घरसंपादकीयअग्रलेखससूनच्या अहवालाला कारवाईची प्रतीक्षा

ससूनच्या अहवालाला कारवाईची प्रतीक्षा

Subscribe

ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात चर्चेत आलेले पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) संजीव ठाकूर यांना दणका देत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची डीन पदावरून हकालपट्टी केली आहे. ललित पाटीलला ससून रुग्णालयात पंचतारांकित सुविधा देण्यात संजीव ठाकूर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामुळे पुन्हा एकदा या ड्रग्ज प्रकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक आणि केंद्राच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकांनी वेळोवेळी कारवाई करून राज्यातील ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे बर्‍यापैकी उलगडले आहेत.

ड्रग्ज तस्करी आणि उत्पादन करणार्‍या डझनभराहून अधिक आरोपींना पोलिसांनी अटक केली असून नाशिक, पुणे, पालघर, सोलापूर आदी ठिकाणचे कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्ज उत्पादनाचे कारखानेही उद्ध्वस्त केले आहेत. काही ठिकाणी तर गुजरातमधील तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात येऊन कारवाई केली. यावरून हे ड्रग्ज रॅकेट देशभरात सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप तरी या ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यास तपास यंत्रणांना यश आलेले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी थोडी कळ सोसावी लागेल. त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. जसजशी या प्रकरणातील तथ्ये बाहेर येतील, तसतशी अनेकांची तोंडे बंद होतील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्या या इशार्‍यामागे अर्थातच काही राजकीय समीकरणे आहेत. ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात काही राजकीय नेत्यांचा खासकरून राज्याच्या महायुती सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचे आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले होते. यामुळे महायुती सरकार काही काळ अडचणीत आले होते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे ललित पाटीलला पुण्याच्या ससून रुग्णालयात ९ महिने अभय देणारे आणि त्याला पळून जाण्यास मदत करणारे राजकीय नेते आणि रुग्णालय प्रशासनाच्या अधिकार्‍यांवरील कारवाईचे काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पोलीस याचा तपास करीत आहेत. तो पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.

ललित पाटील हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून आपले ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यासाठी तो रुग्णालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना लाच म्हणून लाखो रुपये देत असल्याचे समोर आले आहे. ललित पाटील खोट्या वैद्यकीय अहवालांच्या आधारे ससून रुग्णालयात ९ महिने तळ ठोकून होता. तिथे त्याला पंचतारांकीत सुविधा देतानाच ड्रग्ज तस्करीसाठी रुग्णालय प्रशासनातील अधिकारी मदत करत होते. त्याचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल सादर करून १५ दिवस उलटूनदेखील अद्याप कुणावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी डीन संजीव ठाकूर यांचे स्वाक्षरी असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या वैद्यकीय अहवालात ललितला अनेक आजार झाल्याचे नमूद होते.

- Advertisement -

असे असूनही राज्य सरकार मूग गिळून गप्प होते. आतादेखील डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर झालेली कारवाई ही ड्रग्ज तस्करी प्रकरणात झालेली नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. डॉ. जे. जे. रुग्णालयाच्या उपअधिष्ठातापदी राहिलेल्या डॉ. विनायक काळे यांची दीड वर्षापूर्वी पदोन्नतीने ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाली होती, मात्र ३ वर्षांच्या आत राज्य सरकारने जानेवारीत त्यांची बदली महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी करत ससूनचे अधिष्ठातापद डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे सोपवले होते. त्यावेळी डॉ. ठाकूर हे सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. या निर्णयाविरोधात डॉ. काळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. याप्रकरणी मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. मॅटच्या या निर्णयाला डॉ. ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

अखेर उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती रद्द करून काळे यांच्याकडे हे पद पुन्हा सोपविण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. ठाकूरदेखील ललितच्या साथीने ड्रग्ज तस्करी करत होते. ललित पाटीलने पोलीस, डॉक्टर तसेच रुग्णालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांना जे पैसे दिले होते, त्या पैशांचे काय झाले, संबंधितांची चौकशी कधी होणार? पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाखाली ससूनच्या बाबतीत कोणताही तपास करत नाही, असे एक ना अनेक धक्कादायक आरोप धंगेकरांनी केले आहेत. न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

धंगेकरांच्या आरोपानंतर परवा राज्याचे अतिरिक्त पोलीस संचालक संजय सक्सेना यांनी ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य रितीने सुरू असून त्यात कुठल्याही राजकीय नेत्याचा सहभाग नसल्याचा खुलासा केला आहे, परंतु हा खुलासा पुरेसा नाही. फडणवीसांच्या म्हणण्याप्रमाणे ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हाती लागेल तेव्हा लागेल, त्यासाठी सरकारने निश्चितच वेळ घ्यावा, परंतु हाती आलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्याची धमकदेखील दाखवावी, अन्यथा ड्रग्ज तस्करीच्या नावाखाली कारवाईची थट्टामस्करी होतच राहील. त्यामुळे या गुन्ह्यात सामील प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत राजकीय नेत्यांवरील संशयाचे धुकेही अधिक गडद होत जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -