मूळ शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून बंड करून त्या पक्षांवर दावा सांगत भाजपशी हातमिळवणी करून सत्तालाभ मिळवलेल्या नेत्यांची परिस्थिती सध्या आकाशातून पडलो आणि खजुरावर अडकलो, अशी झालेली आहे. कारण आकाशातून ते खजुराच्या झाडावर पडले, त्यांना काही काळ खजुराची फळे गोड लागत आहेत, पण पुढे त्या खजुरावरून खाली उतरून लोकांना कसे सामोरे जायचे, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे मूळ पक्षावर दावा सांगून भाजपशी हातमिळवणी केली खरी, पण आपले पुढे काय होणार याची चिंता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही गटांना आहे. आपण आपल्या पक्षात मुख्य नेतृत्वाविरोधात बंड करून त्या पक्षावर दावा केला हे खरे, पण आपल्याला लोकमान्यता किती मिळणार आहे, हा प्रश्नही या दोन गटांना सतावत आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार, खासदारांसह भाजपशी हातमिळवणी केली. त्यातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अन्य बरेच आमदार कोट शिवून तयार आहेत, पण त्यांना जी अपेक्षा होती तशी काही संधी मिळाली नाही. नाही कुठले मंत्रीपद, नाही कुठल्या महामंडळावर नियुक्ती, अशी त्यांची अवस्था आहे. त्यात पुन्हा सत्तेला तसा काही धोका नसताना भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अस्वस्थतेला बत्ती दिली. त्यामुळे अगोदर शिंदे गटामुळे भाजपची जड झालेली बोट अधिकच जड झाली. भाजपने या नव्याने आलेल्या पाहुण्यांचे अंमळ जास्तच मानपान केले. त्यांच्या 9 आमदारांना मंत्रीपद दिले. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांमध्ये नाराजी पसरली, पण आता परिस्थिती अशी आहे की, त्यांना काहीच करता येत नाही. कारण आता वर्ष उलटून गेले तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तच मिळत नाही. कारण काहींना समावून घेतले तर दुसर्यांची नाराजी कशी उतरवायची, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहे. त्यामुळे जैसे थे, अशी स्थिती लागू करून ठेवणेच जास्त श्रेयस्कर मानण्यात आले. बच्चू कडूंसारखी काही मंडळी आपली नाराजी व्यक्त करत असतात. शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना पुढची संधी मिळत नाही आणि मागेही जाता येत नाही, कारण आम्ही जे फुटीर आहेत त्यांना परत घेणार नाही, अशी ताठर भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतलेली आहे. त्यामुळे त्यांची कोंडी झालेली आहे.
जो फॉर्म्युला वापरून एकनाथ शिंदे भाजपसोबत आले, तोच फॉर्म्युला वापरून अजित पवार भाजपसोबत आले. ते पक्षातून बाहेर पडले नाहीत, तर आपल्या नेतृत्वाखालील आहे तोच खरा पक्ष असा दावा केला. शिंदे यांनी असा दावा केल्यानंतर शिंदे-ठाकरे अशी लढाई सर्वोच्च न्यायालयात वर्षभर चालली. आजही हा विषय अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही. कारण शिंदे यांच्यासह १६ आमदारांचे काय होणार, हा प्रश्न बाकी आहे. अजित पवार यांनी २०१९ साली विधानसभा निवडणूक झाल्यावर अचानक भाजपसोबत सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण तो डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाणून पाडला. आता पुन्हा अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा फॉर्म्युला वापरून राष्ट्रवादीत बंड करून पक्षावर आपला दावा केला. शरद पवार आपले नेते आहेत, असेच ते सांगत आहेत. सुरुवातीला त्यांना असे वाटत होते की, आपल्या मागून सगळाच राष्ट्रवादी पक्ष येईल, पण तसे झाले नाही. तसेच शरद पवार यांनी शिवसेनेसारखी न्यायालयीन लढाई लढणे टाळले. त्यांनी आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ असे जाहीर केले. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली. शरद पवार हे राजकारणातील मातब्बर नेते आहेत. अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्याचप्रमाणे लोकांची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. आपली उपमुख्यमंत्रीपदाच्या पुढे काही मजल जात नाही, अशी खंत अजितदादांनी बंड केल्यानंतर केलेल्या भाषणातून व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगूनच अजितदादा यांनी भाजपशी सलगी केलेली आहे. त्यांचे समर्थक दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी जाहीर वाच्यता करत आहेत. दादाही त्याला अनुमोदन देत आहेत, पण असे असले तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत आहेत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे काही दिवसांपूर्वीच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत जाऊन भेटून आले.
शिंदे यांचे स्थान बळकट आहे, तसेच त्यांच्यासह समर्थक १६ आमदारांच्या भवितव्याचा निर्णय लागायला वेळ आहे, त्यामुळे अजितदादांची अस्वस्थता वाढत असणार. कारण जी महत्वाकांक्षा बाळगून आपण भाजपशी हातमिळवणी केली ती कधी पूर्ण होणार, असा प्रश्न त्यांना सतावत असावा. त्यामुळेच त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीकता साधण्यास सुरुवात केली आहे. कारण शरद पवार यांनी काहीही झाले तरी आपण भाजपसोबत जाणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे अजितदादांची कोंडी झालेली आहे. कारण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काय होईल हे कुणालाही आज सांगता येत नाही. भाजपलाही आपले शतप्रतिशतचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे भाजपकडे आलेल्या पाहुण्यांची मोठी चलबिचल सुरू आहे.