राज्यातील मुंबई आणि पुण्यातील हवेचे प्रदूषण चिंताजनक आहे. राजधानी दिल्लीसारखेच मुंबई महानगरीला प्रदूषणाने घेरले आहे. मुंबई महानगरपालिकेने हा हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत, पण त्यांचेही काटेकोरपणे पालन होईल का, हा खरा प्रश्न आहे. नियम हे मोडण्यासाठीच असतात, हे मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही लोकांनी दाखवून दिले आहे. न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी दिवसातील दोन तास दिले होते, पण त्याचे कुठेही पालन झाले नाही.
त्यावर अंकुश लावण्यासाठी ना पालिकेकडे यंत्रणा होती, ना पोलिसांकडे. रविवारी लक्ष्मीपूजनाला मुंबईत अवघ्या चोवीस तासात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा (एक्यूआय) स्तर २८८ या धोकादायक पातळीवर पोहोचला. आत्ताच आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर आलो आहोत, याची जाणीव कोणालाही नाही, याचे सखेद आश्चर्य वाटते. मुंबईतील हवा प्रदूषित बनल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशा विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या तोंडावर पुन्हा एकदा मास्क दिसू लागले आहेत. मास्क लावण्याची वेळ का ओढावली, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यात डेंग्यूसारखे आजार आहेतच. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाला होता.
त्यातून ते बरे होत नाहीत तोच, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यू झाला आहे. एकीकडे मुंबई-पुण्यातील हवा प्रदूषित झालेली असताना राजकीय हवादेखील दिवसेंदिवस प्रदूषित होत असल्याचे दिसत आहे. अर्थात, आगामी लोकसभा निवडणुकांची चाहूल लागल्यानेच प्रत्येक पक्ष अस्तित्वासाठी उसळी घेत आहे, पण ही उसळी घेत असताना आपल्याच मित्र पक्षाला किंवा आपल्याच पक्षातील इतरांना त्याचा फटका बसत आहे, याचे भान कोणालाच नाही. भाजपने महाविजय संकल्प २०२४ अभियान सुरू केले आहे. यात शिंदे गट आणि अजित पवार यांचे स्थान काय असेल, हा प्रश्न यामुळे निर्माण होतो. या संकल्पात हे दोन्ही गट सहभागी झालेले दिसत नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुका आम्ही एकत्र लढविणार असल्याच्या महायुतीच्या घोषणा निरर्थक ठरतात.
लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच शिंदे गटाला २८८पैकी केवळ ५० जागाच देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सारवासारव करावी लागली, हेही सर्वश्रुतच आहे. जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाचे लक्ष्य साधेसुधे तर नक्कीच नसेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त करत आपले म्हणणे खरे करून दाखवल्याची उदाहरणे आहेतच. अर्थ खाते त्यांनी याच प्रकारे आपल्याकडे खेचून घेतले. जुलै महिन्यातच मुंबईच्या वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये झालेल्या सभेत यावेळी विधानसभेच्या ७१ हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.
त्यामुळे ते आपल्याला पाहिजे तितक्या आणि हव्या त्या जागा पदरी पाडून घेणार, हे उघड आहे. एकूणच आगामी निवडणुका या खर्या अर्थाने महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा वाद, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दोघे या जागेसाठी एकमेकांना भिडले आहेत. गजानन कीर्तिकर यांची ही जागा आपला मुलगा सिद्धेश कदम यांना मिळावी, अशी रामदास कदम यांची इच्छा आहे. त्यामुळे या दोघांनी एकमेकांचा बेईमान, गद्दार वगैरे उल्लेख करत, एकमेकांचे वाभाडे काढले. विशेष म्हणजे, ज्यांच्या विचारांचे पाईक असल्याचे सांगत या नेत्यांनी बंडखोरी केली, त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे एकमेकांवर कुरघोड्या केल्या होत्या, हे यानिमित्ताने पुढे आले आहे.
रामदास कदम यांनी तर मंगळवारी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचा उल्लेख करत व्यक्तिगत हल्ला केला. विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या नेत्याने असे पातळी सोडून बोलणे योग्य नाही. अर्थात, त्यांचा जीभेवर ताबा नसल्याचे यापूर्वीदेखील पहायला मिळाले आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना त्यांनी अशीच अघळपघळ भाषा वापरली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यात हस्तक्षेप करावा लागला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर आमच्यातील वादावर पडदा पडला असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. त्याचबरोबर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत.
त्यामुळे भविष्यात पक्षाने गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ, असेही रामदास कदम यांनी सांगत कीर्तिकर यांचा शिंदे गटात वरचष्मा असल्याचे मान्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुंकर मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला असला तरी, आग पूर्णपणे विझलेली नाही. त्याच्यावर राख बसली आहे. खुद्द रामदास कदम यांनीच त्याची कबुली दिली आहे. व्यक्तिगत पातळीवर केलेल्या टीकेचे समर्थन करताना ‘ज्याची जळते त्यालाच कळते,’ असे त्यांनी म्हटले आहे. हीच जळजळ उमेदवारीपासून मंत्रीपदापर्यंत सर्वत्र दिसत आहे आणि याच जाळणातून निघणारा धूर राजकारणाचे वातावरण प्रदूषित करत आहे, असे म्हटले तर गैर ठरणार नाही.