Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख गाजराची पुंगी आणि सेफ गेम!

गाजराची पुंगी आणि सेफ गेम!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुुक्रवारी आपल्या पक्षात फूट पडलेली नाही, आमच्या पक्षातील काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. अजित पवार यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. पवारांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांमध्ये एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत तर उसळून उठले. शरद पवारांनी किती दगडांवर पाय ठेवावे ते निश्चित करावे, त्यांच्या वक्तव्यांमुळे गैरसमज पसरत आहेत, असे राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, त्यांचे 9 आमदार भाजप आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री झालेले आहेत. इतके सगळे झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असे कसे म्हणता येईल. असा प्रश्न महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे मित्रपक्ष विचारत आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी त्यांच्या मित्रपक्षांमध्ये हलकल्लोळ उडाल्यानंतर पवार आपले विधान बदलतील, असे वाटत होते. पण शनिवारीही शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असे त्यांनी पुन्हा ठासून सांगितले. पवारांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, कारण त्यामुळे भाजपचे विरोधक असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये चलबिचल निर्माण होऊन महाविकास आघाडीच्या अस्तित्वाला हादरे बसत आहेत. इतकेच नव्हे तर त्यामुळे इंडिया आघाडीतील नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

शरद पवारांच्या या भूमिकेमुळे विशेषत: शिवसेनेचा तिळपापड झालेला आहे. कारण आमच्या पक्षामध्ये ज्यांनी बंड करून पक्षावर दावा सांगितला, त्यांच्याविरोधात आम्ही भूमिका घेऊन त्यांना गद्दार म्हणून त्यांचे नेहमी वाभाडे काढत आहोत. राष्ट्रवादीमधील ज्या आमदारांनी तोच फॉर्म्युला वापरला त्यांच्याविरोधात तुम्ही कुठलीही कठोर भूमिका घेत नाही, उलट, तुमच्या छान भेटीगाठी होत आहेत, त्यामुळे ही तुमची दुटप्पी भूमिका आहे, अशीच शिवसेनेची भावना झालेली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोपांचे घमासान झाले. सुमारे वर्षभर न्यायालयांमध्ये दोन्ही बाजूंचा संघर्ष चालला. पण राष्ट्रवादीत अजित पवार आणि समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर असे काहीच घमासान पहायला मिळाले नाही. अजित पवारांनी बंड केल्यानंतर आमचा नाद नाय करायचा, असा जोरदार दम भरणार्‍या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आता म्हणत आहेत की, अजित पवार आमचे नेते आहेत. शरद पवार म्हणतात, ते भाऊ बहीण आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यात पुन्हा अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आहेत आणि शरद पवारांच्या बाजूने किती हेही स्पष्ट होत नाही. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील फरक स्पष्टपणे जाणवत आहे. राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे हे कळायला मार्ग नसल्यामुळे त्यांच्या मित्रपक्षांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अजित पवार यांनी शिंदे फॉर्म्युला वापरला असला तरी अशाच प्रकारचा अनुभव यापूर्वी ए.पी.संगमा यांनी शरद पवार यांना दिलेला होता. त्यांनीही बंड करून पक्षावर दावा केला होता, त्यावेळी प्रकरण न्यायालयात गेले होते. पण संगमांपेक्षा पक्षामध्ये शरद पवारांचे वजन जास्त होते. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव जास्त होता. त्यामुळे संगमा यांचे काही चालले नाही. त्यावेळी पक्षाध्यक्ष म्हणून पवारांची सरशी झाली. आताही शरद पवारांनी या अनुभवाच्या आधारे सबुरीचे धोरण घेतलेले आहे. कारण त्यांना माहीत आहे, अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असली तरी त्यांनी त्यांचा गट भाजपमध्ये विलीन केलेला नाही. त्यामुळे उद्या जेव्हा निवडणुका जवळ येतील त्यावेळी ही हातमिळवणी किती टिकेल, हे पहावे लागेल. तेच शरद पवार पहात आहेत. त्यामुळे आता जरी पवार म्हणाले असतील की, अजित पवार यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, पण परिस्थिती नेहमी बदलत असते. कारण आपण कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे बॉण्डपेपरवर लिहून देऊ का, असे छातीठोकपणे अजित पवार सांगत होते. पण परिस्थिती बदलली.
महाराष्ट्रात भाजपने ज्या प्रकारे सत्ता आणली ते पाहिल्यावर त्यांच्याविषयी जनतेच्या मनात नाराजी आहे, तसेच काहीही झाले तरी शिंदे हे ठाकरे होऊ शकत नाहीत.

- Advertisement -

अजित पवार हे शरद पवार होऊ शकत नाहीत, त्यामुळे भाजपवाल्यांच्या मनात चिंता आहे. दुसर्‍या बाजूला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची इंडिया आघाडी उभारली जात आहे. अशा प्रकारे तिसरी आघाडी उभारण्याचे प्रयत्न राष्ट्रीय पातळीवर या अगोदरही झालेले आहेत. त्यासाठी काही वेळा स्वत: शरद पवारांनी पुढाकार घेतलेला होता, पण इतक्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या नेत्यांचा मेळ घालणे वाटते तितके सोपे नाही, हे पवारांनाही माहीत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी ही गाजराची पुंगी आहे. वाजली तर ठिक नाही तर मोडून खाल्ली. ती नाही वाजली तर राज्यात आपल्या पक्षाचे स्थान मजबूत असले तर निदान राज्यातील सत्ता आपल्याला मिळेल. राज्यातून भाजपला शह देण्यात येईल. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाला नमते घ्यावे लागेल. त्यामुळे सरशी आपलीच होईल. त्यासाठीच शरद पवार सेफ गेम खेळत आहेत, असेच म्हणावे लागेल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -