रेड लाईट एरिया…खरं तर या परिसराचे नाव घेतले तरी अनेकांचे डोळे विस्फारतात..मात्र कायमच आयुष्यात अंधार असलेल्या या महिला दिवाळी नेमकी कशी साजरी करतात हे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर! थोडंसं आश्चर्य वाटलं असेल ना? तुमच्या मनात विचारदेखील आला असेल या महिलांची कसली दिवाळी आणि कसलं काय? पण या महिला जरी वेश्याव्यवसाय करत असल्या तरीदेखील सर्व सण तितक्याच उत्साहाने साजरे करत असतात, असे या महिलांनी सांगितले. सध्या दिवाळीची धामधूम मुंबईमध्ये सुरू आहे. सगळीकडे रोशनाई पहायला मिळते. पण या महिलांच्या आयुष्यात दिवाळीचे काय महत्त्व असतं हे जाणून घेण्याचा ‘आपलं महानगर’ने प्रयत्न केला.
खरं तर कामाठीपुरा येथील या रेड लाईट परिसरात संध्याकाळी या महिलांकडे येणार्यांची संख्या जास्त असते. तरी देखील गेल्या काही वर्षांपासून येथील महिला दिवाळीत संध्याकाळी वेळ काढून फटाके फोडून सण साजरा करतात. तसेच जी दिवाळी आम्ही गरीबीमुळे लहानपणी साजरी करू शकलो नाही ती दिवाळी आम्ही आमच्या मुलांना साजरी करायला देतो. आम्ही जरी या व्यवसायात असलो तरी आम्ही ईद असो, दिवाळी असो हे सण साजरे करतो, असे या महिलांनी सांगितले.
मागील १४ वर्षांपासून मुंबईतील साई सामाजिक संस्था ही या महिलांच्या आरोग्याविषयी काम करते. ही संस्था दरवर्षी त्यांच्या मुलांसोबत दिवाळी तसेच इतर सण साजरे करते. या महिलांना मोफत औषध वाटप करते. मुलांना शिक्षण देण्याचे काम करते.
लहानपणी दिवाळी साजरी करायला पैसे नव्हते. आता पैसे आहेत, पण मनासारखी दिवाळी साजरी करता येत नाही. पण वेळ मिळेल तेव्हा आम्ही दिवाळी साजरी करतो. जरी आम्ही त्यावेळी दिवाळीचा आनंद घेऊ शकलो नसलो तरी आम्ही आमच्या मुलांना दिवाळीमध्ये कपडे घेतो, असे या व्यवसायात असणार्या एका महिलेने सांगितले.