अलीकडच्या काळात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात महात्मा गांधीजींची अवहेलना, विटंबना करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. २ वर्षांपूर्वी चंपारण्य येथील गांधीजींचा पुतळा माथेफिरूने उखडून टाकला होता. त्यानंतर आता गांधीजींचे विचार, वारसा, स्मृती जतन करण्यासोबतच देशभर पोहचवण्याचे काम करणार्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील सर्व सेवा संघ आणि गांधी विद्या संस्थानच्या इमारतींवर बुलडोझर फिरवण्यात आला. या ऐतिहासिक वास्तूचा सरकारकडून विनाश सुरू असताना देशभरातून गांधीवादी विचारधारा मानणारे वगळल्यास केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारही मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून आले. ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर दीड महिन्यांनी गांधीजींचा वारसा जतन करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी वाराणसीच्या गोल घर मोहल्ल्यात सर्व सेवा संघाचे कार्यालय सुरू करण्यात आले होते.
ही जागा कमी पडू लागल्याने वाराणसीच्या राजघाटावर गंगा-यमुना संगमाजवळ रेल्वेची पडीक १३ एकर जागा सर्व सेवा संघाने रेल्वेकडून रितसर खरेदी केली होती. जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांच्या सहकार्याने हा व्यवहार पूर्ण केला होता. सर्व सेवा संघ प्रकाशन केंद्र, पोस्ट ऑफिस, विनोबा कुटी, गांधी विद्या संस्थानच्या माध्यमातून हा परिसर गांधी विचाराचे केंद्र बनले होते. बैठका, चर्चा, शिबिरे, अभ्यासिका यासह संशोधकांसाठी गांधी विचाराचे ही वास्तू केंद्र बनली होती. या केंद्रात विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांचे साहित्य, ग्रंथ उपलब्ध आहेत. सर्व सेवा संघ प्रकाशन संस्थेची देशभरातील ६३ मोठ्या रेल्वे स्टेशनवर सर्वोदय बुक स्टॉल्स आहेत. त्या स्टॉल्सवर गांधी विचाराचे साहित्य, ग्रंथ विकले जातात.
याच वास्तूवर आता सरकारने घाला घातला आहे. रेल्वे प्रशासनाने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत जोरजबरदस्तीने त्यावर कब्जा मिळवण्यास सुरुवात केली आहे. सर्व सेवा संघ वाचवण्यासाठी मे महिन्यापासून वाराणसीत आंदोलन सुरू आहे. गांधी विचारधारा मानणारे देशभरातील नेते, कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत. त्याठिकाणी शांततामय आंदोलन केले गेले, पण प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून आंदोलनच चिरडून टाकण्याचे काम केले. सर्व सेवा संघाच्या परिसरातून जबरदस्तीने घुसून गांधी विद्या संस्थानच्या खोल्या, लायब्ररी आणि संचालकांच्या कार्यालयाची कुलुपे तोडण्यात आली. त्या वास्तू केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंदिरा गांधी कला केंद्राच्या ताब्यात देण्यात आल्या.
सरकारी दडपशाहीच्या विरोधात देशभरातील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी ८ ऑगस्टपासून वाराणसीत आंदोलन सुरू केले. सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी त्यात सहभागी झाली होती. १० ऑगस्टला वरुणा घाटावर प्रचंड मोठी जनसभा झाली. आंदोलनाच्या वाढत्या रेट्याने प्रशासन अधिकच बिथरले आणि त्यांनी १२ ऑगस्टला सकाळी ७ वाजताच पोलीस फौजफाटा, बुलडोझरसह सर्व सेवा संघ परिसरात घुसून एकेक इमारत जमीनदोस्त केली. स्थानिक कोर्टापासून ते थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही दिलासा मिळाला नाही. सर्व सेवा संघाची ही जागा वाराणसीच्या नमो घाटाला लागून आहे. गेल्या काही वर्षांपासून गांधीजींचा एकेक वारसा मिटवण्याचे काम सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
सर्व सेवा संघाची जागा ताब्यात घेण्याआधी गांधीजींनी स्थापन केलेली काशी विद्यापीठ ही संस्था सरकारने ताब्यात घेतली आहे. अहमदाबाद येथील गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेले गुजरात विद्यापीठ गुजरात सरकारने ताब्यात घेतलेले आहे. गांधीजींच्या साबरमती आश्रमाचा परिसरही सरकारने ताब्यात घेतला आहे. या जागा ताब्यात घेऊन सरकार त्याठिकाणी पर्यटनस्थळे विकसित करून गांधीजींचे विचारच नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. २ वर्षांपूर्वी चंपारण्य येथील महात्मा गांधींजींचा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला. गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह चंपारण्य येथून सुरू केला होता. तिथूनच इंग्रज शासनाविरोधात रान उठले होते. अहिंसक मार्गाने देशाने इंग्रजांना जेरीस आणले होते. त्याच चंपारण्यात असलेला गांधीजींचा पुतळा उद्ध्वस्त झाल्यानंतरही देशात संतापाची लाट उसळली नाही.
गेल्या महिन्यात आपल्या अजब तर्कटांसाठी प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाई करू, असे जरूर सांगितले, पण पुढे त्यांनी संभाजी भिडे गुरुजी आमच्यासाठी आदर्श आहेत, असेही सांगितले. महात्मा गांधीजींचा वारंवार अवमान आणि नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचे काम महाराष्ट्रात सध्या अगदी पद्धतशीरपणे सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्रात थोरामोठ्यांचा वारंवार अवमान केला जात आहे. त्यावेळी महाराष्ट्र पेटून उठलेला पहावयास मिळाला आहे. त्याच महाराष्ट्रात महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीतील मोठी आंदोलने केली. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, असे स्वत: महात्मा गांधीजींनी म्हटले होते, त्या महाराष्ट्रातच महात्मा गांधीजींचा आता वेळोवेळी अवमान होत आहे, पण गांधीजींच्या अवमानानंतर महाराष्ट्र पेटून उठत नाही, हे वास्तव आहे. गांधीजींचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू असला तरी गांधी विचार अजरामर असल्याने किती पुतळे तोडले, संस्था उद्ध्वस्त केल्या तरी गांधी कधी मरणार नाही.