– प्रसाद जाधव
साहित्य आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे. संस्कृतमधील क्लिष्ट वाटणारे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृतमधून समाजासमोर आणले आणि विश्व कल्याणाची प्रार्थना – पसायदान – आपल्याला दिली. माऊलींनी महाराष्ट्राला निस्वार्थ साहित्याचा वारसा दिला.
माऊलींच्या संजीवन समाधीचे 1996 हे सप्तशताब्दी वर्ष सुरू असताना ‘विद्यार्थ्यांनीही सकस साहित्य निर्माण करावे’ हा विचार काही युवक आणि प्राध्यापकांच्या मनामध्ये आला. त्यातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अमळनेर येथे प्रतिभा संगम हे महाराष्ट्र आणि गोवास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. प्रचलित साहित्य संमेलनापेक्षा याचा आराखडा वेगळा ठरविला गेला.
तिथे विद्यार्थी साहित्यिक केंद्रबिंदू ठेवून सत्रांची रचना होती. प्रतिष्ठित साहित्यिकांना निमंत्रणे होतीच, परंतु सोबतीला निवडक विद्यार्थी साहित्यिकांनाही आपले साहित्य सादर करता आले. गोव्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विद्यार्थी साहित्यिक सहभागी झाले. सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व त्यात होते. कविता, कथा, ललित लेखन, वैचारिक लेखन इत्यादी प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रतिभा मांडली. प्रतिष्ठित साहित्यिकांकडून नवोदित साहित्यिकांनी मार्गदर्शन घेतले. जवळजवळ 1,000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे पहिले प्रतिभा संगम गाजले.
स्वत: मंगेश पाडगावकरांनी या संमेलनावर स्तुतीसुमने उधळली. पुढे अभाविपने हे संमेलन दरवर्षी रत्नागिरी, गोवा, मुंबई, पुणे, जळगाव, ठाणे, नांदेड इत्यादी ठिकाणी आयोजित केले. प्रतिभा संगम युवा साहित्यिकांचे व्यासपीठ म्हणून नावारूपाला आले. कोणतेही शासकीय अनुदान नसताना निमंत्रित साहित्यिक नवलेखकांना मार्गदर्शन करतात. यातच त्याचे वेगळेपण उठून दिसते.
प्रतिभा संगममुळे योग्य वयात नवलेखकांवर साहित्यिक संस्कार झाले. आजपर्यंत या संमेलनात राम शेवाळकर, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर, कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा, द. मा. मिरासदार, मधु मंगेश कर्णिक, विश्वास पाटील, आनंद यादव, लक्ष्मीकांत तांबोळी, प्रवीण दवणे, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, ना. धो. महानोर, बाबा भांड, श्रीकांत उमरीकर, किरण येले, इंद्रजीत भालेराव, रेणू पाचपोर, सिसिलिया कार्वालो, अशोककुमार काळे, संदीप खरे, अरुणा ढेरे, संगीता बर्वे, विठ्ठल वाघ, शरणकुमार लिंबाळे, दासू वैद्य, मनोज बोरगावकर, निर्मलकुमार फडकुले, राजन खान, प्रतिभा रानडे, जगदिश खेबूडकर, म. द. हातकणंगलेकर, डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीनारायण बोल्ली, रामचंद्र देखणे, प्रज्ञा पवार, वीणा गवाणकर, प्रदीप निफाडकर, अशोक वायगावकर, सुधीर मोघे, अशोक कोतवाल, नामदेव कांबळे, रेखा बैजल, सतीश सोळांकुरकर, विष्णू थोरे, गुरु ठाकूर, संजय जोशी, अशोक कोतवाल व खलील मोमीन अशा साहित्यिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
प्रतिभा संगममध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकही असतात. प्रतिभा संगम संचालित करणारी मंडळी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील उदयोन्मुख विद्यार्थी लेखक आणि साहित्याचा संबंध असणारे प्राध्यापक असतात. स्पर्धेत सहभागी न होता, कार्यक्रमात संयोजक म्हणून न मिरविता संमेलन यशस्वी करण्याची धडपड ते करीत असतात. संचालन समितीचा प्रमुख हा प्रतिभा संगमचा निमंत्रक असतो. निमंत्रक हा नवलेखक किंवा साहित्याचा संबंध असणारा प्राध्यापक असतो. प्रतिभा संगममुळे निमंत्रकही साहित्य चळवळीचे बाळकडू घेऊन पुढे गेल्याचे दिसून येते.
डॉ. नरेंद्र पाठक हे पहिल्या प्रतिभा संगमचे निमंत्रक होते. आज पाठक साहित्य अकादमीचे केंद्रीय सदस्य आहेत. हा त्यांचा प्रवास साहित्य चळवळीप्रती असणारे त्यांचे विशुद्ध प्रेम दर्शवतो. अखिल भारतीय साहित्य परिषदेला महाराष्ट्रामध्ये रुजविण्यात सरांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. पाठ्यपुस्तक लेखन ते साहित्यिक लेखनामध्ये सर मुशाफिरी करतात. सरांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. आनंद काटीकर मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांची व्याकरण आणि साहित्यावर विलक्षण पकड आहे. अनेक महत्त्वपूर्ण नियतकालिकांमधून सर नैमित्तिक लेखन करतात. अनेक पुस्तकांचे सरांनी भाषांतर केले आहे. मराठी अभ्यास परिषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे सर संपादकीय काम पाहातात. निकिता भागवत-कविता, गीते, जाहिरात लेखन, ललित आणि वैचारिक लेखनामध्ये मुशाफिरी करणारे एक महत्त्वाचे नाव. तीक्ष्ण निरीक्षणाने ताई समाजातील बारकावे लिखाणातून मांडतात. नुकताच त्यांना ठाणे महानगरपालिकेचा पी. सावळाराम पुरस्कार मिळाला.
डॉ. सर्जेराव रणखांब देगलूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. सर कवी व लेखक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. प्रणव पटवारी हे गीतकार, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मेघदूतचे मराठी रुपांतर त्यांनी केले आहे. अनेक प्रसिद्ध गीतांची रचना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्यांनी लिहिलेल्या गीताचे सादरीकरण झाले आहे. डॉ. गिरीश पवार शहादा येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. सर नैमित्तिक वैचारिक लेखन करीत असतात. अहमद शेख हे ‘भट्टी’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकांमुळे प्रसिद्ध आहेत.
त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ते मीडियाचे प्राध्यापक म्हणून काम करतात. प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी हे संत बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव येथे हिंदी विभागप्रमुख आहेत. सर कविता, तसेच वैचारिक आणि संशोधानत्मक लेखन करतात. नुकतेच त्यांची भारत सरकारच्या केंद्रीय हिंदी संस्थानचे प्रभारी संचालक म्हणून नेमणूक झाली आहे. विजय सुतार हा नोकरपेशा माणूस इंग्रजी आणि मराठी साहित्याचा मोठा चाहता आहे. मराठीबरोबरच इंग्रजी कविता तो लिहितो.
राम शेवाळकर यांनी पहिल्या ‘प्रतिभा संगम’मधील उद्घाटनाच्या भाषणात उद्गार काढले होते की प्रस्थापित साहित्य संमेलनात साहित्याचे नवअंकुर गुदमरून जाऊ नयेत म्हणून ‘प्रतिभा संगम’ची आवश्यकता आहे. ते उद्गार सत्यात उतरल्याचे दिसून येते. गेल्या २९ वर्षांमध्ये अशा नवअंकुरांनी मराठी साहित्यसृष्टीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
यापैकी काहींना राज्य शासनाचे व अन्य प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत, तर काहींनी वृत्तपत्र, मालिका, चित्रपट या माध्यमांतून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. डॉ. पृथ्वीराज तौर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे मराठी विभागात प्राध्यापक असून समीक्षक, कवी आणि ललित लेखनासाठी प्रसिद्ध आहेत.
मंदार भारदे उद्योजकतेबरोबरच नियमितपणे वैचारिक, पण खुसखुशीत लेखन करतात. लोकसत्तामधील त्यांचे सदर लोकप्रियता मिळवून गेले. दुर्गेश सोनार यांनी कविता आणि पत्रकारितेच्या प्रांतात आपला ठसा उमटविला. किरण केंद्रे हे शासकीय सेवेत असून महाराष्ट्र शासनाच्या ‘किशोर’ मासिकाचे संपादक आहेत. अश्विनी शेंडे यांनी मालिकांच्या शीर्षक गीतांबरोबरच चित्रपटासाठी संवाद लेखनही केले आहे. ऐश्वर्य पाटेकर आणि रवी कोरडे या दोघांनाही सकस लेखनासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
ऐश्वर्य पाटेकर यांचे ‘जू’ हे आत्मकथन खूप वाचकप्रिय ठरले. नामदेव कोळी यांचीही दखल साहित्य अकादमीने घेतली. ‘वाघूर’ हा दर्जेदार अंक ते संपादित करतात. नाशिक येथील संदीप जगताप मराठी विषयाचे प्राध्यापक असून शेतकर्यांचे प्रश्न व व्यथा मांडणारे कार्यकर्ता आहेत. नाशिकच्याच आनंद क्षेमकल्याणी यांनी निवेदन, कार्यशाळा, कविता या प्रांतांत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी ‘स्त्रग्धरा’ या उत्कृष्ट दिवाळी अंकाची निर्मिती व लेखन केले.
नारायण पुरी हे सध्याचे आघाडीचे कवीमित्र, ज्यांची ‘जांगडगुत्ता’ ही कविता सोशल मीडियावर खूपच गाजली. प्रवीण पवार यांच्या ‘भुई आणि बाई’ या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले. सागर जाधव हे नाशिकच्या चांदवड भागात चांदवडी रुपया या संस्थेच्या माध्यमातून साहित्य चळवळ चालवितात. याशिवाय बरीचशी मंडळी पत्रकारिता, शिक्षण, आकाशवाणी, साहित्यक्षेत्रात आपापल्या परीने मुशाफिरी करीत आहेतच.
तर, असे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्वे व साहित्यिक घडविणारे आगळे-वेगळे संमेलन- प्रतिभा संगम-महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जगतात महत्त्वाची कामगिरी करीत आहे. लिखाणात समाजमन डोकावित असते, तसेच लिखाणातून भविष्यातील समाज घडतही असतो. ही दोन्ही उद्दिष्ठ्ये अशा संमेलनातून साध्य होतात!