घर संपादकीय अग्रलेख हरी नरके पुन्हा होणे नाही!

हरी नरके पुन्हा होणे नाही!

Subscribe

महात्मा फुले आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक चालते बोलते विद्यापीठ महाराष्ट्रातून हरपले आहे. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडवून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा होता. लेखनाबरोबर उत्तम वक्तृत्व असल्यामुळे नरके गेली किमान तीन दशके महाराष्ट्रभर फिरत राहिले आणि समाजसुधारकांचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत राहिले. फुले-आंबेडकर या द्वयीचे विचारधन संकलित करून त्याबद्दलचा एक कोश सिद्ध करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रमाने साधने गोळा करायलाही सुरुवात केली होती.

हे काम प्रचंड आहे, याची कल्पना असल्याने, त्यासाठी मिळेल तेथून साधने जमा करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. डॉ. आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील ६ खंडांचे संपादन प्रा. हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांच्या संबंधात जेव्हा एक अतिशय कुत्सित लेख प्रसिद्ध झाला होता, तेव्हा पुराव्यांचा ढीग उभे करून तीक्ष्ण युक्तिवादाद्वारे त्या लेखाच्या चिंधड्या उडवणारे लेखन त्यांनी केले होते. ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा’, या दोन पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी फुलेंच्या इतिहासाला जिवंत ठेवले. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानांचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. हिंदी, मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे ३७ ग्रंथ प्रकाशित झाले होते. ६० विद्यापाठातील चर्चांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. विविध वर्तमानपत्रे, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून १०० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.

- Advertisement -

अभ्यासाच्या या महत्त्वाच्या विषयांबरोबरच मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मराठी ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या भाषांप्रमाणेच अभिजात असल्याचे संशोधन करण्यासाठी रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे ते समन्वयक होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यदेखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्षदेखील होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली हे बघणेही महत्वाचे आहे. खरे तर हरी नरके यांचा जन्म उसतोडणी कामगारांच्या कुटुंबामध्ये झाला. पुण्याजवळच्या हडपसरमध्ये ते मजुरीसाठी गेले आणि सलग काम मिळत गेल्याने तिथेच स्थिरावले. हरी लहान असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्या काळात हरी पारशी समाजाच्या कब्रस्तानामधे काम करत होते. तेथील संगमरवरी कबरी धुणे परिसराची झाडलोट करणे आणि झाडांची निगा राखणे असे त्या कामाचे स्वरूप होते. त्यांची वाचनाची सुुरुवात तिथून झाली.

त्यांना खेळण्यासाठी सवंगडी नव्हते, त्यामुळे कब्रस्तानातल्या त्या स्मशान शांततेत ते वाचत बसत. त्यांच्या शाळेच्या शेजारी राष्ट्र सेवादलाची शाखा भरत असे. तेथे हरी नरकेंची भेट डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट या मंडळींशी झाली. नाथमाधव किंवा हरी नारायण आपट्यांच्या पुस्तकांत ते रमलेले असताना, नकळतपणे सामाजिक विषयांवरच्या वाचनाकडे ओढले गेले. या काळात फुले-आंबेडकर आणि इतर परिवर्तनवादी साहित्य ते वाचू लागले होते. त्याच वेळेला पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते जयवंत दळवी आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांचं वाचनही त्यांनी केले. वाचनाच्या या टप्प्यावर त्यांची भेट ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांच्याशी झाली. ती भेट मौल्यवान ठरली. हरी नरकेंच्या वाचनाच्या आणि विचार करण्याच्या प्रवासाचे गं. बा. सरदार हेे मार्गदर्शक बनले. ललित आणि वैचारिक वाचनाचा समतोल साधायला त्यांनी शिकवले. हा समतोल यांना लिखाणाच्या पुढील वाटचालीत उपयोगी पडला. नरके यांनी जरी विविध प्रकारचे लिखाण केले असले तरी त्यांनी लहानपणापासून जे भोगले आणि ज्या समाजाच्या स्तरातून ते आले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडत गेले.

- Advertisement -

कोरेगाव पार्कमधे आचार्य रजनीशांच्या आश्रमात दूध पोहचवण्याचे काम हरी नरकेंकडे होते. तेथे दूध दिल्यानंतर रजनीशांची भाषणे ऐकायला ते थांबत. त्यांची विषयाची मांडणी, त्यात दिलेले संदर्भ, भाषाशैली, उदाहरणे आणि त्या सगळ्यांचा श्रोत्यांवर होणारा परिणाम हे फार विलक्षण होते. त्यावेळी हरी नरके यांनी रजनीशांची सुमारे दोनशे तरी भाषणे ऐकली होती. रजनीशांप्रमाणेच नरहर कुरुंदकर यांचाही प्रभाव त्यांच्या भाषणांवर होता. हरी नववीत असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, यासाठी मुंबईत झालेल्या सत्याग्रहामधे ते सहभागी झाले. यावेळी इतरांबरोबर नरकेंनाही तीन आठवडे तुरुंगवास घडला. ते तीन आठवडे म्हणजे त्यांचा माणूस म्हणून घडणीचा महत्वाचा काळ ठरला. त्या काळात शरद पाटील, रावसाहेब कसबे, बाबूराव बागूल, ग. प्र. प्रधान यांच्यापासून डॉ. कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचटांपर्यंत अनेकांचा सहवास लाभला. त्यानंतर हरी नरके यांनी आपल्या अभ्यासूवृत्ती, बुद्धिचातुर्य आणि भाषण कौशल्याच्या जोरावर भल्याभल्यांची तोंडं बंद केली, पण या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे तोंड कायमचे बंद केले ते सडलेल्या वैद्यकीय व्यवस्थेने. हरी नरके पुन्हा होणे नाही, इतकेच.

- Advertisment -