Diwali 2021 : दिवाळीत लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा ‘या’ गोष्टी

diwali 2021 apply this at the main door of the house to welcome lakshmi
Diwali 2021 : दिवाळीत लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा 'या' गोष्टी

दिवाळी हा हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा ४ नोव्हेंबर २०२१ रोजी देशभरात दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीत लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी रंगाोळी आणि इतर गोष्टी फॉलो करु शकता. या माध्यमातून लक्ष्मीला प्रसन्न करत घरात सुख-शांती नांदवता येईल. या दिवाळीच्या दिवसात घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक, तोरण आणि विविध गोष्टींनी सजवा.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुराणांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत, ज्यातून लक्ष्मी माता खुश होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते, असं म्हटलं जातं.

अंगणात रांगोळी काढा

धनाची देवता लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्या घरातील अंगणात सुंदर रांगोळी काढा. असे म्हटले जाते की, घराची साफ-सफाई करत दारात आकर्षक रांगोळी काढल्यास घरात लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. कारण घराच्या प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळी लक्ष्मीमातेसाठी प्रिय आहे.

दारावर लक्ष्मीची पावले काढा

देवी आपल्या घरात यावी यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पावलांचे ठसे काढावेत. बाजारातही या पावलांच्या आकाराचे छाप सहज मिळतात. याशिवाय शक्य असल्यास काही जण सोन्या-चांदीचे देखील बनवून घेतात. हे ठसे घराच्या आतमध्ये येत असल्याचे दिसले पाहिजे. अस केल्याने तुम्ही देवीला घरी येण्यासाठी निमंत्रण देत आहात असे म्हटले जाते.

घराच्या दारावर तोरण लावा

दिवाळीच्या दिवसात लक्ष्मी माता भक्तांच्या घरी वास्तव्यास येते असं म्हटले जाते. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दारावर तोरणं लावा. आंब्याची पानं, फुलं आणि भाताच्या दाण्यांपासून तयार केलेलं तोरण अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे पानं, फुलांपासून तयार करण्यात आलेलं तोरणं सुंदर दिसते.