घरसंपादकीयअग्रलेखदिलजमाई व्हावी ही लोकप्रतिनिधींचीच इच्छा!

दिलजमाई व्हावी ही लोकप्रतिनिधींचीच इच्छा!

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड करून भाजपचा हात धरुन नवीन सरकार स्थापन केले. ठाकरेविरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू झाला. शिवसेना कुणाची यापासून सुरू झालेल्या या राजकीय संघर्षाला धार आलेली असतानाच दुसरीकडे आता दिलजमाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला शिंदे गटातीलच काही आमदारांनी दिलजमाईची इच्छा दर्शविली. त्यानंतर १२ खासदारांनी अशीच इच्छा बोलून दाखवली. आता तर थेट शिवसेना नेत्या दीपाली सैयद यांनी एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन मातोश्रीवर येण्याचे निमंत्रणच दिले आहे. त्यातच अलिकडच्या काही राजकीय हालचालींचा बारकाईने विचार करता शिंदे गट हा मातोश्रीला पुन्हा ‘कनेक्ट’ होईल असे साधारणत: चित्र आहे. राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जेव्हा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला तेव्हाच शिवसेना काही प्रमाणात झुकल्याचे दिसले.

अर्थात, यापूर्वीही प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी यांना सेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे यंदाही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास ठाकरे यांना काही अडचण वाटली नाही. महत्वाचे म्हणजे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेनेचेच खासदार आग्रही होते. शिवसेनेचा आजवरचा कल पाहता पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेत असते. निर्णय घेण्यासाठी पक्षातीलच कुणी त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. परंतु, खासदारांनी दबावतंत्राचा वापर करीत मुर्मू यांना पाठिंबा देण्यास भाग पाडले. यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले असे मुळीच म्हणता येणार नाही. किंबहुना, यामुळे शिंदे गटासोबतच भाजपबरोबर दिलजमाईची मालिकाच जणू सुृरू झाली. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील निर्णय घ्यावे तर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा गाडा हाकावा असे मतही खासदारांनी व्यक्त केले आहे. म्हणजे काय, तर शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांना मनापासून मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. शिंदेंनी केलेल्या बंडाला अथवा उठावाला त्यांचे मूक समर्थन आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. दुसरीकडे दीपाली सैयद यांनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेटही मनोमिलनाचे संकेत देत आहे.

- Advertisement -

शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडत होते. यामध्ये दीपाली सय्यद या अग्रभागी होत्या. शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिऊन सत्तेत गेलात का?, असा खडा सवाल विचारुन बंडखोरांवर सैयद तुटून पडल्या होत्या. त्याच सैयद आज दिलजमाईसाठी मध्यस्थाची भूमिका वठवताना दिसत आहेत. शिंदे गटाशी कधीही जुळवून घ्यायचे नाही, असा पन जर उद्धव ठाकरे यांनी केला असता तर दीपाली सैयद यांनी शिंदेंना भेटण्याचे धारिष्ठ्य दाखवलेच नसते. ही केवळ सदिच्छा भेट नव्हती तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये समेट व्हावा, म्हणून आपण भेट घेतल्याचे सैयद यांनीच स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी तसेच उद्धव ठाकरेंनीदेखील एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही सैयद यांनी व्यक्त केली. म्हणजे काय तर एकनाथ शिंदे यांना कायमस्वरुपी ‘जय महाराष्ट्र’ केल्यास त्यातून नुकसान हे शिवसेनेचेच होणार आहेे ही बाब उद्धव ठाकरे यांना चांगलीच अवगत आहे. त्यातूनच सैयद यांना पुढे करुन उद्धव ठाकरे गटाने ‘तहा’च्या दिशेने मार्गक्रमण सुरू केल्याचे स्पष्ट होते.

शिंदे गटाच्या बंडानंतर सर्वसामान्य शिवसैनिक जितका व्याकूळ झाला, तितके नेतेमंडळी व्याकूळ झालेले दिसले नाहीत. नेत्यांना दु:ख झालेच नाही असेही म्हणता येणार नाही, खासदार, आमदार, नगरसेवक वा जिल्हा परिषद, ग्रामपालिकेच्या सदस्यांपर्यंत सर्वच हळहळले. अशा घडामोडींतून पक्षाचे नुकसान होत आहे, याची चिंता सर्वांनाच वाटत आहे. परंतु या घडामोडी घडण्यामागे आपला नेताही कारणीभूत असल्याची अंतरिक जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळेच सद्य:स्थितीचा जर कानोसा घेतला तर नेते अथवा लोकप्रतिनिधींमधून शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन करणार्‍या गानगप्पा वाढल्या आहेत. त्यासाठी ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’ समजून घ्यायला हवी. मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजप आणि शिवसेनेने युती करुन लढवल्या. त्यामुळे जेथे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तेथे त्याच्या विजयात भाजपचा ५० टक्के वाटा होता. भाजपचा विजय झाला तेथे शिवसेनेचाही तितकाच वाटा होता.

- Advertisement -

म्हणजेच काँग्रेस वा राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत करण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येणे गरजेचे होते. त्यादृष्टीनेच संबंधित उमेदवारांना मतदान झाले. विशेषत: महाराष्ट्रातील मतदार कितीही सुशिक्षित असला तरी तो धर्माच्या प्रती सजग असतो. आपल्या धर्माविरुद्ध कुणी बोलले तर त्याचे रक्त उसळायला लागते. थोडक्यात, हिंदुत्वाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा बनला आहे. या मुद्याशी प्रतारणा करुन जर अन्य पक्षांशी हातमिळवणी केली तर मतदार हे स्वीकारणार नाही याची जाणीव लोकप्रतिनिधींना आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची अडीच वर्षातील दबंगगिरी बघता आपण सत्तेत आहोत की नाही, असाच प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला होता. अर्थात भाजपबरोबर गेल्यावर हा प्रश्न तातडीने सुटेल याची शाश्वतीही कुणी देऊ शकत नाही. परंतु, समविचारी पक्षासोबत युती करण्याचा फायदा पुढील निवडणुकांमध्ये घेता येईल, असे मत आता प्रत्येकाचेच होत आहे.

महाराष्ट्रात भाजपने आपली पायाभरणी पद्धतशीरपणे केली आहे. त्यात सिंहाचा वाटा हा शिवसेनेचाच आहे हे मान्य करावेच लागेल. परंतु, आज भाजप स्वतंत्ररित्या जरी निवडणुकांना सामोरा गेला तरी त्यातून करिष्मा होऊ शकतो. तशी अवस्था शिवसेनेची नाही. शिवसेनेची ताकद मर्यादित आहे. अनेक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नाहीत. शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींना भाजपच्या मतांचा चांगला टेकू मिळालेला आहे. हा टेकू निघून गेला तर या उमेदवारांची मोठी पंचायत होणार आहे. महापालिकेच्या निवडणुका समोर ठेऊन विचार केला तर शिवसेना-भाजप एकत्र आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोठे हाल होतील. विशेषत: मुंबई महापालिकेत शिवसेनेचा वरचष्मा युतीतून कायम राहू शकतो. अन्य महापालिकांमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना एकमेकांच्या धोरणांची मोठी मदत मिळू शकते. त्यातून विजयाचे गणित अधिक सुकर होईल अशी अनेकांची इच्छा आहे. या इच्छेतूनच आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाची दिलजमाई करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांना यश मिळण्याचीच दाट शक्यता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींवरुन दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -