घरसंपादकीयअग्रलेखराहुलबाबा ‘जोडो’वरून ‘तोडो’कडे...

राहुलबाबा ‘जोडो’वरून ‘तोडो’कडे…

Subscribe

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता १० दिवस उलटलेत. तमिळनाडूच्या कन्याकुमारीहून सुरू झालेली ही यात्रा केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा असा सुमारे १५०० किमीचा प्रवास करत महाराष्ट्रात दाखल झाली. राज्यातील ५ जिल्ह्यांतील जनतेशी संवाद साधून ३८२ किमीचे अंतर कापून ही यात्रा मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचून संपेल.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता १० दिवस उलटलेत. तमिळनाडूच्या कन्याकुमारीहून सुरू झालेली ही यात्रा केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा असा सुमारे १५०० किमीचा प्रवास करत महाराष्ट्रात दाखल झाली. राज्यातील ५ जिल्ह्यांतील जनतेशी संवाद साधून ३८२ किमीचे अंतर कापून ही यात्रा मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचून संपेल. या यात्रेला सर्वच राज्यात खासकरून महाराष्ट्रातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवरील दिगलूरमधून राज्यात दाखल होताना रात्रीच्या अंधारात काढलेल्या मशाल यात्रेने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते.

राहुल गांधी आपल्या १०० हून अधिक यात्रेकरूंसोबत सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान दररोज पदयात्रा करताना तळागाळातील जनतेशी संवाद साधतात. यांचा साधेपणा, सर्वसामान्य-कष्टकर्‍यांच्या व्यथा समजूून घेण्याची त्यांची तळमळ, सर्वसमावेशक राजकारणाची मनोवृत्ती सगळ्यांनाच भावतेय. पदयात्रेनंतर मोजक्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन ते जनतेला संबोधित करतात. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विभाजनवादी राजकारणाविरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी ही चळवळ सुरू केल्याचे राहुल गांधी आपल्या भाषणातून आवर्जून सांगतात. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, दडपशाही, धर्मांधता आणि वाढत्या असमानतेच्या विरोधात लढा देणे हा आमचा यात्रा काढण्यामागचा उद्देश आहे. आम्ही देशातील एकोपा, बंधुभाव, सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुद्दे राहुल गांधी आक्रमकपणे मांडतात.

- Advertisement -

राहुल गांधींची राजकारणातील वाढलेली परिपक्वता पाहून सारेचजण भारावून गेलेत. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी ते सातत्याने राज्याच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. माध्यमांचा चेहरा बनलेत, परंतु परवाच्या सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून या राजकीय परिपक्वतेच्या फुग्याला आपणहूनच टाचणी लावली आहे. अतिशय सकारात्मक वळणावर असलेल्या भारत जोडो यात्रेत विनाकारण वाद ओढावून घेत राहुल गांधींनी भाजप आणि संघाला या आगीत तेल ओतण्याचीही आयती संधी मिळवून दिली आहे. तर दुसरीकडे वैचारिक जवळीक करू पाहणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही अडचणीत टाकण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. चांगल्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची लय बिघडवण्याचे काम केवळ त्यांच्या एका वक्तव्यामुळे झाले आहे.

परवा हिंगोलीत राहुल गांधींनी स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अवघी दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरूंगात राहिल्यानंतर सावरकरांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. स्वत:च एक पुस्तक लिहून ते किती शूर होते हे सांगितले. ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. त्यांच्या याच वक्तव्यानंतर राज्यात गदारोळ न होता तरच नवल. स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्राच्या अस्मितेचा केंद्रबिंदू आहेत. सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारधारेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह वा अनेकांमध्ये मतभेद असतील. पण महाराष्ट्रातील जनतेला सावरकरांनी देशाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल तसूभरही शंका नाही.

- Advertisement -

एवढेच नाही तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी एक जाज्वल्य अभिमान आहे, ज्यात मोठ्या संख्येने तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. देशपातळीवरील ज्या राज्यातून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चालत आली, त्या दक्षिणेकडील राज्यातील आणि महाराष्ट्रातील सावरकरांबाबतची समीकरणे बदलतात, हे कदाचित काँग्रेसच्या थिंक टँकमधील नेत्यांना ठाऊक नसावे. त्यामुळेच त्यांनी राहुल यांना योग्य सल्ला दिला नाही, परिणामी राहुल यांच्या भारत जोडो यात्रेला गालबोट लागले. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सुरू असलेला वाद हा काही आजचा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपात सावरकरांच्या मुद्यावरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. ही एक विडंबनाच म्हणावी लागेल की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघाचे कधीही सदस्य न झालेल्या वीर सावरकरांचे नाव संघ परिवारात मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. सावरकरांचा महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये सहभाग होता असा आरोप काँग्रेसकडून केला जातो.

तर, सावरकरांना गांधी हत्येत गोवले गेले आणि त्यांची देशभक्ती काँग्रेसला कळलेली नाही असे प्रत्युत्तर भाजप, आरएसएस आदी हिंदुत्ववादी संघटनांकडून दिले जाते. त्यात शिवसेनेचाही समावेश आहे किंवा होता असेही आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हे वादातीत आहे. २६ मे २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या नंतर दोनच दिवसांनी आलेल्या सावरकर यांच्या १३१ व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी संसद भवनात जाऊन सावरकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक व्यासपीठावर सावरकरांचाच नव्हे, तर ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या विचारधारेचा हा एकप्रकारे प्रतिकात्मक सन्मानच केला. परंतु या विचारांना आव्हान द्यायचे असेल, तर त्यासाठी आपल्या विचारांची बैठकही पक्की असावी लागते, हे अद्याप राहुल गांधी वा त्यांना भाषण लिहून देणार्‍या थिंक टँकला समजलेले नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करताना राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर दिले. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावरून उद्धव ठाकरे गटाचा समाचार घेतला. राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत स्वा. सावरकरांचे इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याचे नाचवलेले पत्र म्हणजे भाजला मिळालेले आयतेे कोलीतच म्हणावे लागेल. कारण हे पत्र दाखवल्यावर काही तसा उलटत नाहीत, तोच राहुल गांधींच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या शौर्याची प्रशंसा करणार्‍या लिहिलेल्या पत्राचा संदर्भ भाजपकडून देण्यात आला. आधीच शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात काही ठिकाणी तक्रारही नोंदवण्यात आली आहे. भारत जोडोच्या माध्यमातून आपण समाज एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आतापर्यंत म्हणणार्‍या राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यामुळे समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्याची भाजपला संधी मिळाली. या मुद्यावरून काँग्रेस आणि भाजप नेते-कार्यकर्ते भिडण्याची शक्यताही आता नाकारता येत नाही. राहुल गांधींचे एक वक्तव्य या यात्रेला ‘जोडो’वरून ‘तोडो’कडे नेण्यास कारणीभूत ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -