काँग्रेसची फिटनेस यात्रा!

संपादकीय

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची बहुचर्चित ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पक्षाचे नेते या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करीत होते. स्वाभाविक यात्रेचे अपेक्षेप्रमाणे जल्लोषात स्वागत झाले. २०१४ पासून सुरू झालेल्या मोदी झंझावातात काँग्रेस सैरभैर झाली. कुंपणावर बसलेले अनेक नेते भाजप आणि इतर पक्षात डेरेदाखल झाले. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिज्ञा असल्याने काँग्रेसला संपविण्याचे हरतर्‍हेने प्रयोग सुरू आहेत. कधी काळी संसदेत लक्षणीय सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसची ४० सदस्य निवडून येतानाही दमछाक झाली. विरोधी पक्षनेतेपदही या पक्षाला मिळू शकलेले नाही. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आजारपणामुळे पुरेसा वेळ देऊ न शकल्याने राहुल गांधी यांची जबाबदारी वाढली. पुढे ते पक्षाचे अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात भाजपकडून त्यांची खिल्ली उडविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे या पक्षाची अवस्था अधिकच केविलवाणी झाली. यातून अलिकडे पक्षातील बुजुर्ग मंडळींनी गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्ष मिळावा अशी मागणी लावून धरली. काही दिवसांपूर्वी लोकशाही पद्धतीने पक्षाची निवडणूक पार पडली.

८० वर्षीय मल्लीकार्जुन खरगे विरुद्ध तरुण तुर्क शशी थरूर अशी लढत झाली. यातून पक्षाने लोकशाही मूल्यांना महत्व दिले जात असल्याचा संदेश व्यवस्थितपणे पोहचविला. ही निवडणूक एकतर्फी असली तरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि बुजुर्ग खरगे यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आली. एक अनुभवी आणि संयमी नेता अशी त्यांची ख्याती असली तरी ते वयोमानामुळे पक्ष संघटनेला ‘रिचार्ज’ करण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष बदलासाठी निवडणूक प्रक्रिया होत असताना राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी कर्नाटकमधून मतदान केले. पक्षात अध्यक्ष बदलल्याने सगळे नाराज नेते एकत्र येत असताना राहुल गांधी यांच्या यात्रेला दिवसागणिक जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. परिणामी पक्षात एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण आले आहे, किंबहुना २०१४ पासून आलेली मरगळ झटकण्यास काही प्रमाणात मदत झाल्याचे नाकारता येणार नाही.

राहुल गांधी यांची पदयात्रा १५० दिवसांची म्हणजे जवळपास ५ महिन्यांची आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जानेवारीत यात्रेचा प्रवास संपेल तेव्हा ३ हजार ५७० किलोमीटर इतके अंतर पूर्ण झालेले असेल. दक्षिणोत्तर असा प्रवास असलेली यात्रा १२ राज्यांतून जात आहे. स्वत: राहुल गांधी दररोज २२ ते २३ किलोमीटर अंतर दोन टप्प्यात पायी चालत आहेत. सुरुवातीला या यात्रेवर भाजपकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. या टीकेची पातळी राहुल गांधी यांच्या पायातील बुटांपर्यंत घसरली होती. मात्र प्रत्येक ठिकाणी यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने भाजपसह विरोधकांची टीकेची धार बोथट झाल्याचे लक्षात येते. यात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत प्रत्यक्ष चर्चा केली जात आहे. भाजपच्या कार्यपद्धतीवरून नाराज असलेल्यांना पद्धतशीरपणे यात्रेत समावून घेतले जात आहे. सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य राहुल गांधींसोबत चालत असल्याचे देश पाहत आहे. नौदलाचे माजी प्रमुख एल. रामदास व्हीलचेअरवरून यात्रेत सहभागी झाले. सेलिब्रिटी पूजा भटही आली. रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला तेलंगणात सहभागी झाली तर, गौरी लंकेशचे कुटुंबीयही राहुल गांधींना भेटले.

राहुल गांधी यात्रेत स्थानिक मुलांबरोबर धावले, बसवर चढून जनसमुदायाला अभिवादन केले. ज्यांना कुणी विचारत नाही अशा समाजातील पुरुष-महिलांनाही ते आवर्जून भेटत आहेत. चालताना, धावताना आपण किती फिट आहोत याचे दर्शन राहुल गांधी यांनी घडविले. त्यांच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून तेही अधिक फिट किंवा तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतील. मात्र हा फिटनेस त्यांच्या पक्षाला कितपत तंदुरुस्त करेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. येत्या महिनाभरात गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभेसह दिल्ली महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या यात्रेचा पक्षाला किती उपयोग झालाय याची लिटमस चाचणी होणार आहे. ते स्वतः प्रचारात सहभागी होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुजरात, हिमाचलमध्ये भाजपच्या कडव्या आव्हानाचा काँग्रेसला मुकाबला करायचा आहे. तर दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपशी मुकाबला आहे. काँग्रेसला आगामी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी फिट करायची असेल तर समविचारी पक्षांबरोबर युती करणे अटळ ठरणार आहे. कारण भाजपला काँग्रेस एकटी पुरून उरेल अशी सध्या परिस्थिती नक्कीच नाही, कदाचित पक्षाच्या नेत्यांना याची पूर्ण खात्री आहे.

काँग्रेसची मरगळ झटकण्यासाठी भारत जोडो यात्रेचा पूरेपूर उपयोग करून घेण्याचे कसब पक्षाच्या नव्या अध्यक्षांना दाखवावे लागणार आहे. आक्रस्ताळेपणा ही खर्गे यांची ख्याती नसल्याने पक्ष सोडून गेलेल्यांना ते पुन्हा सोबत आणण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. भाजपकडून सततच्या होणार्‍या टीकेच्या मार्‍याला तोंड देताना हा बुजुर्ग नेता तरुणांमध्ये कसा उत्साह निर्माण करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. नेहरू-गांधी धराण्याला लक्ष्य करण्याची भाजप एकही संधी सोडत नाही. यावर खर्गे आणि त्यांची टीम कशी प्रत्युत्तर देणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. २०१७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपला जेरीस आणले होते. गेल्या काही वर्षांत भाजपचा ‘सत्ता बळकाव’ खेळ देशाने पाहिला. गोवा, मध्य प्रदेशमधील सत्तांतर काँग्रेसच्या जिव्हारी लागलेले आहे. भाजपने अनेक ठिकाणी खेळलेला रडीचा डाव काँग्रेसला उलटवून टाकण्यासाठी फार सावध पावले उचलावी लागणार आहेत.

बहुचर्चित ही यात्रा महाराष्ट्रात कमालीची मरगळ आलेल्या काँग्रेसला तारणार का, हेही पहावे लागेल. २० नोव्हेंबरपर्यंत यात्रा महाराष्ट्रात आहे. या दरम्यान दोन जाहीर सभाही होत आहेत. यात्रेच्या स्वागतासाठी जो माहोल तयार करण्यात आलाय त्यातील उत्साह टिकवून ठेवण्याची जबाबदारी राज्यातील नेत्यांवर आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पालिका, महापालिका, शिवाय तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी आदी मुद्यांवरून जनतेची तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक होऊन केंद्राविरोधात वातावरण निर्मिती करतेय असे क्वचितच दिसले. जनतेचे प्रश्न हाती घेऊन पक्षाला रस्त्यावर उतरावे लागेल. भाजप सर्वच दृष्टीने ‘स्ट्राँग’ या व्याख्येत बसत आहे. त्यामुळे काँग्रेसला आपला फिटनेस वाढवावा लागेल.