लक्ष्मीपूजनाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापार्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्त्व आहे.
पौराणिक कथा
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरविण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.
बळीचे राज्य येवो
पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. तर काही ठिकाणी खास करुन ग्रामीण भागात
शेणापासून बळीची प्रतिमा तयार करतात आणि त्याची पूजा करतात. इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.
गोवर्धन पूजा
दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. जसे याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. त्यामुळे या दिवशी ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकर्यांना सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्ण मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
नववर्ष व्यापारांचे
पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापार्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.
भाऊबीज
पाडव्याच्या दुसर्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांची आरास करून मोठ्या आत्मियतेने ओवाळून त्याच्या समृद्धी व भरभराटीच्या शुभेच्छा देतात. हा दिवस भाऊ-बहीण एकत्रपणे साजरा करतात.
भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा चंद्राच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघून गेल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते, यासाठी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो.
बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
या दिवशी बहिणीच्या घरी भावासाठी गोडधोड भोजन बनवले जाते. सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात बहिणीसाठी ‘ओवाळणी’ म्हणून छानशी मौल्यवान भेट किंवा पैशांचे पाकिट ठेवतो. त्यातून बहीण-भावाच्या नात्याला अधिक मधूर बनवले जाते. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो.