घरआली दिवाळी २०१८दिवाळी बदलतेय !

दिवाळी बदलतेय !

Subscribe

दिवाळी म्हटलं की रोषणाई आणि आनंद. सगळीकडे भरभरून उत्साह. मात्र वर्षानुरूप शहरातील दिवाळीला बदलते स्वरुप आले. दिवाळीच्या निमित्ताने अगदी कपड्यांपासून ते फराळापर्यंत सगळ्याच वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. पण त्यातही आता वर्षे लोटतात तसा बदल होत गेला आहे. फटाके आणि दिवाळी हे समीकरण इतकं घट्ट अगदी पहिल्यापासूनच होते की, फटाके भारंभार वाजल्याशिवाय दिवाळी साजरी होत आहे, असं वाटतंच नाही. वसुबारस ते भाऊबीज हा अतिशय उत्साहाचा दिवाळीचा आठवडा. पण या आठवड्यासाठी तयारी ही नेहमीच दोन आठवडे आधी सुरू होते. शहरातील पूर्वीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीत कमालीचा फरक पडला आहे.+

दिन दिन दिवाळी…गायी म्हशी ओवाळी, म्हणत लहानपणी अगदी पहाटे दिवाळीला फटाक्यांच्या आवाजात सुरुवात व्हायची. खरं तर नरक चतुर्दशीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करायचे. अर्थात आईने सर्वांच्या अंगाला अगदी घासूनपुसून उटणं लावून द्यायची परंपरा होती. मग घरात कितीही माणसं असोत. आई प्रत्येकाला उटणं लावल्याशिवाय आंघोळ करू द्यायचीच नाही. त्यानंतर पटापट तयार होऊन बाहेर फटाके फोडायला जायची. पूर्वी घाई असायची. पण ते अभ्यंगस्नान करून आल्यानंतर पायाखाली कारटं फोडायलाही मजा यायची. त्यानंतर घरात सगळ्यांनी जमून एकत्र फराळ करण्याची मजाच न्यारी. आपण आपल्या नातेवाइकांच्या घरी एक वर्ष जायचे आणि त्यांनी आपल्या घरी एक वर्ष यायचं असाही बर्‍याच घरातील रिवाज होता. मात्र आता हे कुठेतरी हरवल्यासारखं वाटत आहे. अर्थात दिवाळीचा जोषजल्लोष तसाच असला तरीही आताची दिवाळी कुठेतरी डिजीटल युगातील वाटते. शहरामध्ये तर ही स्थिती बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळते.

गेल्या काही वर्षांमध्ये शहरात रुजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळीनिमित्त सजणार्‍या बाजारामध्ये एक प्रकाराने भरच घातली आहे. मात्र पूर्वी शहरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने भरणार्‍या बाजारपेठा यामुळे जवळजवळ नाहीशाच झाल्या आहेत. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षा आता ऑफिसच्या वेळा सांभाळत ऑनलाईन शॉपिंगला ग्राहक जास्त पसंती देऊ लागले आहेत. विशेषतः पूर्वी आईवडील दिवाळी आली की, आपल्या मुलांना बाजारात घेऊन त्यांना आवडतील ते कपडे अथवा इतर गोष्टी घेऊन देत असत. त्यानिमित्ताने पूर्ण कुटुंब खरेदीला जात होते. पण आता शहरांमध्ये हे चित्र फारच कमी प्रमाणात दिसते आहे. विशेषतः तरुण वर्ग आता ऑनलाईन शॉपिंग दिवाळीला जास्त करताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वीही दिवाळीला मिळणार्‍या गोष्टींवर सूट असायची. पण आता शहरांमध्ये ऑनलाईन शॉपिंग करत असलेल्यांसाठी विशेष आकर्षक सूट वाढल्या आहेत. त्यामुळे बाजारामध्ये फिरून शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे शहरांमध्ये दिसून येते आहे.

- Advertisement -

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी शहरात असूनही दिवाळीच्या वेळी लोक वेळ काढून घरांघरांमध्ये एकत्र जमून दिवाळीचा फराळ बनवत होते. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये ऑफिस कल्चरचे तास वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण कामामध्ये इतका व्यग्र झाला आहे की, घरच्यांना सणासुदीच्या वेळीही वेळ देणे आता काहीसे अशक्य होऊ लागले आहे. खरे तर घरच्यांसाठी वेळ काढणे यासारखे मोठे गिफ्ट नाही. पण बाजारातील वस्तू आणून गिफ्ट देणे लोकांना आता जास्त महत्त्वाचे वाटायला लागले असून वेळ देणे तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही.

अगदी शहरातही पूर्वी शेजारी-शेजारी वा एका घरातील भावंडे एकत्र जमून कंदील तयार करणे किंवा पणत्यांना रंग देणे अशा गोष्टींना महत्त्व देत असत. पण आता इतके पर्याय शहरांमध्ये उपलब्ध झाले आहेत की, पैसे देऊन वेळ वाचवण्याच्या नादात लहानसहान गोष्टीतील आनंदाला मात्र शहरातील लोक मुकत असल्याचे चित्र आहे. दिवाळीला एका कोपर्‍यात एका बाऊलमध्ये मेणाचे दिवे ठेवण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागला आहे. तसेच अ‍ॅल्युमिनियमच्या लहान वाट्यांच्या पारंपरिक दिव्यांबरोबच मेणाचे दिवेदेखील आपल्याला दिसतात. असे सगळे पर्याय असल्यामुळे पूर्वीप्रमाणे अशा गोष्टी बनविण्यामध्येही लोकांना वेळ दवडणे आवडेनासे झाले आहे.

- Advertisement -

पूर्वापार चालत आलेल्या आवाजी फटक्यांच्या परंपरेला अलिकडच्या काळात अगदी छेद मिळाला आहे. पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि ध्वनीप्रदूषणाबाबतची मर्यादा या सगळ्यामुळे दणदणीत आवाजाचे सुतळी बॉम्ब, लवंगी माळा, रॉकेट यासारख्या पूर्वीच्या फटाक्यांवर जवळजवळ आता बंदीच आली आहे. त्यामुळे अशा फटाक्यांना बाजूला सारून फक्त आकाश उजळवून टाकणार्‍या विविधरंगी फटाक्यांची मागणी आता शहरांमध्ये जास्त प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे पूर्वी शहरांमध्ये दिवसरात्र कानठाळ्या बसवणारे फटाके वाजत राहात होते. आता तसे चित्र दिसत नाही. यावर्षीपासून तर केवळ दोन तास फटाके वाजवण्याचा न्यायालयाचा निर्णय आल्यामुळे दिवाळीला फटाके नक्की किती प्रमाणात वाजतील हीदेखील आशंका आहे.

खरे तर पूर्वीही शहरांमध्ये घरातील स्त्रिया नोकरी करत होत्या. मात्र त्यांना दिवाळीला सुट्टी मिळत असे. आता शहरांमध्ये अगदीच सगळी घाई आणि सुट्ट्यांचा बोजवारा उडालेला आहे. सुट्टी असल्यामुळे अगदी शेजारी पाजारी जमवून पूर्वी अगदी चाळीमध्ये वा फ्लॅटमध्ये राहणारेही एकत्र रांगोळीचा कार्यक्रम करत असत. चाळीमध्ये तर घरे समोरासमोर असल्यामुळे दुपारी जेवल्यानंतरचे 2 ते 3 तास हे रांगोळीसाठीच दिले जात असत. म्हणजे अगदी गप्पाटप्पा रंगून दुपारी 2 वाजल्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात होत असे ते अगदी रंग भरून होईपर्यंत कोण कुठला रंग आपल्या रांगोळीमध्ये कसा भरणार याचीही चर्चा जोरात रंगत होती.

आपली रांगोळी काढत असताना समोरच्या व्यक्तीला जाऊनही मदत करायची. मग समोरची व्यक्ती पुन्हा येऊन आपली मदत करणार ही मजाच काही और होती. तर रांगोळी काढायला इतके तास का लागतात, यासाठी घरातल्या वडिलधार्‍या मंडळींचा ओरडा ऐकण्याचीही मजा वेगळीच होती. त्यामध्ये असणारी काळजी, आश्चर्य हे सगळे भाव एकत्र समेटून जायचे. इतकं असूनही रांगोळी काढताना सर्वांनी घरातून आणलेला थोडा थोडा फराळ किंवा बाहेरून काहीतरी मागवून खाणे या गोष्टींमध्येही वेगळी मजा होती. मात्र आता शहरांमध्ये वेळेअभावी या सगळ्या गोष्टी कुठेतरी हरवत चालल्याचे चित्र आहे. त्याऐवजी आता जास्तीत जास्त वेळ लोक आपल्या मोबाईलमध्ये घालवत असल्याचे दिसत आहे. मोबाईलमुळे दूरचे लोक जवळ आल्याचे म्हटले जाते, पण वास्तविक जवळचे लोक मोबाईलमुळे दूर जात आहेत अशीही स्थिती सध्या दिवाळीसारख्या सणांमध्येही दिसून येत आहे.

शहरातील दिवाळी म्हटलं की, पूर्वी घराघरांमध्ये एकमेकांना ग्रिटींग्ज पाठवली जायची. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला उत्सुकता असायची या ग्रिटींग्जची. त्यामध्ये असणारा मजकूर. त्यावर असणारी चित्रे हादेखील उत्सुकतेचा विषय असायचा. शिवाय आपण आपल्याकडून कोणती आणि कशी ग्रिटींग्ज पाठवायची किंवा त्यामध्ये काय मजकूर लिहायचा? आपण सगळ्यांनी घरातच एकत्र जमून ग्रिटींग्ज बनवायची का? तसे असेल तर त्यावर कोणती चित्रं काढायची? पणती, कंदील किंवा अजून त्यावर वेगळेपणा काय दाखवायचा? या सगळ्यामध्ये घरातल्या मुलांची सुट्टीही खूप चांगली जात होती आणि त्यांच्यामधील कलागुणांना वावही मिळत होता. मात्र आता या डिजीटल युगामध्ये शहरातील मुले दिवाळीच्या वेळीही विविध क्लासमध्ये असतात अथवा घरात असल्यास, मोबाईल वा कोणत्यातरी गॅझेट्समध्ये गुंतलेली असतात. अर्थात याला कारणीभूत नक्की कोण? हा मुद्दा वेगळाच आहे. आता ही ग्रिटींग्ज जवळजवळ शहरातून दिवाळीच्या वेळी हरवलेलीच आहेत. त्याची जागी कदाचित ई-ग्रिटींग्जने घेतलीही असेल. पण त्यावेळच्या लहानसहान गोष्टींचा आनंद आज आपल्या शहरातून नक्कीच हरवला आहे.

पूर्वी कोणताही सण असो दारावर अगदी शहरांमध्येही विविध प्रकारच्या तोरणांना मागणी होती. घराबाहेर तोरण लावणे हे सणासुदीचे लक्षण समजले जायचे. त्यावेळी शहरांमध्ये झेंडू आणि कडूलिंबाच्या पानांच्या तोरणाला अगदी प्रचंड प्रमाणात मागणी असायची. पहाटेपासून या तोरणांच्या विक्रीलाही सुरुवात व्हायची. दिवाळीच्या वेळी घरी कंदिलाबरोबर तोरण हमखास लावण्यात यायचे. विकत नाही घेतले तर बर्‍याच घरांमध्ये झेंडूची फुले आणून हमखास घरच्या घरी तोरणे तयार करण्यात येत असत. पण आता या खर्‍या फुलांची जागा बर्‍यापैकी नकली आणि चायनीज तोरणांनी घेतली आहे. रेडीमेड फुलांची तोरणे तयार झाल्यामुळे त्याच्यातला ताजेपणा निघून गेला आहे.

शहरांमध्येही दिवाळी म्हटली की, फराळ हा पारंपरिकच असायला हवा अशी काही वर्षांपूर्वीपर्यंत धारणा होती. त्यामध्ये चिवडा, चकली, करंजी, अनारसा यासारख्या फराळांना प्राधान्य होते. पूर्वी फराळाचे पदार्थ हे दिवाळी या सणाचे औचित्य साधूनच बनवले जात होते. मात्र आता शहरांमध्ये वेळेअभावी त्यामध्येही वेगवेगळ्या गोष्टींचा भरणा झालेला दिसून येत आहे. काही ठिकाणी फराळ घरी करत असले तरीही या फराळाची जागा आता बर्‍यापैकी कुकीज आणि कपकेक्स यासारख्या नव्या पदार्थांनीही घेतली आहे. अर्थात पूर्वीच्या फराळाला कधीही शहरांमध्ये नकार मिळणार नाही. पण केवळ हेच पारंपरिक पदार्थ खात राहायचे यामध्ये शहरांमध्ये बदल होऊ लागला आहे. आताच्या लहान मुलांना आवडतील असे पदार्थ आता शहरांमध्ये जास्त प्रमाणात दिसू लागले आहेत. पारंपरिक पदार्थांना थोडासा आधुनिक टच देत हा बदल सध्या शहरांमध्ये दिसून येत आहे.

बर्‍याच गोष्टी वर्षानुरूप शहरांमध्ये बदलल्या आहेत. त्याचा फरक आधीच्या पिढीतील लोकांना प्रकर्षाने जाणवत आहे. बाकीचे बदल झाले असले तरीही काही नव्या गोष्टीही या सणांमध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. त्यामुळे बाकी काहीही असले तरीही दिवाळी शहरांमध्ये नेहमीच उत्साहाने साजरी केली जाणार. मात्र पिढीनुसार फरक त्यामध्ये जाणवणार हे नक्की.

चाळीमधिल प्रकाश उत्सव

मुंबईतल्या चाळीतून दिवाळीत दारादारात पाहुण्यांचे स्वागत करणारी रांगोळी आता फ्लॅटमध्ये आली. एसआरएच्या खोल्यांमध्ये ही दिवाळी स्थिरावलीय. सत्तर ऐंशीच्या दशकात मुंबईची ओळख कामगार वस्ती अशी होती. धारावीचा कुंभारवाड्यात दिवाळीच्या १५ दिवस आधीच उत्साहाची सुरुवात होते. पणत्या, तोरण, इलेक्ट्रीक एलईडी लाईट्सची जोडणी करणारे छोटेमोठे अनेक व्यावसाय या ठिकाणी केले जात असतात. मुंबईतल्या झोपडपट्ट्या नाहीशा होत गेल्या आणि झोपड्यांमधल्या गल्लीबोळातली दिवाळीही कमी होत गेली. छोट्याशा चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये लावलेले छोटेखानी कंदील आता दिसेनासे झाले आहेत. मोठ मोठ्या रस्त्यांवर आता राजकीय पक्षांचे कंदील लावले जातात. म्हणा ते त्यावेळीही लावले जायचे. त्यासाठी पक्षांचे कार्यकर्ते बांबू आणणे, तो तासणे, त्याला कागद लावून दोन इमारतींमध्ये आपल्या पक्षाचा उंच कंदिल लावला जात होता. कार्यकर्त्यांकडून गल्लोगल्ली रात्र रात्र जागून कंदिल बनवण्याची कामे केली जात होती.

पण आता त्याच्या आर्डरी दिल्या जातात. मुंबईतल्या या मोठ्या दिवाळी कंदिलांची कामे सिटीलाईट टॉकीजच्या लगत असलेल्या रस्त्यावर सुरू असतात. दिवाळीत इथं कंदिलोत्सव भरतो. वेगवेगळ्या आकारातले, कापडाचे, काड्यांचे, फोल्डिंगचे, कागदाचे कंदील इथं साकारले जातात. सणोत्सवाच्या मुंबईची दिवाळीतली ही माहिमची कंदिल गल्ली म्हणजे आगळीवेगळी ओळख आजही जपली जातेय.

अलिकडच्या जागतिकीकरणाच्या काळात फटाक्यांच्या प्रकारातले बदलही महत्वाचे आहेतच. ३० वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईत कामगार वस्ती होती. दिवाळीत मिळणारा पगाराशिवायचा बोनस हक्काचा होता. त्यातूनच दादर, हिंदमाताला आपल्या कुटुंबाला घेऊन सर्वसामान्य कामगार मुंबईकर जीवाची दिवाळी करत होता. कपड्यांनी सजलेली ही दुकानांची जागा हळू हळू मॉलने घेतली आता तर ऑनलाईन शॉपिंगमुळे मुंबईतले दिवाळीत झळाळून निघणारे रस्ते आता गर्दीची वाट पाहात आहेत. ग्रिटींग कार्डांचही तस्सच झालं. कपडे आणि ग्रिटींग कार्डचे तात्पुरते स्टॉल मुंबईतल्या रस्तोरस्ते दिसत होते. यातली बहुतेक शुभेच्छापत्रे हातानेच रंगवली जात होती. स्थानिक मराठी तरुण या रंगकौशल्यात अग्रेसह होते. आर्चिस किंवा इतर काही कंपन्यांनी काढलेल्या दिवाळीची ग्रिटींग काड्स घेण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी होत असे. मात्र आता फेसबुक,वॉट्सअपच्या जगात ही शुभेच्छापत्रेही नाहीशी झाली आहेत.

मुुंबईतल्या वस्त्यांमध्ये, गल्लोगल्ली फाराळाचा येणारा घमघमाट आता कमी होतोय. चकल्यांचा साचा आणण्यासाठी आता शेजारच्यांकडच्यांचीही दवाळी फराळाची गोड कामे करण्याची गरज आता उरलेली नाही. ऑनलाईन फराळ मागवला की काम झालं. फटाक्यांचीही तीच स्थिती आहे. लाल टिकल्यांच्या केपा आता दिसत नाहीत. कागदी पुठ्ठ्याच्या गोलाकार डबीतल्या लाल टिकल्या घरातल्या घरात हातोडीनं फोडणारी बच्चे कंपनीची दिवाळी मुंबईतून कधीचीच निघून गेली आहे. आकाश उजळून टाकणार्‍या फटाक्यांना आता मागणी आहे. फुलबाजा, नागगोळी, आपटी बार, चिमणी, कावळे असले फटाके या छोट्या फटाक्यांमध्येही मोठा आनंद मानणारी त्यावेळची लहानगी पिढी आता मोठी झालीय. दिवाळीतल्या मिठाईची जागा गुडीज आणि चॉकलेट बॉक्सने घेतलीय. हे मोठं मार्केट मोठ मोठ्या मल्टीनॅशनल चॉकलेट कंपन्यांनी कधीच कॅप्चर केलंय. अलिकडच्या जागतिकीकरणाच्या वेगात दिवाळीही हायटेक होतेय. चायना मार्केटमधली कंदिलं, पणत्या, दिव्यांचा झगमगाट फ्लॅटमधल्या बाल्कीनीतून चकाकतोय. पण बदल होतच असतो. दिवाळीही बदलेत. जुन्या जाणत्या गिरणगाव, ठाणं, कल्याण, कर्जतमध्ये आता दिवाळीत किल्ले साकारण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. त्यातलं परंपरागतपण कमी होतंय. दारातली छोटेखानी रांगोळीही रस्त्यावर भव्य दिव्य पद्धतीने साकारण्याकडे कलाकारांचा कल वाढलाय.

दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव, या प्रकाशाचा वापर आपल्या व्यावसायवृद्धीसाठी करण्याची संधी भांडवली बाजार कसा सोडेल. जुनं ते सोनं म्हणणं आता निकालात निघालंय. पुढच्या पाच दिवस वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने मोबाईल फोन्सच्या दिवाळी ऑफर्सच्या जाहिरांतींनी भरून जातील. छोट्या पडद्यावर छान छान दिसणारी जोडपी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून दिवाळीच्या शुभेच्छा देतील. हिंदी मराठी सर्वच मालिकांमध्ये स्पेशल दिवाळी एपिसोड्स दाखवले जातील. दिवाळी बदलली हे खरंच…पण मनातला आणि माणसांच्या नात्यातला फराळाचा गोडवा तस्साच ठेवायला हवा. त्यात बदल व्हायला नको..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -