घरसंपादकीयअग्रलेखएक बेदखल खदखद!

एक बेदखल खदखद!

Subscribe

मी भाजपची आहे, मात्र भाजप माझा नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी करताच पुन्हा त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले. तुम्ही म्हणता ताईंचा पक्ष, ताईंचा पक्ष. माझा कुठला पक्ष? मी भाजपची आहे. भाजप माझा थोडाच आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे.

आम्हाला काही मिळाले नाही, तर मी ऊस तोडायला जाईन आणि महादेव जानकर मेंढ्या चारायला जातील. रासप हा माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झाले तर मी भावाच्या घरी जाईन, असे पंकजा समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या. खरेतर आपल्या भाषणातून पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आपल्या भाषणातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देण्याचा पंकजा यांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. याआधी गोपीनाथ गडावरील दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात त्यांनी पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, पक्ष नेतृत्वाला उद्देशून अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता.

- Advertisement -

संघर्षाला मी घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता आणि गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष हीच माझी ओळख आहे. दरवेळी असे म्हटले जाते की मी नेतृत्वावर नाराज आहे. अमक्यावर नाराज आहे. मी काही काल आले नाही. मी गेल्या १७ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कुणावर नाराज असायला हे काही घरगुती भांडण नाही. मी कुणाकडे पदर पसरून मागायला जाणार नाही. मला खुर्चीची हाव नाही. मी झुकणार नाही, मी थकणार नाही, मी रुकणार नाही.

पक्षाने मला तिकीट दिल्यास परळी मतदारसंघातून २०२४ ला मी निवडणूक लढवेन आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू करणार आहे, असे पंकजा म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे आज जी संभाव्य बंडाची भाषा करत आहेत आणि भावाच्या घरी जाण्याचा इशारा देत आहेत, तरी आपल्या घरात जो मान असतो तो भावाच्या घरात नसतो याची त्यांना कल्पना आहे. त्यांचे वडील खुद्द गोपीनाथ मुंडे यांनीसुद्धा काही वेळा बंडाची भाषा करून वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले होते, पण ते आपल्या हिताचे होणार नाही याची त्यांना कल्पना होती.

- Advertisement -

पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे तसेच पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे यांसारख्या अनेक शिलेदारांनी महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी रक्ताचे पाणी केले. महायुतीच्या काळात शिवसेना मोठा भाऊ म्हणून भाजपला जोडे दाखवत असताना या नेत्यांनी शून्यातून भाजप निर्माण केला. ओबीसी, मराठा समाजात नाळ घट्ट केली. महायुती सरकारच्या रूपाने त्याचे यश मिळालेही. पहिल्या युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. इतरांनाही मंत्रीपदाचा लाभ मिळाला, पण तेव्हाही विधान परिषदेचे आमदार आणि पुढे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातून विस्तव जात नव्हता.

२०१४ च्या मोदी लाटेत केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजप-सेना युतीचे सरकार आल्यावर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार मुंडे की गडकरी, अशा खुमासदार चर्चा तेव्हा रंगल्या होत्या, पण दोघांनाही केंद्रातच वेगवेगळी मंत्रीपदे मिळाली आणि केंद्रात नरेंद्रच्या जोडीने राज्यात देवेंद्र मुख्यमंत्री झाले. दुर्दैवाने अल्पावधीतच गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने घाला घातला आणि पक्षाने तळागाळाशी नाळ असलेला उमदा नेता गमावला.

कौटुंबिक पातळीवरील आघात सहन करत वडिलांच्या मार्गदर्शनानुसार पंकजा मुंडे राजकारणात पुढे वाटचाल करतच राहिल्या. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून कार्यरत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, पण अंतर्गत राजकारणाचा बळी ठरून चिक्की घोटाळ्याचा ठपका त्यांच्या माथी मारण्यात आला. त्याला मुख्यमंत्रीपदाची अतिमहत्त्वाकांक्षा कारणीभूत ठरल्याचे अनेक वरिष्ठ नेते खासगीत सांगतात. हाच प्रकार एकनाथ खडसे यांच्याही बाबतीत घडला.

भोसरी भूखंड प्रकरणात गोत्यात आलेले एकनाथ खडसे यांना पक्षांतर्गत राजकारणाच्या डोहात गटांगळ्या खाव्या लागल्या. त्यातून ते अखेरपर्यंत सावरलेच नाहीत. नाईलाजाने त्यांना पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या काडीचा आधार घ्यावा लागला. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी गोटातून मुंडे कुटुंबाचे अस्तित्व राजकारणातून संपवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. मुंडे परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बीड परळीतील गडाला धक्का देण्यात आला. राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला.

मागील निवडणुकीत पराभव का व कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. कधी विधान परिषदेत तर कधी राज्यसभेत पाठवण्याच्या बाता या बाताच राहिल्या. आजही मुंडे भगिनींचे खच्चीकरण करण्यासाठी दिल्ली व महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे म्हटले जाते. प्रेम असो वा राजकारण दोन्ही बाजूंनी समान असते तेव्हा ते जगातील सर्व सुख देते, परंतु जेव्हा ते एकतर्फी असते तेव्हा ते फक्त त्रास देते. म्हणूनच मी त्याची, पण तो माझा नाही, यापेक्षा व्यथित करणारे शब्द दुसरे असूच शकत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -