महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती सध्या महामार्गांसारखी झाली आहे, कोण खड्ड्यात जाईल आणि कोण खड्ड्यातून बाहेर येईल, हेच कळत नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भाजप एखाद्या नेत्याविरोधात रान उठविते. तो नेता कारागृहापर्यंत पोहोचतो, पण नंतर त्याने भाजपचा झेंडा हाती घेतला की, सारे काही शांत होते. मग भाजपचा मोर्चा दुसर्या नेत्याकडे वळतो. यात अडचण होते ती, भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची. त्यांनी ज्यांना-ज्यांना ‘हिशेब तर द्यावा लागेल,’ असे म्हटले आहे, त्यातील ८० टक्के लोक भाजपात सामील झाले आहेत. केवळ किरीट सोमय्याच नव्हे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील अनेक नेत्यांच्या बाबतीतही असे घडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना तर तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक काळात केली होती. नंतर दोन वेळा ते त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत. राणे कुटुंबीयांचेदेखील तेच आहे. आता मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी जवळपास दीड वर्षे कारागृहात असलेले राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक जामिनावर बाहेर आले आहेत. आता ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहतात की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीर गटाचे नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या केवळ तर्क लढविले जात आहेत.
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय सुरू आहे, हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. त्यातही अजित पवार यांच्याबद्दल कायम ठोकताळे व्यक्त केले जातात, पण अजित पवार ते ठामपणे फेटाळून लावतात. इतकेच नव्हे, तर अनेकदा ते स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायलाही तयार असतात, पण कालांतराने ते ठोकताळे खरे ठरतात, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांनी भाजपला दिलेली साथ, हे अलीकडचे ताजे उदाहरण आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, असे सांगणारे अजित पवार राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी तांत्रिकदृष्ठ्या सोडलेला नसला तरी, शरद पवार अध्यक्ष असलेल्या या पक्षाने अद्याप अधिकृतपणे त्यांच्याविषयी भूमिका जाहीर केलेली नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर ‘काकां’नी आता निवृत्ती घ्यायला हवी. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, असा सवाल करणारे अजित पवार यांनी गेल्या दीड महिन्यांत चारवेळा याच ‘काकां’ची भेट घेतली. काही भेटी खुलेपणाने तर काही गुप्तपणे. अलीकडेच पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. आता या भेटीबाबतही अजित पवार यांनी कानावर हात ठेवले आहेत. गाडीत बसलेले अजित पवार वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्यांनी टिपलेले असले तरी, मी तिथे नव्हतोच, असा छातीठोकपणे दावा अजित पवार करत आहेत. एकूणच, ‘ताकास तूर लागू न देण्याची’ पवार कुटुंबीयांची खासियत त्यांनी जपली.
शरद पवार यांची राजकारणात तशीच ओळख आहे. ते जे सांगातात, त्याच्या उलटी कृती ते करतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर त्याची झलक लोकांनी पाहिली आहे. एकीकडे, शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आणि दुसरीकडे भाजपबरोबर शपथविधी पारही पाडला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार टिकले नाही, हा भाग वेगळा. पण त्यानंतरही पुतण्यावर, अर्थात अजित पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली नाही, यातच सर्व आले. याची वाच्यता कालांतराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि शरद पवार यांनीही नंतर त्याला दुजोरा दिला.
अजित पवार यांचेही तसेच आहे. आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचेच नाकारले आहे, पण कोंबडे कितीही झाकून ठेवले तरी, सूर्य उगवायचा राहत नाही, त्यामुळे त्यांचा हा ‘खोटेपणा’ सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांनी वारंवार तेच दृश्य दाखवून सर्वांसमोर आणला. सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या महिन्यात मुंबईच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी २००४ची आकडेवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ७१ आमदार होते, पण तरीही शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. ती संधी शरद पवार यांनी गमावली.
त्यानंतर विजयी आमदारांच्या संख्येत सातत्याने घसरण झाली आहे, पण आता पुन्हा ७१ आमदार निवडून आणण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. सकाळचा शपथविधी असो की, आताच्या भेटीगाठी असोत, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो वेळीच दूर करण्याची गरज आहे. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ असा शब्द वापरला होता. त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसला ‘संभ्रमजीवी’ असे म्हणता येईल. राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे ७१ आमदारांचा आकडा गाठणे तर दूर, आता आहेत तितके पुन्हा निवडून आले तरी खूप, असे म्हणावे लागेल.