घरसंपादकीयअग्रलेखआघाडीत समावेश की पुन्हा वंचितच?

आघाडीत समावेश की पुन्हा वंचितच?

Subscribe

देशात राज्यसभा निवडणुकीकरिता कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशभरातील ५६ राज्यसभा सदस्य निवृत्त होत असून येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यानंतर सुरू होईल ती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी. भाजपने तर ‘अब की बार चार सौ पार’चा नारा दिला आहे. त्या दृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. त्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येमधील भव्य राम मंदिर लोकर्पणाचे श्रेयदेखील भाजपच्या खात्यात गेले आहे, तर दुसरीकडे २०१९ नंतर पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या गप्पा विरोधकांनी सुरू केल्या आहेत.

त्या दृष्टीने विरोधकांनी ‘इंडिया’ ही आघाडीदेखील स्थापन केली आहे, पण लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजायच्या आतच एकेकाने यातून काढता पाय घेतला आहे. ‘कोलांटउडी’बहाद्दर, जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रातील भाजपला धूळ चारण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी सगळ्या मोदी विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यासाठी पहिली बैठक त्यांनी बिहारमध्ये घेतली होती.

- Advertisement -

अशी जय्यत तयारी सुरू असताना अचानक त्यांनी भाजपच्या तंबूत शिरून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसचे जुने विरोधक असलेले तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी हे इंडिया आघाडीतून बाहेर पडतील हे अपेक्षितच होते. त्यामुळे दोघांनी ‘स्वबळा’चा दिलेला नारा हा कोणालाही अचंबित करणारा नव्हता, पण आता प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेला जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा ही आघाडी राहते का? राहिलीच तर या आघाडीत नक्की किती पक्ष असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी टिकेल न टिकेल, पण महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन वर्षांतील फुटाफुटीचे, फोडाफोडीचे राजकारण पाहता आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवेल असेच चित्र आहे. महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत, पण आता त्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांच्या आघाडीची साथ सोडत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जाणारा नितीश कुमार यांचा जदयु महाराष्ट्रात मात्र भाजपविरोधात लढणार आहे. अशावेळी प्रचाराच्या वेळी महाराष्ट्रात येणार्‍या जदयुच्या ‘स्टार प्रचारकां’चे नमके काय होणार? आम आदमी पार्टीचे शिवसेना ठाकरे गटाशी चांगले सूत जुळले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला आपची साथ मिळेलच. शिवाय महाराष्ट्राचा विचार करता शेकाप आणि सपा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ आहेतच.

फक्त प्रश्न आहे तो प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा. या पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रकाश आंबेडकर यांनी मात्र बुधवारी याचा इन्कार केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष असल्याने त्यांनी दिलेल्या मंजुरीला आक्षेप नाही, मात्र वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याच्या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही आहे.

पण असे निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच बाळासाहेब थोरात यांना देण्यात आल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला मिळालेल्या पत्रावर या दोघांच्याही स्वाक्षर्‍या नाहीत. कोणताही गैरसमज राहू नये यासाठी या पत्रावर या दोघांच्या स्वाक्षर्‍या किंवा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्वाक्षरी केली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत, पण मतविभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादीने वंचित आघाडीला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीच अडचणीची ठरली आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला कायम भाजपची ‘बी’ टीम म्हणून हिणवले आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर ही टीका अधिकच तीव्र झाली होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरही प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली होती. २०१९च्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे सुमारे १५ उमेदवार, तर विधानसभा निवडणुकीत ३२ उमेदवार पराभूत झाले.

आताही घोडे अडले आहे ते काँग्रेसच्या पत्रावर. शिवाय केंद्रातील भाजपला हरवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने कोणताही अहंम बाळगणार नाही, असे सांगणार्‍या वंचितने महाविकास आघाडीसमोर आणखी काही अटी ठेवल्या आहेत. त्यांना प्रामुख्याने प्रत्येक पक्षाचा काय अजेंडा आहे? तूर्तास जागावाटपाचे सूत्र काय आहे? किमान समान कार्यक्रम काय असेल हे जाणून घ्यायचे आहे. २ फेब्रुवारीला होणार्‍या महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबतच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकर यांचा भर असेल. कारण वंचितला नाममात्र सहभाग नकोय. एकूणच वंचितच्या दिव्याच्या प्रकाशात महाविकास आघाडीच्या विजयाची वाट उजळण्याची शक्यता असली तरी काँग्रेस त्यात ‘तेल’ कोणते ओतणार यावर सर्व अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -