घरसंपादकीयअग्रलेखमाझ्यापेक्षा मोठे होऊ नका...

माझ्यापेक्षा मोठे होऊ नका…

Subscribe

राजकारणात लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी म्हणून काम करत असताना बरेचदा आपल्याच पक्षातील सहकार्‍यांशी स्पर्धा करावी लागते. राजकारणात पुढे जाण्यासाठी अन्य पक्षांतील नेत्यांसोबत स्पर्धा करण्याची गोष्ट एकवेळ समजण्यासारखी आहे, पण जेव्हा हीच स्पर्धा आपल्याच पक्षातील सहकार्‍यांसोबत करावी लागते तेव्हा बरेचदा परिस्थिती अवघड होऊन बसते. त्यामुळे राजकारणात पुढे जाण्यासाठी पक्षांतर्गत स्पर्धकांवर मात करणे हेही एक मोठे आव्हान असते. त्यामुळेच राजकारणात जेव्हा आपल्या हाताखाली काम करणारा मंत्री किंवा पदाधिकारी चांगले काम करून लोकप्रिय होत असतो तेव्हा मुख्य नेत्याला स्वत:च्या भविष्याविषयी चिंता वाटू लागते. त्यामुळे मंडळी जरी एकत्र काम करत असली, एकत्र जेवत असली तरी मनात मुख्य नेत्याला चिंता सतावत असते. त्यामुळेच मोठे व्हा, पण माझ्यापेक्षा मोठे होऊ नका, असा संदेश मुख्य नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे दिला जात असतो. किंबहुना राजकारणातील हे एक सूत्र मानले जाते. त्यामुळेच चांगले काम करणारा एखादा प्रामाणिक पदाधिकारी पक्षनेतृत्वाला डोईजड वाटू लागतो. त्यापेक्षा जो आपल्याला डोईजड होणार नाही, आपण सांगितलेले ऐकेल अशा व्यक्तीला पुढे आणले जाते आणि ज्याची भीती सतावते त्याचे पंख छाटले जातात. ज्यामुळे तो माणूस पक्षात राहिला तरी त्याला फार मोठ्या भरार्‍या मारता येणार नाहीत. भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले. गडकरी यांच्यासारख्या कर्तृत्ववान मंत्र्याला वगळण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य लोकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. गडकरी महाराष्ट्रात मंत्री असल्यापासून त्यांचा कामाचा आवाका प्रचंड असल्याचे लोकांनी पाहिलेले आहे. कुठल्याही मंत्र्यासमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे त्याच्या खात्याकडून आखण्यात आलेल्या मोठ्या योजना आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी लागणारा पैसे कुठून आणि कसा उभा करायचा? बर्‍याच योजना या कागदावर असतात, पण त्या निधीअभावी रखडलेल्या दिसतात. या योजनांसाठी लागणारा सगळा पैसा सरकारच्या तिजोरीतून मिळेलच असे नाही. त्यासाठी विविध पर्याय शोधावे लागतात. त्यासाठी त्या व्यक्तीचा मोठ्या लोकांशी चांगला संपर्क असावा लागतो. अर्थपुरवठा करणार्‍या विविध संस्थांशी त्याचा चांगला परिचय असावा लागतो.

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना आपल्या कामाचा आवाका दाखवून दिला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, पण ते प्रत्यक्षात उतरविण्यात अनेक अडचणी होत्या. त्यावर संयमाने मात करत ते स्वप्न नितीन गडकरी यांनी पूर्ण केले. मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होईल. त्यामुळे त्यासाठी अनेक उड्डाणपूल उभारावे लागतील याची कल्पना मंत्री असलेल्या गडकरींना आली. त्यानंतर त्यांनी उड्डाणपूल उभारण्याचे आव्हान स्वीकारून अल्पावधीत ते पूर्ण केले. त्यासाठी त्यांनी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वाचा अवलंब केला. महामार्ग आणि पूल उभारणीत तर गडकरींचा हातखंडाच होता. त्यामुळे केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा गडकरींकडे देशभरात सुवर्ण चतुष्कोन रस्ते उभारण्याची जबाबदारी देण्याचा विचार सुरू झाला. कल्पकता ही गडकरींची खासियत आहे. नितीन गडकरी हे जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तेव्हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांचा वावर आणि जवळीक ही त्यावेळचे भाजपचे राष्ट्रीय नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्याशी होती. तेव्हा नरेंद्र मोदी हे प्रादेशिक नेते होते. पुढे २०१४ साली परिस्थिती बदलली. भाजपला राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडू शकणार्‍या नेत्याची गरज होती. कारण वाजपेयींनंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार मानल्या जाणार्‍या लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लढल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे गुजरातचे विकास पुरुष म्हणून ज्यांचा देशभरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजत होता, त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणले जावे, असा जोर भाजपच्या प्रादेशिक नेत्यांकडून सुरू झाला. त्यातूनच मोदींना राष्ट्रीय पातळीवर आणण्यात आले. पुढे लोकसभेची निवडणूक झाली. त्यात महाराष्ट्रात मोदींच्या लाटेमुळे भाजपला अभूतपूर्व असे यश मिळून महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था दोन आणि चार खासदार अशी झाली. मोदींच्या लाटेतच नितीन गडकरी लोकसभेवर निवडून गेले होते.

- Advertisement -

गडकरी हे अतिशय प्रतिभावान आणि कामाचा प्रचंड उरक असलेले नेते आहेत, पण त्यांची कमतरता ही आहे की त्यांनी अनेक विकासकामे केलेली असली तरी महाराष्ट्रात असताना त्यांना लोकांमधून निवडून येता आले नाही. त्यांना सरकारमध्ये नेहमी विधान परिषदेच्या माध्यमातून प्रवेश करावा लागला. याला बॅक डोअर एण्ट्री असे म्हटले जाते. गडकरींनी अंधेरी येते नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात असे म्हटले की, नका देऊ म्हटले तरी लोक मला मते देतील, पण गडकरींचा आत्मविश्वास प्रत्यक्षात उतरेल का, कारण महाराष्ट्रात असताना ते कार्यसम्राट असतानाही त्यांना आपला मतदारसंघ निर्माण करून कधी विधानसभेवर निवडून येता आले नाही. त्यांच्या पक्षातील दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला खासदारकीची निवडणूक लढवून जिंकण्यासाठी आठ कोटी रुपये खर्च आला, असे जाहीर विधान करून निवडणूक आयोगासह सगळ्यांनाच धक्का दिला होता. खरे तर नरेंद्र मोदी यांनी गडकरींचे टेन्शन घेऊन त्यांचे पंख छाटण्याची गरज नव्हती. त्यामुळे गडकरींच्या कामातील जोश ओसरण्याची शक्यता आहे. परिणामी मोदी सरकारचेच नुकसान होणार आहे. कारण केवळ सत्ता मिळवून चालत नाही. आपल्या मंत्रिमंडळात कामाचा झपाटा आणि आवाका असलेले मंत्री असावे लागतात. नितीन गडकरी हे काही मोदींना पंतप्रधानपदाचे स्पर्धक होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा मोदींना खरे तर इतका धसका घेण्याची गरज नव्हती, पण आज मोदी-शहांसमोर दोन शब्द सडेतोड बोलणारे गडकरीच आहेत. नेमके तेच या दोघांना पटत आणि पचत नसावे. त्यामुळे आपल्या प्रत्येक वक्तव्याची सुरुवात वंदनीय मोदीजी या शब्दांनी करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय पातळीवर बढती देण्यात आली असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -