घरसंपादकीयअग्रलेखकाँग्रेसच्या पंखात नवे बळ

काँग्रेसच्या पंखात नवे बळ

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला त्यात काही फार मोठे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते, कारण तो होणारच होता. याला भाजपमधील राज्यातील मुख्य नेत्यांमधील दुही कारणीभूत होतीच. नेहमीप्रमाणे याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सगळी केंद्रीय ताकद तसेच भाजपशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी उतरवले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आपला पराभव झाला तरी आमच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडला नाही, असे भाजपचे नेते सांगत आहेत, पण त्यांच्या या व्युक्तिवादाला तसा अर्थ उरत नाही. एखादा विद्यार्थी म्हणतो, मी नापास झालो असलो तरी मी अभ्यास भरपूर केला होता, त्याच्या या व्यक्तिवादाची कुणी दखल घेत नाही, तशीच अवस्था कर्नाटकात भाजपची झालेली आहे.

त्यांनी काहीही म्हटले तरी त्यांचा पराभव झालेला आहे. त्यातही यावेळी काँग्रेसला बहुमत मिळाले आहे, त्यामुळे मागील वेळी जशी आमदारांची पळवापळवी झाली किंवा घोडेबाजार झाला, तशी संधी आता असण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपला आता शांतपणे आपला पराभव मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसचा झालेला हा एकहाती विजय त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जी मोदी लाट आली त्यात काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष पार भुईसपाट झाला. त्यांना लोकसभेत विरोधी बाकांवर बसण्याइतकी मतेही मिळवता आली नाहीत. तसेच मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिथे राहुल गांधी यांनी प्रचार केला होता, तिथे काँग्रेसला यश मिळाले नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी फारसे प्रचारासाठी उतरलेही नाहीत.

- Advertisement -

मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाल्यावर काँग्रेसची जी पराभवाची मालिका सुरू झाली होती, ती कर्नाटकमधील एकहाती विजयामुळे खंडित झाली आहे, असे म्हणावे लागेल. कारण मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला छोट्या पक्षांना आपल्या खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागत असे. जसा तो त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात करावा लागला. त्यात काही त्यांना आनंद वाटत नव्हता, त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधूनमधून काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणा देत होते. कर्नाटक हे बाजूचेच राज्य असल्यामुळे तसेच बेळगाव प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रविरोधी दादागिरीची भाषा केली होती, त्यामुळे त्या राज्यात भाजपचा झालेला पराभव हा काँग्रेसच्या पथ्यावर पडेल असेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना वाटू शकेल.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे मोठे योगदान आहे, असे म्हटले जाते. पण त्यात किती तथ्य आहे, हे केवळ एका निवडणुकीतील विजयावरून ठरवता येत नाही, पण तरीही सध्या भाजपचे जे काही एकांगी धार्मिकीकरण सुरू आहे, त्या वातावरणात भारत जोडोचे महत्व नाकारता येत नाही. कारण या देशात राहणारे सगळेच मुसलमान हे देशद्रोही आहेत, असे जे चित्र भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अंगावर येणारे चित्रपट बनवणार्‍यांना प्रोत्साहन देत आहे, ते विचारशील हिंदूंना पटण्यासारखे नाही. कारण असे चित्रपट पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान लोकांना आवाहन करत आहेत, असे कधी यापूर्वी झाले नाही. त्यामुळे लोकांना या चित्रपटांच्या हेतूची शंका येऊ लागली आहे.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर भाजपशासित राज्यांमध्ये असे चित्रपट भाजपचे नेते स्वत: पैसे खर्च करून लोकांना मोफत दाखवत आहेत, यावरून तर ती शंका अधिक दाट होत आहे. सध्या ‘केरळ स्टोरी’वरून जनमानसात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. जर विशिष्ट धर्मातील लोक अशी समाज विघातक कृत्ये करत असतील तर त्याला पायबंद घालणे हे केंद्र सरकारचे काम आहे. गेली नऊ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेत आहे. त्यांच्याकडे गुप्तहेर आणि तपास यंत्रणा आहेत. केरळ स्टोरीसारखे देश विघातक प्रकार होत असतील, तर या यंत्रणा काय करत आहेत, त्यांना याचा पत्ता लागत नाही का, पंतप्रधान मोदींना ते याविषयी माहिती देत नाहीत का, या यंत्रणा केवळ भाजप विरोधकांवर धाडी टाकून त्यांना आपल्यात सामील करून घेण्याचेच काम करतात का, असे अनेक प्रश्न आता लोकांना पडू लागले आहेत.

केरळ स्टोरीच्या माध्यमातून दक्षिण भारतात शिरकाव करण्याचा भाजपचा हेतू होता हे या चित्रपटाच्या प्रचारासाठी भाजपवाले जी मेहनत घेत आहेत, त्यावरून लोकांना कळत आहे. आता कर्नाटकातील पराभवानंतर केरळ स्टोरी चित्रपटाचे भाजपवाल्यांचे मोफत शो कमी झाले तर त्यामागील त्यांचा हेतू आपोआप उघड होईल. काँग्रेसने प्रचार करताना बजरंग दलावर बंदी आणण्याची घोषणा केली होती. इंदिरा गांधी यांनीही आरएसएसवर बंदी आणू असे जाहीर केले, पण ते त्यांना शक्य झाले नाही. भाजपने काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी मतदान करण्यापूर्वी बजरंगबली की जय, म्हणा असे आवाहन केले होते, पण ते लोकांना फारसे पटलेले दिसत नाही. भाजपच्या धार्मिक अतिरेकामुळे त्यांना कर्नाटकातील सत्ता गमवावी लागलेली आहे. कारण धार्मिक गोष्टी रोजीरोटीचे प्रश्न सोडवत नाहीत. यावेळी काँग्रेसने त्यांनाच हात घातला आहे. त्यामुळेच जनतेने त्यांच्या पंखात नवे बळ भरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -