Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख फडणवीसांना केंद्रीय लगाम!

फडणवीसांना केंद्रीय लगाम!

Subscribe

गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर किंगमेकर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. नाईलाजाने त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. आता तर विधानसभेच्या निवडणुकीला सव्वा वर्षाचा कालावधी उरला असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसतील की नाही याबाबत राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच केंद्रीय नेतृत्वाकडून गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बळ दिले जात असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील राजकारणातील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील वजन वाढले. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने नितीन गडकरींसारख्या मातब्बर नेत्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. त्यामुळेच नितीन गडकरी यांची नाराजी अनेकदा त्यांच्या भाषणातून व्यक्त होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आपली ताकद बर्‍यापैकी वाढवून राज्यातील स्थान पक्के केले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी राज्यातील पक्षीय स्पर्धकांनाही एकेक करत बाद करण्यात यश मिळवले. भाजपच्या पहिल्या फळीतील मोठे नेते असलेले एकनाथ खडसे यांचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाव घेतले जात होते, पण फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. पुढे कथित भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांनी राजीनामा दिला होता.

- Advertisement -

या आरोपांबाबत पुढे काहीही निष्पन्न झाले नसूनही खडसे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाला नाही. पक्षांतर्गत कोंडी होऊ लागल्याने खडसे राजकीयदृष्ठ्या पुरते हतबल झाले होते. पक्षांतर्गत राजकारणाचा बळी ठरलेल्या खडसेंनी थेट राष्ट्रवादीची वाट धरली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाटेतील एक अडसर दूर झाला. पंकजा मुंडे याही मुख्यमंत्रीपदाच्या भाजपच्या दुसर्‍या बड्या नेत्या, पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ही घोषणा पंकजा मुंडे यांना महागात पडली. त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामधील संघर्ष अनेकदा चव्हाट्यावर आला. पंकजा यांची कोंडी करण्यात फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मुंडे समर्थक बोलताना दिसतात.

विनोद तावडे हेदेखील मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. विनोद तावडे काही काळ विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत बोरीवली मतदारसंघातून ते निवडून आले होते. विनोद तावडे यांना पूर्वीपासूनच भाजपचा मराठा चेहरा मानले जाते. त्यांनी भाजपच्या संघटनात्मक पदावर बराच काळ काम केले आहे. ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस होते. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी आणि इतर कारणांमुळे त्यांच्याबाबत वाद निर्माण झाला होता. त्यातूनच विनोद तावडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून ते आपोआप बाद होऊन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवरही आपली पकड मजबूत केली होती.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांची पक्षावर आणि राज्यावर मजबूत पकड असली तरी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांनाही पक्षाकडून लगाम लावण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या मदतीने शिवसेनेला खिंडार पाडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकून भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते, पण आयत्या वेळी त्यांचा पत्ता कट करून केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडून फडणवीस यांना धक्काही दिला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना त्यांना झालेल्या वेदना भाजपच्या नेत्यांकडूनच बाहेर पडल्या आणि फडणवीस यांचीही पक्षाने कोंडी करायला घेतली हे दिसून आले.

शिंदे गटाचे १६ आमदार बाद झाले तर फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी कुजबूज त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे, पण सध्यातरी अशी घडामोड होताना दिसत नाही. त्यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गेल्या काही दिवसांपासून विनोद तावडे यांना पाठबळ दिले जात आहे. तावडे यांना भाजप हायकमांडचा मिळणारा पाठिंबा पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक अस्वस्थ झाले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या महाराष्ट्रातील दौर्‍यात नड्डा यांच्याकडून फडणवीस यांच्यापेक्षा तावडे यांना महत्त्व देण्यात येत असल्याचे दिसून आले. विनोद तावडे आमदार असताना बांधण्यात आलेल्या अटल उद्यानाची नड्डा यांनी पाहणीही केली.

तसेच तावडे यांच्या घरी भेट देण्याचा नड्डांच्या दौर्‍यात समावेश करण्यात आला होता. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही मुंबईत आल्यानंतर त्यांनी तावडेंच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे भाजप हायकमांडकडून सध्या तावडेंना अधिक पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेल्यानंतर तावडे महाराष्ट्रातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेले होते. काही महिन्यांनी पक्षाने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवले होते. तावडे यांनी या संधीचे सोने केले. दिल्लीत जाताच हायकमांडची मर्जी संपादन करण्यात यश मिळवले. त्यामुळे दिल्ली दरबारी तावडे यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

- Advertisment -