Homeसंपादकीयअग्रलेखPM Narendra Modi : चाय पे चर्चा...आता डबा पार्टी

PM Narendra Modi : चाय पे चर्चा…आता डबा पार्टी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा नेहमीप्रमाणे राजकीय रणनीती, संघटनात्मक सूत्रे आणि विरोधकांवर जोरदार टीकेचा मिलाफ ठरला. मोदींनी यावेळी महायुतीच्या आमदारांना एकजुटीचा मंत्र देत संघटनाच्या मजबुतीसाठी डबा पार्टीसारख्या सामान्य वाटणार्‍या, परंतु सामाजिक बांधिलकी निर्माण करणार्‍या सूचनांचा आग्रह धरला. चाय पे चर्चानंतर आता डबा पार्टीचा नवा फंडा मोदींनी सूचवला आहे.

मोदींचा हा दौरा केवळ एक सत्ताधारी नेत्याचा दौरा नव्हता, तर त्यामागे अनेक राजकीय उद्दिष्ठ्ये स्पष्टपणे दिसून आली. स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला मजबूत करणे, महायुतीतील अंतर्गत संघर्ष कमी करून युतीला एकसंध ठेवणे आणि काँग्रेस व विरोधकांवर वारंवार टीका करत स्वतःचे वर्चस्व अधोरेखित करणे, हा या दौर्‍याचा मुख्य हेतू होता. प्रत्येक भाषणात काँग्रेसवर टीका करणे हा जणू मोदींचा स्थायीभाव झाला आहे.

एक पंचवार्षिकमध्ये रस्ता करायचे फक्त आश्वासन देणे, दुसर्‍या पंचवार्षिकात काम होणार नाही, हे स्पष्ट करणे आणि तिसर्‍या पंचवार्षिकात काम सुरू करण्याचे वचन देणे, हा काँग्रेसचा कार्यपद्धतीचा बाणा त्यांनी उपहासात्मक स्वरात उघड केला. परंतु, अशा टीका करताना भाजपच्या सत्ताकाळातील अनेक रखडलेल्या योजनांकडे दुर्लक्ष केले.

मोदींनी गुजरातमध्ये भाजपने ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत सत्तेवर कशी पकड ठेवली, याचे उदाहरण दिले. हे उदाहरण म्हणजे महायुतीला ‘गुजरात मॉडेल’ची व्याख्या समजावून सांगण्याचा प्रयत्न होता. परंतु महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटकांमध्ये प्रचंड फरक आहे.

शिवाय इतर राज्यातून गुजरातला प्रकल्प पळवण्याचा उद्योग जसा सुरू आहे, तसाच गुजरातहून प्रकल्प आपल्या राज्यात आणण्याची हिंमत महाराष्ट्रातील नेते कशी करतील, हादेखील प्रश्न महत्त्वाचा ठरतो. दुसर्‍याचे ओरबाडून स्वत:ची सुबत्ता सिद्ध करणे जितके सोपे आहे तितके सोपे ओरबडल्यानंतरही स्वत:ला सिद्ध करणे नाही. त्यामुळे त्यांचा ‘गुजरात मॉडेल’चा सल्ला फारसा प्रभावी ठरणार नाही, असे दिसते.

महाराष्ट्रात चांगले प्रकल्प राबवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०११ साली केलेल्या गुजरात दौर्‍याचे मोदींनी उदाहरणही दिले. परंतु त्यानंतर भाजपने राज ठाकरे यांचा कसा वापर करुन घेतला यावर मात्र कुणी बोलायला तयार नाही. अन्य राज्यांमध्ये दौरे करण्यापेक्षा आपल्या राज्यातील बलस्थाने ओळखून त्यांचा विकास कसा करता येईल यावर मोदींनी भर दिला असता तर त्यातून खूप काही साध्य झाले असते.

मोदींनी महायुतीतील सर्व घटक पक्षांना भाजपच्या धर्तीवर काम करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला, हे महाराष्ट्राच्या राजकीय पटावर अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. भाजपचा संघटनात्मक पाया आणि त्यांची कार्यपद्धती देशभर ओळखली जाते, मात्र ती सर्व राज्यांसाठी लागू पडेल, हा दावा स्थानिक राजकीय वास्तवाचा विचार करता संशयास्पद ठरतो. महायुती ही भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांसारख्या राजकीयदृष्ठ्या आणि सांस्कृतिकदृष्ठ्या वेगळ्या पक्षांची युती आहे.

या पक्षांचा इतिहास, मतदारांशी असलेले संबंध आणि कार्यपद्धती भाजपच्या धर्तीपेक्षा भिन्न आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या मॉडेलवर काम करण्याचा सल्ला हा या घटक पक्षांच्या स्वायत्ततेवर आघात करण्यासारखे आहे. याशिवाय, घटक पक्षांना भाजपसारखी कार्यपद्धती स्वीकारणेही अवघड आहे. महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात भाजपपेक्षा इतर पक्षांची पाळेमुळे वेगळी आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निष्ठेचे वेगळे स्वरूप आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने स्थानिक समस्या आणि नेतृत्वाच्या नातेसंबंधांवर आधारित आहेत.

भाजपच्या धर्तीवर काम करण्यासाठी या पक्षांना संघटनात्मक आणि वैचारिक बदल करावे लागतील, जे त्यांच्या मूळ तत्त्वांशी विसंगत आहे. भाजपच्या धर्तीवर काम करण्याचा सल्ला म्हणजे महायुतीच्या राजकीय स्वरूपाचे एकसंधीकरण आहे. परंतु, हा सल्ला दीर्घकालीन राजकीय यशासाठी किती उपयुक्त ठरेल, हे अनिश्चित आहे. युतीतील घटक पक्षांनी भाजपच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास त्यांचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच, युतीतील पक्षांमध्ये ‘वरचष्म्याचा संघर्ष’ उद्भवण्याची शक्यता आहे.

भाजपने देशातील इतर राज्यांतूनही युतीतील लहानसहान पक्षांना गिळंकृत केले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसाठी भविष्यात राजकीय अस्तित्व टिकवणे अधिक कठीण होऊ शकते. म्हणूनच मोदींचे हे सल्ले इतर पक्षांना डब्यात घालणारे आहेत, अशी टीका होत आहे. मोदींचे भाषण हे त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची झलक असली तरी ते निव्वळ राजकीय मार्गदर्शन नाही, तर सत्तेच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व पातळ्यांवर भाजपची पकड मजबूत करण्यासाठीचा एका तपशिलवार योजनेचा भाग आहे.

एकूणच मोदींच्या दौर्‍यातून महाराष्ट्रातील राजकारणाला दिशा देण्याचा आणि स्वत:चा प्रभाव गडद करण्याचा त्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसतो. महायुतीतील सत्ताधारी गटाने त्यांच्या सूचनांचा किती प्रभावीपणे स्वीकार केला, हे येणार्‍या काळात दिसेल. डबा पार्टी आणि गुजरात मॉडेलच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या अनोख्या राजकीय समीकरणांनुसार नवी रणनीती आखणे, हेच महायुतीसाठी जास्त महत्त्वाचे ठरेल.