घरसंपादकीयअग्रलेखबिहारी अवसानघात!

बिहारी अवसानघात!

Subscribe

बिहारचे राजकारण नेहमी दोलायमान राहिले आहे. एका दिवसात राजकीय चित्र पालटून टाकण्यात बिहारी राजकारण्यांचा हात कुणी धरणार नाही. त्यात नितीश कुमार यांचा तर नाहीच नाही! सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, पुन्हा तेच पद सन्मानाने मिळते काय, हा प्रकारच अचंबित करून टाकणारा आहे. भाजपशी फारकत घेऊन नितीश कुमार इंडिया आघाडीत सामील झाले तेव्हा ते इथे किती दिवस रमतील, असा सवाल तेव्हाच उपस्थित केला गेला होता.

शेवटी तसेच झाले. त्यांनी इंडिया आघाडीसोबतचा घरोबा तोडला आणि भाजपशी पुन्हा जवळीक साधली. इतकेच नाही तर आपले मुख्यमंत्रीपदही शाबूत राहील याची दिल्लीश्वरांकडून हमी मिळवत त्या पदाचा मुकुट डोक्यावर चढवला. अर्थात नितीश कुमारांनी ‘राग बिहारी’ वेळोवेळी आळवताना विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनाही बुचकळ्यात टाकले आहे. बिहारसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिल्याने पंतप्रधानपद आपल्यापासून फार दूर नाही ही त्यांची सुप्त भावना कधी लपून राहिलेली नाही.

- Advertisement -

गतकाळात भाजपसोबत असताना नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचा चेहरा असणार हे स्पष्ट झाल्याने नितीश कुमार भाजपपासून दूर झाले. इंडिया आघाडीतही ते त्याच इराद्याने आले होते हे उघड गुपित आहे, पण तिथे डाळ शिजणार नसल्याचे लक्षात आल्याने ते गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या बैठकांपासून दूर होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीला धोका देणार्‍या नितीश कुमार यांना ‘अवसानघातकी’ म्हटले आहे. येत्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यात बिहारमध्ये जनता दल युनायटेडचा दबदबा कायम कसा राहील हे त्या पक्षाचे अध्यक्ष असलेले नितीश कुमार निश्चित पाहणार यात शंका नाही. त्यामुळे भाजप आणि एनडीएसाठी बिहारमधील जागावाटप डोकेदुखी ठरले तर आश्चर्य वाटणार नाही.

एक मुरब्बी राजकारणी अशी नितीश कुमारांची ओळख राहिली आहे. राजकीय वारे पाहून आपले राजकारण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. इंडिया आघाडीचे निमंत्रक राहिलेले नितीश कुमार काँग्रेससाठी बिहारमध्ये अडचण ठरणार होते. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विजय मिळविल्यानंतर काँग्रेसच्या रूपाने भाजपला सक्षम पर्याय निर्माण झाला होता. या चित्राला डागाळण्याचे काम नितीश कुमार यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचा अवसानघातकी असा उल्लेख केला गेला असला तरी काँग्रेसची चिंता लपून राहिलेली नाही. बिहारमध्ये अवघ्या दोन वर्षांत झालेले हे सत्तांतर आहे, तर २० वर्षांच्या कालावधीत तब्बल नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे.

- Advertisement -

राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांचा शिष्य म्हणविणारा हा नेता प्रत्यक्षात सोयीप्रमाणे कोलांटउड्या मारत राहिला आहे. त्यामुळे तत्त्वनिष्ठ लोहिया, जयप्रकाश या विभूतींचे नाव घेण्याचा अधिकार नितीश कुमारांना अजिबात राहत नाही. कारण हा नेता मुळात राजकीय नीतीमूल्यांपासून खूप दूर आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी नावाने चूल मांडल्यानंतर ती पुढे मोडीत काढत जनता दल युनायटेडची स्थापना करून लालूप्रसादांविरोधात शड्डू ठोकले. त्यात ते यशस्वीही झाले.

पुढे २००५मध्ये भाजपसोबत त्यांचे जमले, पण तेथेही त्यांची पंतप्रधानपदाची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. किंबहुना त्यांनी आपले राजकीय उपद्रवमूल्य दाखविण्याचा हरतर्‍हेने प्रयत्न केला. म्हणूनच २०१३मध्ये भाजपकडून पंतप्रधानपदासाठी गुजरातच्या नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आले तेव्हा त्यांनी भाजपची साथ सोडत लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत जुळवून घेत २०१४ची निवडणूक जिंकली. जदयु, लालूप्रसाद आणि काँग्रेसच्या महागठबंधनमध्ये २०१७ साली वितुष्ट आले. पुन्हा नितीश भाजपसोबत गेले आणि त्या पक्षासोबत राज्यात सत्ता स्थापन केली.

सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतचा घरोबा त्यांच्यासाठी फळाला आला, मात्र त्याच्याच पुढील वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने जदयु-भाजपला जेरीस आणले. कसेबसे निसटते बहुमत त्या निवडणुकीत नितीश कुमार यांना मिळाले. राजकारण हे आपल्या सोयीसाठी खेळायचे असते हा ‘मूलमंत्र’ पाळणार्‍या नितीश कुमार यांनी दोन वर्षांतच राजदसोबत घरोबा करत लालूप्रसाद यादव यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा एकदा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जवळ केले आहे. २० वर्षांत लटपटी-खटपटी करीत नऊ वेळा मुख्यमंत्रीपद मिळविलेले नितीश कुमार यांची राजकीय विश्वासार्हता धुळीला मिळण्याचे दिवस दूर नाहीत हे आता स्पष्ट आहे.

इंडिया आघाडीने त्यांचे जसे सुरुवातीला लाड पुरवले तसे ते भाजपकडून बिलकूल पुरवले जाणार नाहीत ही काळ्या दगडावरील रेघ आहे. दुसरे पक्ष आपल्या खिशात घेऊन फिरणार्‍या नितीश कुमार यांचा जदयु उद्या भाजपनेच खिशात घातला तर आश्चर्य वाटणार नाही. नितीश कुमार यांच्या भाजपसोबतच्या नव्या घरोब्याने इंडिया आघाडीवर किती परिणाम होणार हे पाहण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल. राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’ पश्चिम बंगाल आणि बिहारमधून जाणार असतानाही विश्वासात घेतले नाही हा ममता बॅनर्जी आणि नितीश कुमारांचा राग लपून राहिलेला नाही. त्यातूनच हे नाराजीनाट्य घडले आहे. या नाराजीची व्याप्ती वाढू न देण्यासाठी काँग्रेससह इंडिया आघाडीला डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -