना आवडत नाही असं होत नाही. त्यातही वेगळी डिझाईन्स आणि भरगच्च नेकलेस असतील तर साहजिकच हा दागिना हवाहवासा वाटतो. दिवाळीसाठी बर्‍याच ज्वेलर्सकडे असे दागिने खास बनविले जातात. अगदी लहान मानेजवळच्या नेकलेसपासून ते लांब नेकलेसपर्यंत बर्‍याच व्हरायटी विविध ज्वेलर्सकडे पाहायला मिळतात.

- Advertisement -

नक्षी कानातले – पीएनजी ज्वेलर्सने खास दिवाळीसाठी नक्षी कलेक्शन सादर केले आहे. यामध्ये वेगवेगळे नक्षीकाम असलेले कानातले बनवण्यात आले असल्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपल्या आवडीप्रमाणे या पाडव्याला दागिन्यांची निवड करता येईल. हे कलेक्शन महाराष्ट्रीय पैठणीवरून प्रेरित असून या कलेक्शनमधील प्रत्येक दागिन्यांवर पैठणीची कलाकुसर दिसून येते.

नोव्हेंबरमध्ये दिवाळी तर आहेच, शिवाय पुन्हा एकदा लग्नाचाही हंगाम चालू होत आहे. त्यामुळे यावर्षी पूर्वीप्रमाणेच दिवाळीला दागिन्यांची खरेदी होत आहे. मागच्या वर्षी जीएसटीमुळे बराच गोंधळ झाला होता. मात्र, यावर्षी पुन्हा एकदा सोन्याच्या दागिन्यांना सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणावे लागेल.
– सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -