घरसंपादकीयअग्रलेखकाँग्रेस अध्यक्षपदाची औपचारिकता !

काँग्रेस अध्यक्षपदाची औपचारिकता !

Subscribe

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हेदेखील एकूणच परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर लक्षात येऊ शकते. त्यामुळे खरे तर ही निवडणूक आणि त्याचा निकाल ही आता एक औपचारिकता होऊन बसली आहे. ही औपचारिकताच काँग्रेसला महागात पडत आहे. त्यातूनच या पक्षातील चुरस आणि उत्साह मावळून गेलेेला आहे. त्यामुळेच काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची देशपातळीवर हानी झालेली आहे. काँग्रेस हा पक्ष अलीकडे एका विचित्र कोंडीत सापडलेला आहे. खरे तर लोकशाही शासनप्रणाली असलेल्या भारत देशात हा पक्ष घराणेशाहीत अडकत गेला. काँग्रेस म्हणजे नेहरू-गांधी घराणे असे समीकरण होऊन बसले. काँग्रेसने देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वंतत्र केले, पण हा पक्ष या घराण्याच्या गुलामीत अडकला. अमेरिका आणि इंग्लड हे लोकशाही देश आहेत, पण तिथे अशी घराणेशाही निर्माण झालेली नाही. पण भारतातील सगळ्या राजकीय पक्षांचा विचार केला तर आपल्यानंतर आपली मुले या वंशपरंपरेने राजकीय पक्ष घराणेशाहीत अडकत गेले.

लोकशाही प्रक्रियेने निवडणूक होते, पण पक्षांमध्ये घराणेशाही कायम असते. त्यानंतर त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांनाही त्या आडनावांची इतकी सवय पडते की, दुसरे आडनाव पुढे आले की, त्या पक्षाकडे लोक वळेनासे होतात. त्यामुळे भारतासारख्या लोकशाही शासनप्रणाली असलेला देश पक्षीय पातळीवर घराणेशाहीच्या विळख्यात अडकलेला आहे. ही घराणेशाही कायम ठेवण्यामध्ये आर्थिक कारणेसुद्धा असतात, कारण ज्याच्या हातात पक्षाची किल्ली असते, त्याच्या हातात पक्षाच्या तिजोरीची किल्ली जाते. त्यामुळे पक्षाच्या नावावर असणारी सगळी संपत्ती आपल्यानंतर आपल्या वारसदारांकडे असावी, अशी पक्ष स्थापन करणार्‍यांची इच्छा असते. त्यातून नाराज होऊन अनेकांनी बंड करून स्वत:चे पक्ष स्थापन केले. महाराष्ट्रात तर अशा बंडखोरीला आणि फाटाफुटीला इतका ऊत आलेला आहे की, उद्या निवडणुकांमध्ये कुणाकुणाला मतदान करायचे, असा प्रश्न लोकांसमोर पडणार आहे. सध्या तरी पक्षातील घराणेशाहीपासून अन्य पक्षांच्या तुलनेत भाजप दूर आहे. या पक्षात अजून मालकशाही निर्माण झाली नसली तरी आपल्याच मुलांना आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे मिळवण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात.

- Advertisement -

काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला दीर्घ काळ अध्यक्ष नसण्याची ही स्वतंत्र भारतातील पहिलीच वेळ असावी. त्याला एक मुख्य कारण आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पातळीवर झालेला उदय. तोपर्यंत काँग्रेस बिनधास्त होती. २०१४ नंतरही युपीए-३ पुन्हा केंद्रात सत्तेत येणार आणि राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार असेच काँग्रेसजनांना वाटत होते, पण गुजरातचे विकास पुरुष ठरलेल्या मोदींचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर आगमन झाले आणि परिस्थिती बदलली. मोदींनी ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळाले, तर तोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा इतका धुव्वा उडाला की, त्यांना लोकसभेत विरोधी बाकांवर बसण्यासाठी जेवढ्या जागा जिंकाव्या लागतात, तितक्याही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा सगळा नूरच मावळून गेला.

काँग्रेसच्या घराणेशाहीच्या नियमानुसार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया आणि त्यांच्या हितचिंतकांना राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, असे वाटत होते. कारण जो अध्यक्ष असतो, साधारण तोच पंतप्रधान होतो. त्यामुळे राहुल गांधी यांना अगोदर उपाध्यक्ष बनवण्यात आले आणि त्यानंतर बहुमताने २०१७ साली अध्यक्ष बनविण्यात आले, पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा दणकून पराभव झाला, इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जागा वाढून ते दुसर्‍यांदा केंद्रात सत्तेत आले. त्यावेळी तर अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी इतका धसका घेतला की, त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडून दिले आणि काही केल्या ते अध्यक्षपद स्वीकारायला तयार होईनात. त्यामुळे काँग्रेसजनांची पंचाईत झाली. काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नसल्याने पक्ष विस्कळीत झाला. विविध राज्यांमध्ये पक्ष कमकुवत होऊन त्यांच्यामध्ये गटबाजी फोफावली. अशा वेळी सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या, पण पक्षाला निवडून आलेला अध्यक्ष नव्हता. त्यामुळे काँग्रेसची अवस्था नेतृत्वहिन झालेली होती.

- Advertisement -

अनेक वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष अध्यक्षाशिवाय राहणे योग्य नव्हे, त्यामुळे पक्षाची हानी होते. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, अशी मागणी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून सोनिया गांधी यांच्याकडे केली होती, पण सोनिया गांधी यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण सोनिया गांधी आणि त्यांच्या हितचिंतकांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे असे वाटते होेते, पण राहुल गांधी तयार नव्हते. त्यानंतर राहुल गांधी यांनी आगामी पक्षाध्यक्ष हा गांधी घराण्याच्या बाहेरील असायला हवा, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे काँग्रेसजनांसमोर पुन्हा पेच निर्माण झाला. एका बाजूला भाजपकडे असलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व आणि दुसर्‍या बाजूला राहुल गांधींच्या मनधरणीत अडकलेली काँग्रेस, यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना काय करावे ते कळेनासे झाले, त्यातूनच कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे काँग्रेसमध्ये हयात घालवलेले आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले नेते बाहेर पडले.

काँग्रेसला अध्यक्ष नसल्यामुळे परिस्थिती अधिकच अवघड बनत चालली होती. त्यात पुन्हा गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या निष्ठावान नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील कमजोरपणा दाखवून दिला होता. त्यामुळे राहुल गांधी यांची परिस्थिती अधिकच कठीण झाली. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून स्वत:ला दूर ठेवून ‘भारत जोडो’ मोहिमेत गुंतवून घेतले. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उडी घेतली, पण कशासाठी घेतली हाच एक प्रश्न आहे. त्यांना सोनिया गांधींची माफी मागून माघार घ्यावी लागली. त्याही अगोदर शशी थरूर यांनी अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेतला होता. या माणसाला कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य नाही, त्यामुळे त्यांचे पूर्वी परराष्ट्र राज्यमंत्रीपद काढून घेण्यात आले होते. के.एन.त्रिपाठी आणि दिग्विजय सिंग हे रिंगणात उतरले. त्यांनाही बाहेर काढण्यात आले. आता रिंगणात उरले आहेत, ते सोनियानिष्ठ मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर. एकूणच या दोन उमदेवारांचा तुलनात्मक विचार केला थरूर यांच्या तुलनेत खर्गे यांचे पारडे कित्येक पटीने जड आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची ही निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरेल आणि गांधीनिष्ठ व्यक्ती अध्यक्ष होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -