Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख गोंधळात गोंधळ!

गोंधळात गोंधळ!

Subscribe

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाचे वर्णन करायचे असेल तर ते ‘गोंधळात गोंधळ’ असेच करावे लागेल, कारण कुणाचा पायपोस कुणाला नाही, अशी अवस्था होऊन बसलेली आहे. एका बाजूला केंद्रात बहुमत असलेला भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा यथेच्छ वापर करून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना जेरीस आणत आहे आणि त्यातील जे हार पत्करून भाजपमध्ये सहभागी होतील, त्यांच्या मागील तपास आणि चौकशीचा ससेमिरा थांबवला जात आहे, हे सगळी जनता पाहत आहे. त्याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि दोन दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाऊन सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह ९ जणांना मंत्रीपद देण्यात आले. त्याचवेळी शिवसेनेमध्ये बंड करून भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे यांच्या गटातील बरेच आमदार अपेक्षाभंगाचे दु:ख गिळून गप्प बसले. कारण त्यांना काहीच करता येत नव्हते.

आपल्यानंतर आलेले अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मानाचे पान मिळते, त्याच वेळी आपल्याला केवळ वाट पहात बसावे लागते, हीच त्यांची भावना होती. शिवसेनेचे सध्या दोन भाग झालेले आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसर्‍या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. हे दोन गट सध्या एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. भाजपसोबत गेल्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे, पण त्यांना मुख्यमंत्रीपद देताना भाजपला काळजावर दगड ठेवावा लागला, या भाजपवाल्यांच्या प्रातिनिधिक भावना त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून व्यक्त झाल्या होत्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जसे कितीही आवेशात सांगत असले की, आमचे नेते एकनाथराव शिंदे आहेत आणि २०२४ ची विधानसभा निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल, तरी जेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आणि त्या पदापासून देवेंद्र फडणवीस यांंना वंचित व्हावे लागले, तेव्हा त्यांची देहबोली सारे काही सांगून गेली होती.

- Advertisement -

भाजपने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले असले तरी राज्यातील भाजपमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. सगळी असंतुष्ट आणि नाराज मंडळी केवळ मोदी आणि शहा यांची जरब असल्यामुळे गप्प आहेत, इतकेच म्हणावे लागेल. भाजपकडे सध्या केंद्रात मजबूत नेतृत्व आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील नेते शांत आहेत. त्याच वेळी काँग्रेसकडे केंद्रात सध्या मजबूत नेतृत्व नाही, त्यामुळे तो पक्ष राज्यात विस्कळीत झालेला दिसतो. त्यामुळे राज्यातील काँग्रेस गटबाजीने कमकुवत झालेली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचाच फॉर्म्युला वापरला. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली आणि आपलाच पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँगेस असा दावा केला, तर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणत आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. काही लोक वेगळ्या विचारांचे असून ते भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत. पक्षाचा अध्यक्ष मीच आहे. पवारांनी अशी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे संतप्त झाले, त्यांनी पवारांंविषयी आपली नाराजी व्यक्त करताना भिष्माचार्यांनी असे बोलू नये, त्यांनी दोन दगडांवर पाय ठेवू नये, त्यामुळे गैरसमज पसरतात. तुमच्या पक्षातील आमदारांनी भाजपसोबत जाऊन मंत्रीपदे मिळवली तरी तुम्ही म्हणता पक्षात फूट पडली नाही. शिवसेना हा सध्या राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असल्यामुळे त्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर शरद पवारांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. काहीही झाले तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे जाहीरपणे सांगावे लागले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदीविरोधी भूमिका घेऊन लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज्यातील भाजपवाल्यांना सळो की पळो करून सोडले होतेे, पण पुढे काय परिवर्तन झाले कुणास ठाऊक, ते पुन्हा मोदी आणि भाजप यांच्या भूमिकेला पोषक ठरेल, अशी भूमिका दणकावून मांडू लागले. मशिदींवरील भोंग्यांचा त्यांनी उचलेला मुद्दा भाजपला पोषक ठरणारा होता, पण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि भाजपची सत्ता राज्यात आली तेव्हा भाजपवाल्यांना राज ठाकरे यांची गरज राहिली नसावी, त्यामुळे पुन्हा राज यांनी भाजपला टोचणारी विधाने करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हेही कळणे अवघड होऊन बसलेले आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंंबेडकर हे मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक साधून प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा चालवण्यासाठी प्रयत्नशील झाले होते, पण पुढे गाडी थंडावली. आताही ते म्हणत आहेत की, मोदीविरोधी इंडिया आघाडी आपल्याला सोबत घेत नाही, आपल्याला राजकारणातही डावलेले जात आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्यात सध्या सर्वपक्षीय राजकीय नेते गोंधळलेले दिसतात, त्यामुळे राज्यात सध्या गोंधळात गोंधळ सुरू आहे, असे म्हणावे लागेल.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -