नाराजी…दारूण पराभवाची!

congress leader rahul gandhi bharat jodo yatra successful in Maharashtra

पंधरा वर्षांनंतर भारताची प्रतीक्षा संपेल आणि टी-व्टेंटी विश्वचषकावर सोनेरी अक्षरात भारताचे नाव कोरले जाईल, अशी अपेक्षा भारतातील अब्जावधी नागरिकांना लागून होती. पण इंग्लंडने भारताचा उपांत्य फेरीत सहजपणे पराभव केला आणि भारताच्या स्वप्नाचा चक्काचूर केला. भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची वाट बघणार्‍या असंख्य क्रिक्रेटप्रेमींच्या आशांवर पाणी फिरले. दैव देते आणि कर्म नेते, असा प्रकार भारतीय संघाबाबत घडला. सोनेरी संधीची भारतीय संघाने अक्षरक्ष: माती केली. लढत म्हटली की हार-जीत मान्य असते. पण लढता लढता मरावे. ते मरण सर्वांनाच अभिमानास्पद वाटते. पण उपांत्यफेरीच्या संपूर्ण सामन्यात गोलंदाजीतून अशी लढत कुठेच दिसली नाही. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर आणि अलेक्स हेल्सने भारतीय गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढलीत. ‘करो या मरो’ची परिस्थिती आहे अशा सामन्यात भारतीय गोलंदाजांना एकही बळी घेता येऊ नये ही बाब क्रिकेटवर कोट्यवधींची उधळपट्टी करणार्‍या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता तरी गांभीर्याने घ्यावी. फलंदाजीच्या बाबतीतही भारतीय फलंदाजांनी दिवे लावलेत असेही नाही. पहिल्या दहा षटकात रनरेट 6 च्या आत होता. त्याउलट इंग्लंडने पहिल्या पाच षटकातच अर्धशतक झळकवले होते. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी आणि गुणवान वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. विशेषत: संयमाचा अभावही भारतीय फलंदाजांना महागात पडला. ते उजव्या यष्टीबाहेरील चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात बाद होत गेले. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज उसळी घेणारे चेंडू टाकूनही भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. संपूर्ण विश्वचषकात दोनच सामन्यात बरी खेळी करता आलेला सलामीवीर राहुलने इंग्लंडसोबत नेहमीप्रमाणे नांग्या गाळल्या.

‘आयपीएल’ आणि आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये राहुल अधूनमधून धावा करत असला, तरी विशेषत: डावाच्या सुरुवातीला तो बराच वेळ घेतो. त्यामुळे धावगतीला लगाम बसतो. संपूर्ण स्पर्धेत तो कौशल्यपूर्ण वेगवान गोलंदाजांविरुद्ध चाचपडताना दिसला. आत्मविश्वासाचीही कमतरता त्याच्या देहबोलीतून दिसून येत होती. तो लवकर बाद झाल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर अतिरिक्त दडपण येत गेले. तर दुसरीकडे कर्णधार रोहीत शर्माने 28 चेंडूत 27 धावा काढल्या. टी-ट्वेन्टीसाठी ही अजिबातच समाधानकारक कामगिरी नाही. विराटलाही ‘विराट’ कामगिरी करता आली नाही. त्याने अर्धशतक पूर्ण केले खरे; पण त्यासाठी 40 चेंडू खेळून काढले. या दोघांनी धावांची गती सुरुवातीपासूनच चांगली ठेवली असती तर भारताला 200 धावांच्या आसपास पोहचणे शक्य होते. विशेषत: भारताची गोलंदाजी फारशी प्रभावी नसल्याची जाणीव असलेल्या या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी करणे अपेक्षीत होते. परंतु इंग्लंडच्या भेदक गोलंदाजांनी तशी संधीच दिली नाही. हार्दिक पंड्याने एकाकी लढत दिली असली तरी एक खेळाडू संपूर्ण संघाला कसे पेलवू शकणार? तरीही पंड्याच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर भारताची मजल 168 धावांपर्यंत पोहचली. फलंदाजीनंतर आता भारतीय गोलंदाज आपापली जबाबदारी पार पाडत इंग्लंडचा डाव कोलमडून टाकतील अशी अपेक्षा असताना इंग्लंडने अगदी सहजपणे भारताचा समाचार घेत सामना एकतर्फी खिशात घातला. अर्थात कोणताही खेळ हा अनिश्चिततेमुळे रोचक होतो.

विशेषत: क्रिकेटमध्ये ही रोचकता अधिक असते. त्यातूनच क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा वाढत जातात. मुळात विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा चमू हा सर्वोत्तम आहे असे कुणीही म्हणत नव्हते. कारण विश्वचषकाच्या काही दिवस आधीच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला आणि भारताच्या गोलंदाजीची जणू धारच गेली. पण बुमराहच्या जागेवर संधी मिळालेल्या किडकिडीत शरीरयष्टीच्या अर्शदीप सिंहने अपेक्षेपेक्षा चांगली गोलंदाजी केली आणि त्या जोरावर भारत उपांत्य सामन्यापर्यंत पोहचू शकला. दुसरीकडे विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची जोडी चांगलीच फॉर्मात आली. ‘सूरविराट’च्या जबरदस्त फलंदाजीने भारताची कामगिरी उंचावत गेली. पाकिस्तानला धोबीपछाड दिल्यानंतर नेदरलँड आणि झिम्बॉबेचा भारताने सहजपणे पराभव केला. दक्षिण अफ्रिकेने मात्र भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत धूळ चारली. त्यानंतर बांगलादेशनेही चांगली लढत देत भारताचा घाम काढला. या दोन्ही लढती बघता भारताचा संघ पुढे किती चमकदार कामगिरी करेल याविषयी प्रत्येक क्रिकेटप्रेमींना साशंकताच होती. त्यानुसार झालेही तसेच. भारताचे कागदावरचे शेर मैदानात ढेर झाले. त्यांनी समस्त भारतीयांची निराशा केली. नाराजी ही पराभवाची नाही तर दारुण पराभव झाल्याची आहे. जय-पराजय हा खेळाचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी या पराभवाचा मोठ्या मनाने स्वीकार करतीलही. परंतु त्यानंतर बीसीसीआयचे पदाधिकारी झोपेतून जागे होतील याची शक्यता धुसरच.

आजवरचा अनुभव बघता, प्रत्येक वेळी परदेशात पराभव पत्करून आल्यावर अमक्या एका खेळाडूला काढून टाका, तमक्या खेळाडूचे संघात काय काम, या खेळाडूला संघात स्थान का दिले नाही आणि अमुक खेळाडू हटाव.. अशी टीका सुरू होते. परंतु या टीकेतून बोध घेईल ती निवड समिती कसली? मायदेशात येऊन हाच संघ चमकदार कामगिरी करतो. येथील खेळपट्ट्यांवर खेळाडू दोन-चार शतके ठोकतात, तेव्हा चाहते पुन्हा भारतीय क्रिकेटपटूंचे गुणगान गाण्यात मग्न होतात. मागील काही वर्षांपासून हेच चालले आहे. याचे ना बीसीसीआयला सोयरसुतक, ना निवड समितीला. अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला संपूर्ण स्पर्धेत का स्थान दिले नाही, याचा जाब आता तरी कर्णधाराला कुणी विचारणार की नाही? भारतातील क्रिकेटचा सपाटा बघता, संघातील काही क्रिकेटपटू आयपीएल खेळणेच जास्त पसंत करतात. देशाचे प्रतिनिधीत्व करण्याला ते महत्व देत नाहीत, असे त्यांचा खेळ बघता दिसून येते. जोपर्यंत संघातील जागा गमावण्याची टांगती तलवार डोक्यावर असत नाहीत, तोपर्यंत खेळाडू निश्चिंत असतात. अशा संघाला जगातील कुठलाही महान कर्णधार दिला, तरी उपयोग नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अमिताभ बच्चनने एक चांगली कविता म्हटली होती.

ए निली जर्सी वालो
130 करोड सपनो के रखवालो,
दिखा के जस्बा लहरा दो तिरंगा..
इस बार फिरसे विश्वकप उठालो ए निली जर्सी वालो..
तुम्हारी बल्लेबाजी के सामने
कौन है जो झुका नही है
भेद सके जो गेंदबाजी तुम्हारी
एसा बल्ला बना नही है
तुम बस अपनी मेहनत का सिक्का उछालो, ए निली जर्सी वालो..

या कवितेतील पहिल्या कडव्यात वस्तुस्थिती विशद करण्यात आली असली तरी दुसरे कडवे म्हणजे आता विनोदाचा भाग ठरेल यात शंकाच नाही.