घरआली दिवाळी २०१८अशी रंगणार दिवाळी

अशी रंगणार दिवाळी

Subscribe

दिवाळीची जोरदार तयारी सध्या सगळीकडेच सुरू आहे. घरातली साफसफाईदेखील करून झाली आहे. घराघरातून मस्त खमंग वास यायला लागले आहेत. दिवाळी म्हटलं आठवते ती कडाक्याची थंडी. एरवी या थंडीत उठायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो. पण याच कडाक्याच्या थंडीत लवकर उठून,कुडकुडत अभ्यंगस्नान करून दिवाळी पहाट बघायला जायची मजा काही औरच असते.

आता पूर्वीसरखी थंडी पडत नाही. त्याचप्रमाणे या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या दिनक्रमातही आता बदल झाला आहे. दिवाळीत सकाळी लवकर उठून देवळात जाणे, शेजारी फराळाचे ताट नेऊन देणे, एकत्र सगळ्यांनी फराळ करणे हा अगदी ठरलेला कार्यक्रम असायचा मात्र आता नव्याने सुरू झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना भेट देऊन दिवाळी पहाट साजरी केली जाते. दिवाळी पहाटच्या दिवशी आता शास्त्रीय संगीताच्या मैफील रंगू लागल्या आहेत. सुगम संगीत, नाट्यसंगीत, लोकगीत गायकांना या काळात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मोठ्या गायकांच्या मैफिलींमध्ये दिवाळी पहाटच्या दिवशी आपणही हजेरी लावावी असं आता प्रत्येकालाच वाटत असतं. दादर,विलेपार्ले, गिरगाव, ठाणे, डोंबिवली,पुणे अशा अनेक ठिकाणी दिवळी भल्या पहाटे तरूणाईची गर्दी होते. गेले २५ वर्षांपासून ही दिवाळी पहाट चालू आहे.

- Advertisement -

नवोदित गायकांचा वाढतोय सहभाग

दिवाळी पहाट या साजरी करण्यासाठी मोठ मोठे दिग्गज गायक यात सहभाग घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून नवोदित गायकांचा सहभाग वाढताना दिसत आहे. दिग्गज कलाकार आणि नवोदित गायक यांचा अफलातून संगम दिवाळी पहाटचा आनंद द्विगुणित करतात. आता केवळ मोठ्या गावांमध्ये नाही तर छोट्या छोट्या गावांमधूनही स्थानिक कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. स्थानिक कलाकारांच्या वाढत्या सहभागामुळे मैफिलीत रंगत वाढली आहे. त्यामुळे मुंबईबरोबर गावागावांमध्येही दिवाळी पहाटचा उत्साह दिसून येत आहे.

दिवाळी पहाटची सुरूवात

१९८६ साली चतुरंग प्रतिष्ठानने दिवाळी पहाट या संकल्पनेला सुरूवात केली. बाल कोल्हटकरांचे वाहतो ही दुर्वांची जुडी हे नाटक सादर करण्यात आलं. या नाटकाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ३२ वर्षापूर्वी चतुरंग ने लावलेले हे बीज आता चांगलंच रूजलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात ४०० हून अधिक ठिकाणी दिवाळी पहाट हा कार्यक्रम साजरा केला जातो.

- Advertisement -

चतुरंग आयोजित करत असलेल्या कार्यक्रमाचा खर्च हा अतिशय कमी असतो. चतुरंग तर्फे दर्जदार कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाची सुरूवात दिवाळीच्या प्रसंगाने होते त्यामुळे दिवाळी पहाटेची संकल्पना सुचली. प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील याची सुरुवातीला भीती होती. पण लोकांनी ही संकल्पना अक्षरशः डोक्यावर घेतली. यावर्षी गायिका आशा खाडीलकर यांच्या गायनाच्या कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली आहे.
– विद्याधर निमकर, चतुरंग प्रतिष्ठान

दिवाळी कार्यक्रमात तोचतोचपणा येतोय का?

सोशल मीडिया, संगणक, मोबाईल आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांच्या आक्रमणात तसेच ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या विळख्यात आपली संस्कृती, परंपरा हरवतेय का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरात होणारे ‘दिवाळी पहाट’कार्यक्रम ही मरगळ दूर करतात. पण आता कार्यक्रमात तोचतोचपणा येतोय का? ठराविक चेहरे आणि तीच ती गाणी ऐकायची का? असा एक सूर सध्या आळवला जातो. पण असं असलं तरी प्रेक्षक या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देतात.

सेलिब्रिटींची दिवाळी पहाट

कर्जतला आमचे एकत्र कुटुंब आहे. आम्ही सगळेजण तिथे येऊन एकत्र सण साजरे करतो. कर्जतच्या कपालेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा मोठा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात मी स्वत: सहभाग घेते. सकाळी सात वाजता या मंदिरात कार्यक्रमांना सुरूवात होते. तसेच दरवर्षीप्रमाणे मी या वर्षीही पनवलेच्या शांतीवन आश्रमाला भेट देणार आहे. या आश्रमामध्ये कुष्ठरोगी आहेत. तिथल्या वृद्ध लोकांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. गाणी,गप्पा, फराळ असा तो कार्यक्रम असतो.
– जुई गडकरी, अभिनेत्री

काही वर्षांपूर्वी दिवाळी पहाटच्या एका कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं. मंत्रमुग्ध करणारी अशी ती पहाट होती. भल्यापहाटे उठून कलेची साधना करण्याची संधी मिळणं याहून मोठं सुख ते काय. दिवसाची प्रसन्न सुरुवात करुन मग फराळाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच. मी तो दिवस कधीच विसरु शकणार नाही.
– संग्राम समेळ, अभिनेता(ललित २०५)

मी यावर्षी पहिल्यांदाच दिवाळी पहाटचा कार्यक्रम जवळून अनुभवणार आहे. डोंबिवलीच्या फडके रोड इथल्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मी जाणार आहे. विठुमाऊली मालिकेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे आणि प्रेक्षकांना विठुमाऊलीचं दर्शन घेण्याचं निमित्त. त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. दिवाळी गीतं, दिव्यांच्या रोषणाईत झगमगून निघालेला आसमंत आणि चाहत्यांची अमाप गर्दी अशा भारावलेल्या वातावरणात मी यंदा माझी दिवाळी सेलिब्रेट करणार आहे.
– अजिंक्य राऊत,अभिनेता (विठुमाऊली)

या ठिकाणी रंगणार दिवाळी पहाट

ठाण्यात महेश काळे

दरवर्षीप्रमाणे यावर्षी अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचंड चाहतावर्ग असलेला महेश काळे यंदा ठाणेकरांची दिवाळी पहाट सुरेल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 8 नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता शिव समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणावर सुरेल मैफील रंगणार आहे.

पनवेलमध्ये शास्त्रीय सूर घुमणार

तर दीपावलीनिमित्त पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवार, 6 नोव्हेंबरला स्वरसम्राट राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या गाण्यांची सुरेल मैफल अर्थात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे.

वाशीमध्ये सुरेश पहाट

आनंदी जोशी, चैतन्य कुलकर्णी यांच्या सुरेल आवाजात ७ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता विष्णुदास भावे सभागृह वाशी येथे सुरेल गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाडिपा गाजवणार दिवाळी पहाट

पु.ल.च्या शतकोत्सवी वर्षानिमित्त ’भाडिपाचे वल्ली’ हा खास कार्यक्रम भाडिपा रसिकांसाठी घेऊन येत आहे. 8 नोव्हेंबर, सकाळी 8 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह,दादर, मुंबई येथे सादर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -