गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत असलेला वसईकर पाण्याच्या राजकारणापायी अद्यापही तहानलेलाच आहे. वसईतील निवडणुका पाण्याच्या मुद्यावरच लढल्या जातात. स्थानिक सत्ताधार्यांना त्याचा नेहमीच फायदा होत असतो. पालघर जिल्ह्यातील राजकारणाचा वसई-विरार प्रमुख केंद्रबिंदू आहे. सूर्याचं पाणी वसईच्या वेशीवर येऊन थांबलं आहे. त्याचं श्रेय घेण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण करण्याचा राज्य सरकारचा हट्ट असल्याने वसईकर पाण्यापासून वंचित राहिला आहे.
राज्यकर्तेदेखील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाण्याचं राजकारण करू लागल्याची सर्वसामान्य वसईकरांची भावना झाली आहे. गेली अनेक वर्षे वसईकरांची तहान भागवण्यात स्थानिक सत्ताधारी आणि राज्यकर्त्यांना यश आलेलं नाही. मुंबईच्या वेशीवरच असल्याने झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाने वसईतील नागरी समस्या दिवसागणिक गंभीर बनत चालल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना राबवल्या जात असल्या तरी लोकसंख्येच्या मानाने पाणी कमीच पडत आहे. नव्वदच्या दशकापासून पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष आहे तसाच सुरू आहे
. फरक इतकाच की आता पूर्वीप्रमाणे शहरी विरुद्ध पश्चिम वसई असा होणारा संघर्ष बंद झाला आहे. बाराही महिने पाणीटंचाई असल्याने टँकर लॉबीला सुगीचे दिवस आले आहेत. नवनव्या नागरी वसाहती आजही टँकरच्याच पाण्यावर अवलंबून आहेत. अस्वच्छ आणि दूषित पाणी पुरवठा करून दरवर्षी कोट्यवधी रुपये टँकर लॉबी सहजपणे कमावत आहे. टँकर लॉबीवर कुणाचाही अंकुश नाही. विविध राजकीय पक्षांचे नेते टँकर लॉबीत आहेत. पाण्याची निकड असल्याने टँकर लॉबीविरोधात कुणी बोलत नाही. म्हणून विविध पाणी पुरवठा योजनांतून मिळणारे पाणी हाच एकमेव पर्याय आहे.
सध्या वसई-विरार परिसराची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात पोहचली असून १४२ एमएलडी पाण्याची तूट आहे. एमएमआरडीएच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरारला १८२ एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे वसईकरांना दिलासा मिळणार आहे. जून अखेरपासून यातील ७० ते ८० एमएलडी पाणी पुरवठा केला जाईल, असे एमएमआरडीएने सांगितले होते, पण नोव्हेंबर महिन्याचे १३ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.
वसई-विरार महापालिकेने पाणी पुरवठा सुरू व्हावा यासाठी आतापर्यंत एमएमआरडीएला किमान चार ते पाच पत्रे पाठवून विनंती केली आहे. महापालिकेने पाणी पुरवठा करण्यासाठीची एमएमआरडीएने सुचवलेली सर्व कामे जून महिन्यातच पूर्ण केली आहेत. तरीही एमएमआरडीएकडून पाणी पुरवठा केला जात नसल्याने वसईत पाण्याचं राजकारण तापलं आहे. खासदार राजेंद्र गावित मुख्यमंत्री शिंदे गटासोबत आहेत, पण त्यांनाही वसई -विरारमध्ये पाण्यासाठी निघालेल्या मोर्चात सहभागी होण्याची वेळ येत आहे.
आता तर त्यांनी पाण्याचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राजेंद्र गावित यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूर्या योजना लोकार्पण करून पाणी पुरवठा सुरू होईल, असे सांगितले होते. मोदींच्या लोकार्पणाचे दोन मुहूर्त टळून दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्याने खासदार राजेंद्र गावित हेही वसईकरांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. शनिवारी त्यांनी आगरी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सोडवण्यात मध्यस्थी केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिल्याचे सांगितलं असलं तरी सोमवार उलटून गेला तरी अद्याप पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांचीही कोंडी होताना दिसत आहे. हतबल झालेले खासदार गावित पाणी कधी सुरू होणार याची शाश्वती देऊ शकत नाहीत.
जूनअखेरीस पाणी पुरवठा सुरू झाला नाही. तेव्हापासून वसईतील विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने थेट एमएमआरडीएवरच मोर्चा काढला होता. खासदार राजेंद्र गावित यांचा सहभाग असलेले किमान दोन-तीन मोर्चे निघाले होते. मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे या विरारमध्ये २७ ऑक्टोबरला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पाच दिवसात पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर मनसेचे पदाधिकारी पाणी पुरवठा सुरू करतील, असा इशारा देत आयुष्यातील पहिला गुन्हा अंगावर घेण्यासाठी आपण स्वतः यावेळी येऊ, असेही सांगितले होते. या मोर्चानंतर राज ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांशी संपर्क साधून माहितीही घेतली होती.
पाच दिवसांचे १५ दिवस झाल्यानंतरही मनसेने पाणी पुरवठा सुरू करण्याचे धाडस दाखवले नाही. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनीही पाण्यासाठी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. वसईतील राजकीय इतिहास पाहता पाणी प्रश्नावरच सर्व निवडणुका लढल्या गेल्या आहेत. त्यात अर्थात हितेंद्र ठाकूर यांनीच बाजी मारलेली आहे. पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात हितेंद्र ठाकूरांना यश मिळालं नसलं तरी पाणी प्रश्नावर निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांना अवगत झालेलं आहे. पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करून वसईत राजकीय पाया मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांची वेळच ठरत नसल्याने वसईकरांवर कुणी पाणी देता का पाणी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.