स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर कार्यकारिणी तयार होण्यास तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लागला. एखाद्या गोष्टीवर काथ्याकूट करून नंतर निर्णय घेण्याची काँग्रेसची कामाची पद्धत आहे. गांधी घराण्यातील सदस्याऐवजी खर्गे यांची निवड झाली तेव्हापासून त्यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचेच लक्ष आहे. अलीकडची कर्नाटकातील निवडणूक काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली आणि विजयही संपादन केला. त्यामुळे नव्या कार्यकारिणीवर खर्गे यांचाच प्रभाव असेल अशी जी अटकळ बांधली जात होती ती खरी ठरली आहे. असंतुष्ट नेत्यांना ‘आपलेसे’ करून घेण्याचा प्रयत्न या कार्यकारिणीत झाला आहे. ‘जी-२३’ गटामधील शशी थरूर, आनंद शर्मा आणि मनिष तिवारी यांना कार्यकारिणीत समावून घेण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र ‘जी-२३’ गट मानवला नसल्याचे दिसते. चव्हाण यापूर्वीच्या कार्यकारिणीत नव्हते, तसे यावेळीही नाहीत. दुसर्या चव्हाणांचे मात्र नशीब फुलले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात येऊन महाराष्ट्रातील त्यांचे महत्त्व वाढविण्यात आले आहे. अशोक चव्हाण मध्यंतरी भाजपमध्ये जाणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार अशा निरनिराळ्या वावड्या उठत होत्या. त्यांची राष्ट्रीय स्तरावर आता निवड झाल्याने या वावड्यांना आता पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पद किंवा सदस्यत्व मिळण्यासाठी अनेक नेत्यांचा प्रयत्न असतो.
यावेळी महाराष्ट्राला झुकते माप मिळाले असून, अशोक चव्हाण यांच्यासह मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या आठ जणांची वर्णी लागली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणेच गांधी परिवाराशी जवळीक असलेले आणि यापूर्वी कार्यकारिणीत असलेले बाळासाहेब थोरात यांना दूर ठेवण्यात आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील भाच्यावरील (सत्यजीत तांबे) प्रेम त्यांना बहुधा नडले असण्याची शक्यता आहे.
कार्यकारिणीच्या ३९ सदस्यीय संख्येत १५ महिलांना स्थान देण्यात आले आहे. गांधी परिवारातील सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वड्रा कार्यकारिणीत आहेत. उत्तर प्रदेशातील एखादा वजनदार नेता या कार्यकारिणीत नसल्याने आश्चर्य व्यक्त झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. येत्या काही महिन्यांत लोकसभेची निवडणूक लागेल. काँग्रेसची गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गाठ असल्याने तेथून माजी प्रदेशाध्यक्ष जगदिश ठाकोर यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या वर्ष अखेरीस राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी मध्यंतरी पंगा घेणारे युवा नेते सचिन पायलट यांना कार्यकारिणीत घेण्यात आले आहे.
मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग हेही कार्यकारिणीत आहेत. गेल्या निवडणुकीत राजस्थानप्रमाणे मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या गळाला लागले आणि राज्य काँग्रेसच्या हातून गेले. छत्तीसगढमध्येही भाजपने घोडाबाजार करून हे राज्य काँग्रेसकडून हिसकावून घेतले. राजस्थानमध्ये मात्र असा कोणताही प्रयोग यशस्वी झाला नाही. ही तीनही राज्ये आपल्याकडे पुन्हा खेचून आणण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहील. यासाठी कार्यकारिणीत तेथील प्रमुख नेत्यांना सामावून घेण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने दलित, मुस्लीम अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या नेत्यांना कार्यकारिणीत सामावून घेताना महिलांनाही योग्य ते प्रतिनिधित्व दिल्याचे दिसते. त्यामुळे ही कार्यकारिणी सर्वसमावेशक आहे असे म्हटले तर गैरलागू ठरणार नाही. एकाचवेळी सक्रीय आणि नाराजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न खर्गे यांनी केलेला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला संपूर्ण देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या यात्रेने राहुल गांधी यांना लोकप्रियताही मिळवून दिल्याची वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. भाजपाने राहुल यांची जाणीवपूर्वक बनवलेली ‘पप्पू’ ही प्रतिमा त्यामुळे पुसण्यास मदत झाली. काही दिवसांपूर्वी लडाख, लेहमध्ये केलेला दौराही गाजला. त्यामुळे राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता भाजपासाठी डोकदुखी बनू पहात आहे, त्याचप्रमाणे या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न खर्गे आणि त्यांच्या सहकार्यांना करावा लागेल. कर्नाटकमधील विजयाने हुरळून जाणे काँग्रेसला परवडणारे नाही. निर्णयही वेगाने घ्यावे लागतील. कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही ठिकाणी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले होते.
भाजपाने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काही राज्यांमध्ये हा फॉर्म्युला राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खर्गे टीमला आक्रमक होऊन कर्नाटकप्रमाणे निवडणूक होणार्या राज्यांमध्ये आपलेही उमेदवार जाहीर करण्याची खेळी खेळावी लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला बर्याच कालावधीनंतर कधी नव्हे इतके अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सव्वा वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार आल्यानंतर आता राष्ट्रवादीतील एका गटानेही या युतीत पावन करून घेतले आहे. सर्व पक्षांतून फाटाफूट होत असताना राज्यातील काँग्रेस अभेद्य राहिल्याचे चित्र आहे. तशातच नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्राला एक प्रकारे वजन प्राप्त झाले आहे. याचा लाभ अशोक चव्हाण आणि इतर सदस्य पक्षाला कसा करून देतात, हे लक्षवेधी ठरणार आहे.