घरआली दिवाळी २०१८दिवाळी म्हणजे फक्त खर्च नव्हे !! तर गुंतवणुकीचा शुभारंभ !!

दिवाळी म्हणजे फक्त खर्च नव्हे !! तर गुंतवणुकीचा शुभारंभ !!

Subscribe

‘दिवाळी हा सण मोठा,नाही आनंदा तोटा!’ हे आपण अनेकजणांकडून ऐकत आलेलो आहोत. दिवाळी म्हणजे बोनस,खरेदी,लाडू-चकली आणि फटाके! आता हे जुने समीकरण बाजूला पडत चाललेले आहे. तरी मूळ दिवाळीचा आनंद आणि त्यामागची परंपरा साजरी केलीच पाहिजे. दिवाळी हा प्रकाशाचा आनंद द्विगुणीत करायचा सण आहे.फक्त भरपूर शॉपिंग ! धमाल एन्जॉयमेंट !! आपल्या दिवाळीला इतक्या लिमिटेड चौकटीत अडकवणे योग्य नव्हे. काही समाजातील मंडळी खरेदी-चैन भरपूर करतात,त्याचप्रमाणे ‘लक्ष्मी-पूजना’चे महत्व जाणून शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे ‘मुहूर्ताचे सौदे’देखील करतात. मराठी माणसेही आता शेअरबाजार आणि अन्य गुंतवणूकबाबतीत सक्रीय आहेत.नोकरी-धंद्याव्यतिरिक्त बुद्धीने ‘चार पैसे’ कमावण्याची कला आपल्यालाही अवगत झालेली आहे. मॉल-संस्कृतीमुळे आता बारमाही खरेदी म्हणजे शॉपिंग केली जात आहे.कोणे एके काळी फक्त गणपती आणि दिवाळीला नवीन कापड-चोपड आणि मिठाई मिळायची. जमाना बदलला आहे, तेव्हा आपणही एन्जॉयमेंट करताना इन्वेस्टमेंटचा मुहूर्त करुया.

दिवाळी खरेदी आणि शॉपिंगचे अप्रूप !!

पूर्वी दिवाळीच्या आधी बोनस हाती पडायचा आणि कुटुंबे आपल्या वार्षिक खरेदीला बाहेर पडायची.आता असे ‘बोनस’ इतिहासजमा झाले आहेत. म्हणजे मोठ्या कंपन्यात होतातही,पण कधी ? डिसेंबरमध्ये किंवा आर्थिक वर्षात नफा कमावल्यावर. त्यांना आपल्या सणांचे काही कोडकौतुक नसते.तरुण मंडळीना काय ? खिश्यात डेबिट-क्रेडीट कार्ड असल्याने ‘जी चाहे तब शोप्पिंग !’ आणि मॉलवाले तर संपूर्ण जगाला जणू खरेदीचे व्यसन लावण्याचा चंगच बांधून जन्माला आले आहेत. म्हणूनच ‘चंगळवाद’ आता फोफावलेला आहे.आपण ग्राहक आहोत कि गिराहिक? असा संभ्रमदेखील होत नाही.गरज असो वा नसो ! खरेदी केली जाते ! हाच मार्केटिंगचा मंत्र आहे.त्यात मोठी भर पडली आहे ती ‘आँन-लाईन सेलच्या धमाक्याची’ त्यासाठी बाजारात किंवा मॉल्समध्ये जाण्याची खिटपिट नाही,तुम्ही घरात असा, ऑफिसात असा,नाहीतर हो, रस्त्यावर ! कुठूनही एका क्लिकवर शॉपिंग करू शकता आणि होम डिलीवरीने वस्तू-माल मिळवू शकता.आता आणखीन काय पाहिजे? ट्रॅफिक-जामची तकतक नाही,गर्दीत पिचपिच नाही.एकदम रुबाबात शॉपिंग ,तेही अगदी घरबसल्या.

संपत्ती-निर्माणसाठी केलेले शॉपिंग !!
आपली बहुतेक खरेदी ही आनंदासाठी असते,जो अनेकदा क्षणिक असतो.अमुक ठिकाणी जातो -खातो-पितो बिल भरून बाहेर येतो! त्यातून मिळालेला आनंद केवळ आठवणीतच राहतो.आपल्या अनेक गरजा आणि सुखाच्या कल्पना या अशाच नैमित्तिक आणि त्या-त्या वेळेपुरत्या असतात.टिकावू असे काही असत नाही.शॉपिंग,हॉटेलिंग,पार्टी अशी त्याची विविध रूपे असतात.पण हेच शॉपिंग आपण एखाद्या वस्तूचे,मालमत्तेचे म्हणजेच एसेटसचे करतो,तेव्हा ते खर्च केलेले पैसे हे त्यात गुंतवले जातात.उदाहरणार्थ – आपण दसर्‍याला किंवा दिवाळी पाडव्याला नवीन टू-व्हीलर किंवा कार घेतो मग भले ती लोनच्या माध्यमातून असेल ! पण ती मालमत्ता आपल्याला /कुटुंबाला सेवा देणारी आणि दीर्घकाळ उपयोगी पडणारी असते. अर्थात वाहन आले की पेट्रोल-डिझेलचा वाढता खर्च दरमहा येतोच,शिवाय रिपेअरिंग-देखभाल आणि नूतनीकरण-खर्च येतोच. पण अशा खरेदीने आपल्याला जे फायदे किंवा सोय मिळते,ती क्षणिक नसते. याचाच अर्थ आपण तेवढ्यापुरता ,तात्पुरता आनंद मिळवण्याचा विचार करा पण त्याचबरोबरीने टिकावू आनंद देणार्‍या गोष्टींचा जरूर विचार करा.त्याकरिता खर्च केलेले पैसे हे जणूकाही त्या-मालमत्तेत गुंतवल्यासारखेच आहेत. याचा अर्थ आपण मौजमजा करायचीच नाही का? तर तसे काही नाही. कारण आपला आणि आपल्या कुटुंबाचा आनंद हा मोलाचा आहे,तो तर टिकवायला हवा.मग नेमके काय केले पाहिजे?ते पाहूया.

- Advertisement -

दिवाळीच्यानिमित्ताने खर्च-खरेदीला ‘गुंतवणूक -दिशा ‘ देवूया !!
आपल्या परंपरेत धनत्रयोदशी आहे -ज्यादिवशी धनाची पूजा केली जाते आणि ‘लक्ष्मी-पूजन’ हे काही फक्त व्यापारी आणि बिझनेसवाल्यांचे नसते,तुम्ही-आम्ही मनोभावे लक्ष्मीची पूजा करतो. कारण आजच्या महागाईच्या जगात तग धरून रहायचे,अनेक खर्चांना तोंड द्यायचे तर ‘जमा’ बाजू भक्कम हवी, म्हणजेच लक्ष्मीचा सातत्याने वरदहस्त हवा. आपला पगार काही आपल्याला पुरत नाही.आता ओव्हरटाईम शब्द ‘बाद’ झालेला आहे.तसेच ‘बोनस’चेही आहे.वार्षिक इन्क्रिमेंट हे आपल्या कामगिरीवर म्हणजेच पर्फोर्मंसवर अवलंबून आहे.अशावेळी प्रत्येकाने ‘अतिरिक्त इन्कम’ मिळवण्याचा विचार केलाच पाहिजे.सरळमार्गाने पैसा कमावण्याचे मार्ग सुदैवाने अजूनही उपलब्ध आहेत.लांडीलबाडी करणे आपल्याला नको. आपल्याला काळी कमाई करायची नाही. मग आपली आवक संपत्ती कशी वाढेल? ते आपण पाहणार आहोत.

शेअरबाजार – शेअर्समध्ये गुंतवणूक

- Advertisement -

आपल्याला त्यातले फारसे कळत नाही ! असे म्हणू नका.कारण आता अनेक पेपर्स,मासिके आणि अन्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. तुम्ही सर्व पैसे शेअर्समध्ये गुंतवा ! असे कोणीच सांगणार नाही.परंतु काही रक्कम चांगल्या म्हणजे अव्वल कंपन्यांच्या शेअर्समध्ये नक्कीच गुंतवा. हा एक मात्र मनाला बजावा की, काल घेतले,म्हणजे उद्या त्याचा भाव चौपट होणार नाही. ‘‘झटपट खरेदी- फटाफट नफा इतक्या सहजपणे त्याकडे पाहू नका.एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून त्याकडे बघा.

उदाहरणार्थ – एखादी ब्लू-चीप म्हणजे खणखणीत कामगिरी करणारी एखादी कंपनी असेल ,तिच्या शेअर्सचा भाव 10 वर्षांपूर्वी समजा रु 150/- इतका असेल आणि आता भाव रु 15,000/ असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका.कारण आपल्याकडे अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी सातत्याने भरघोस नफा कमावलेला आहे आणि तुफानी कामगिरी करत राहिल्याने शेअर्सची किंमत वाढते आहे.

आपल्या अवती-भवती असलेल्या मंडळींकडे असे काही शेअर्स असतील,बाजारात काही अनुभवी तज्ञ आहेत जे आपल्याला गाईड करतील, अशा काही कंपन्या बघा आणि थोडे शेअर्स घेण्याचा मुहूर्त यंदाच्या लक्ष्मी-पूजनाला नक्कीच करा.कदाचित पुढील काही वर्षात तुमची शेअर-संपत्ती निश्चितच वाढलेली दिसेल! गेल्या काही वर्षात शेअरबाजार निर्देशांकाचा कल हा चढताच आहे
कालावधी – निर्देशांक
डिसेंबर ,2016 – 26,626
डिसेंबर,2017- 34,057
आणि यंदाही तो वाढताच राहील कारण काय? अहो,पुढील वर्षी आपल्याकडे सार्वत्रिक निवडणुका आहेत ना!

रिअल इस्टेट गुंतवणूक –
आपल्याकडे प्रत्येक सणाला खरेदीचे वेगळे असे महत्त्व असते ,म्हणजे दसरा म्हटले कि सोने-खरेदी आणि दिवाळी आणि गुढी-पाडव्याला जागेच्या खरेदीकरिता विशेष महत्व असते. जुनी जागा विकून किंवा थेट नवीन जागा घेणे,तसेच बाहेरगावी ‘सेकंड-होम’ घेणे हे आता अशक्य राहिलेले नाही.आपल्या बाकीच्या कौटुंबिक गरजा भागल्या असतील आणि पुरेसे उत्पन्न असेल,तर रिअलमध्ये पैसे टाकण्याचा जरूर विचार करा. कारण अधून-मधून मंदी येत असली तरीही याक्षेत्राला किंवा खरेदी केलेल्या घराला योग्य भाव मिळू शकतो,तसेच भाड्याने देवून तुम्ही कमाई करू शकता.त्यातून तुमचा इ.एम.आय. फेडू शकता ! आज अनेक ठिकाणी रि-डेव्हलपमेंट सुरु आहे, अनेकांना तात्पुरती घरे हवी आहेत.होम लोनमुळे घर घेणे अवघड राहिलेले नाही,तेव्हा अशा गुंतवणुकीचा विचार करता येईल. अशा गुंतवणुकीला ‘डेड इन्वेस्टमेंट’असेही म्हटले जाते,पण वापर असला किंवा उत्पन्न कमावले तर कर्ज हफ्ता व व्याज ह्यांचा बोझा वाटणार नाही.

सोने -सोन्यातील इन्वेस्टमेंट- आपल्याकडे सोन्याकडे आभूषणे आणि दागिन्यांचा मौल्यवान धातू म्हणूनच बघितले जात आहे,परंतु एक उत्पन्न देणारे साधन म्हणून त्याकडे पहा. गोल्ड युनिट्स आणि गोल्ड बॉन्ड्स ह्यात आपण पैसे गुंतवले तर लाभदायक होऊ शकेल.पण सोने -चांदी अशा मौल्यवान धातूंचे भाव नेहमीच कमी-जास्त असतात आणि आपण त्याकडे इन्वेस्टमेंट पाहतच नाहीत.

म्युचुअल फंड -सर्वांसाठी -हंगामी किंवा अल्पकालीन गुंतवणूक म्हणून लिक्विड फंड सोयीचे आहेत. डेब्ट तसेच इक्विटी फंड आणि हायब्रीड फंडांचा विचार करावा.अर्थात काही फंडांचा तुलनात्मक अभ्यास करून, गुंतवणूक तज्ञाचे मार्गदर्शन घेवून दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून काही योजनात आपण पैसे गुंतवू शकतो

एस.आय.पी.- आपल्या अनेक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ठराविक रक्कम दीर्घ काळासाठी गुंतवली तर आपल्याला लाभ तर होईलच आणि अनेक प्रकारची खरेदी करता येईल.

पेन्शन फंडात गुंतवा – आजच्या पिढीला निवृत्तीनंतर पेन्शन मिळेलच याची हमी नाही,म्हणून जॉब लागल्या दिवसापासून चांगल्या पेन्शन फंडात पैसे गुंतवावेत म्हणजे भविष्याची काही तरतूद केल्यासारखे होईल. एनपीएसछरींळेपरश्र झशपीळेप डलहशाश ही एक छान योजना आहे ज्यात ठेवलेले पैसे तुमची वयाच्या 60 वर्षापर्यंत त्यातील 20% टक्केच काढू शकतात! 80% टक्के रक्कम काढू शकत नाहीत.

यंदाची दिवाळी ही सुखाची आणि भरभराटीची जावो ! आणि योग्य गुंतवणूक केली तर संपूर्ण वर्ष नक्कीच सुखा-समाधानाची जाईल.

राजीव जोशी

( लेखक अर्थ आणि बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -