घरसंपादकीयअग्रलेखजैसी करनी वैसी भरनी!

जैसी करनी वैसी भरनी!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवार गटाला अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. परिणामी शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. ज्यांनी पक्षाची स्थापना केली, तो वाढवला, वैयक्तिक आयुष्य बाजूला सारून, दुर्धर आजारांकडेही दुर्लक्ष करीत ज्यांनी पक्ष वाढवला त्या शरद पवार यांनाच तांदळातील खड्यासारखे बाजूला करण्यात आले. हे कृत्य त्यांच्या खुद्द पुतण्याने केल्याने शरद पवार गट अधिक हळहळला आहे.

‘जो नाही झाला काकांचा, तो काय होईल लोकांचा’ असे मार्मिक मेसेज यानंतर शरद पवार समर्थकांकडून व्हायरल केले जात आहेत. यापूर्वी पक्षातील माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड, मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह मोहिते-पाटील, धनंजय महाडिक, राणा जगजितसिंह पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री गणेश नाईक, खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्यासह अन्य काही शिलेदारांनी पवारांना त्यांच्या उतारवयात पाठ दाखवली होती.

- Advertisement -

आभाळ फाटल्याप्रमाणे राष्ट्रवादीला गळती लागली. भगदाड, खिंडार हे शब्दही या गळतीपुढे तोकडे पडावे. त्यानंतर अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांच्यासह सुमारे ४० आमदारांनी अजितदादांचे बोट पकडत शरद पवारांची साथ सोडली, पण अशा प्रकारच्या फुटीची बिजे ही शरद पवारांनीच यापूर्वी वेळोवेळी रोवली होती.

आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात १९७८ साली सरकार स्थापन झाले. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले. सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली. या दोन्ही काँग्रेसमध्ये हे सुरू असतानाच १९७८ साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार त्यांच्या ४० समर्थक आमदारांना घेऊन विरोधी बाकांवर जाऊन बसले. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.

- Advertisement -

पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यांत कोसळले. वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी ‘समाजवादी काँग्रेस’ची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे खेळ सुरू झाले. त्याचवेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत बैठक घेतली. एस. एम. जोशी यांनीही पवारांना नेतृत्व बहाल केले. आबासाहेब कुलकर्णी, एस. एम. जोशी आणि किसन वीर हे तेव्हाचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले. १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आले.

यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. या घडामोडींनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्रीही बनले. त्यावेळच्या सभ्य राजकारणात पवारांनी केलेले बंड तसे पचणारे नव्हते, परंतु तेही लोकांच्या पचनी पाडण्याची क्षमता पवारांमध्ये होती. त्यानंतर नव्वदच्या दशकाने भारतीय राजकारण ढवळून काढले. आज देशात जी राजकीय स्थिती दिसत आहे त्याची मुळं नव्वदच्या वादळी दशकात ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये आहेत.

१९९६ पासून आलेल्या तिन्ही सरकारांमध्ये काँग्रेसला सत्तेपासून बाहेरच राहावे लागले होते. मार्च १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात दुसर्‍यांदा सत्तेत आलेलं ‘एनडीए’चं सरकार जयललितांनी पाठिंबा काढल्याने एका मताने पडले आणि त्यानंतर काँग्रेसमधल्या नाट्याला सुरुवात झाली. या नाट्याच्या केंद्रस्थानी होते शरद पवार. वाजपेयी सरकार जाण्याच्या एक वर्ष अगोदर १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या सोनिया गांधींनी सरकार स्थापनेचा दावा केला, पण मुलायमसिंह यादवांनी सोनियांच्या विदेशी असण्याचा मुद्दा पुढे करत काँग्रेसला पाठिंबा देण्याचं नाकारलं, पण सोनियांना विरोध हा केवळ काँग्रेसबाहेरूनच होणार नव्हता.

काँग्रेसमध्ये भूकंप होण्यासाठीही हाच मुद्दा कारणीभूत ठरणार होता. तो भूकंप शरद पवारांनी घडवून आणला. त्यांनी सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेला आक्षेप घेतला, स्पष्ट विरोध केला. पवार काँग्रेसमध्ये मुरलेलं नेतृत्व होतं. सहाजिक होतं की त्यांच्यासोबत त्यांनी अजून काही दिग्गजांची मोट बांधली. काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेसनं पवारांसह तिघांचंही निलंबन केलं. शरद पवार दुसर्‍यांदा काँग्रेसबाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. म्हणजेच एक पक्ष फोडूनच शरद पवारांनी आपला पक्ष तयार केला.

काकांचा कित्ता गिरवत अजित पवारांनी आपला राजकीय वरचष्मा वाढवण्यासाठी राष्ट्रवादीत फूट पाडली तर बिघडले कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. कोणताही पक्ष फोडून त्यातून दुसर्‍या पक्षाची निर्मिती करणे ही बाब नैतिकदृष्ठ्या चुकीचीच आहे, परंतु राजकीय नैतिकतेला सातत्याने तिलांजली देऊन आपले उखळ पांढरे करणार्‍या शरद पवारांवर जेव्हा आपलाच पक्ष फुटण्याचे संकट ओढवते, त्यामुळे त्यांच्याप्रतिची सहानुभूतीची किनार आपसुकच पुसट होते. कारण या राजकीय फुटीची बिजे त्यांनीच कधीकाळी रोवली होती. जैसी करनी वैसी भरनी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -