घरसंपादकीयअग्रलेखविश्व चषकात ‘जय हो’

विश्व चषकात ‘जय हो’

Subscribe

बारा वर्षांनंतर भारताला विश्वचषक जिंकण्याची संधी आली आहे. न्यूझीलंडला नमवून भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला; शिवाय अनेक विक्रमही या स्पर्धेत आपल्या नावाने नोंदवले. यंदाच्या स्पर्धेत भारताची कामगिरी बघता संघभावनेचाच आजवर विजय झाल्याचे लक्षात येते. भारतीय संघात सध्या जो ताळमेळ आहे आणि जे खेळीमेळीचे वातावरण आहे तेच विजयाकडे प्रस्थान करण्याचे मुख्य कारण ठरत आहे. अर्थात याचे श्रेय जाते कर्णधार रोहित शर्माला. फलंदाजीत तो आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडताना दिसतो. सुरुवात जोरदार करून दिली जात असल्यामुळे पुढच्या फलंदाजांवर अतिरिक्त ताण येत नाही. परिणामी सगळेच मोकळेपणाने आपला नैसर्गिक खेळ खेळू शकतात.

शिवाय फिल्डिंगमध्ये आणि गोलंदाजांमध्ये परिस्थितीनुसार केले जाणारे बदल रोहितच्या नेतृत्वगुणाला अधिक अधोरेखित करतात. भेदक गोलंदाजी हेदेखील भारताचे बलस्थान ठरत आहे. प्रत्येक सामन्यात वेगवेगळा गोलंदाज हिरो ठरतो. कधी हिरो असतो जसप्रीत बुमराह, कधी मोहम्मद सिराज, कधी मोहम्मद शमी तर कधी रवींद्र जडेजा. इतकेच नाही तर रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासारखे कामचलाऊ गोलंदाजही प्रभावी ठरतात. यात प्रामुख्याने मोहम्मद शमीची कामगिरी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. २०१५ हे वर्ष शमीसाठी सर्वात कठीण होते. ऑस्ट्रेलियातील विश्व चषकादरम्यान दुखापत झाल्यानंतर शमीला जवळपास १८ महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले.

- Advertisement -

त्यानंतर त्याच्या पत्नीने मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. इतकेच नाही तर त्याच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले होते. इतक्या मोठ्या खेळाडूवर राष्ट्रद्रोहाचा आरोप होणे ही बाब साधी नव्हती. बीसीसीआयने या सर्व आरोपांची चौकशी केली. तोपर्यंत शमीचा खेळ थांबवण्यात आला. चौकशीत काही आढळले नाही, तेव्हा त्याला खेळण्यास संधी देण्यात आली. इतक्या मोठ्या संकटावर मात करत हा खेळाडू नव्या दमाने पुढे आला. भरपूर सराव केला. कोविडच्या काळात काहीसा खचला. आत्महत्येचेही विचार त्याच्या डोक्यात डोकावून गेले, पण त्याच्या सहकार्‍यांनी त्याला सावरले आणि त्यानंतर शमीने स्वत:ला असे तयार केले की काही काळातच तो विश्वातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक झाला. अर्थात विश्वचषकासाठी त्याची निवड झाली असली तरी सुरुवातीला त्याला संघाबाहेरच ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही.

हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने करून दाखवले. आलेल्या संकटांवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शमीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवले. त्याचा हा प्रवास केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरावा. शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे भारत आज अंतिम सामन्यापर्यंत पोहचला आहे. आजवर विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताला ज्या- ज्या संघांनी पराभूत केले होते, त्या-त्या संघांना धूळ चारत भारताने बदला घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे आजवर प्रत्येक संघ कोणत्या ना कोणत्या सामन्यात पूर्णत: डगमगताना दिसला, परंतु भारताच्या कामगिरीत मात्र सातत्य आहे.

- Advertisement -

एकाही सामन्यात भारताने नांग्या गाळल्या नाहीत. दहाच्या दहा सामने जिंकून भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात सहाजिकच भारताचे पारडे जड आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत भारत अग्रेसर असल्याने यंदा विश्वचषकावर हक्क सांगणार्‍या संघांमध्ये भारताचे नाव सर्वात वरच्या स्थानावर दिसत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद सिराजची न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पिसे काढली. याच सामन्यात रोहित शर्माला मार्गदर्शन करताना फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन दिसला. त्यामुळे सिराजच्या जागेवर अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडिया परिपूर्ण होईल, परंतु अतिआत्मविश्वासही घातक ठरू शकतो. त्यामुळे भारतीय संघाला कुठलेही दडपण न घेता अंतिम सामन्याला सामोरे जावे लागेल.

भारताने विजयी घोडदौड सुरू ठेवल्यास बारा वर्षांनंतर हा सोन्याचा दिवस बघायला मिळेल. यापूर्वी २०११ मध्ये भारताने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यानंतर आता ही संधी चालून आली आहे. तत्पूर्वी १९८३ ला कपिल देवच्या कर्णधारपदाच्या काळात पहिला विश्वचषक भारताने मिळवला होता, परंतु त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळी भारताचा संघ अतिशय बिकट परिस्थितीतून वाटचाल करत होता. संघाकडे पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा मिळणेही त्याकाळी कठीण होते. आज मात्र जगातील सर्वात श्रीमंत संघांपैकी भारतीय संघ एक आहे. सर्व अद्ययावत सोयीसुविधा आहेत.

खेळाडूंचा फिटनेसही उत्तम आहे. त्यामुळे जिंकण्याची संधी अधिक आहे. अंतिम सामना बघण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. हा सामना मुंबईतून गुजरातला पळवण्यात त्यांना यापूर्वीच यश आले आहे. त्यात जर भारताने विश्वचषक जिंकला तर या विजयाचे रूपांतर राष्ट्रीय उत्सवात होण्याची दाट शक्यता आहे. आली वेळ तर आनंद व्यक्त करण्यासाठी एक दिवस सुट्टीदेखील जाहीर केली जाईल. चांद्रयानाप्रमाणेच विश्वचषकाच्या विजयातदेखील भाजपचाच हात आहे, असे भासवण्यात ही मंडळी मागेपुढे पाहणार नाही हे निश्चित!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -