कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या…
ध्येय आणि सद्यस्थितीतील तफावतीमुळे ओढाताण होणार्या जीवाचे अचूक वर्णन करणारी कविवर्य भा.रा.तांबे यांची ही रचना शिंदे गटातील अवस्थ आमदारांच्या मन:स्थितीचा नेमकेपणाने ठाव घेणारी ठरावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून आपल्याच पक्षातील मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हायला लावले आणि भाजपसोबत मिळून सत्तेचे नवे समीकरण रचले. भाजपसोबत सत्ता स्थापन करताना पहिल्या फळीतील आमदारांना काही आश्वासने देण्यात आली होती. त्यामध्ये मंत्री पद मिळणार हे प्रमुख वचन होते. परंतु सत्तास्थापनेला वर्ष उलटून गेले. मुहूर्तांमागे मुहूर्त निघून गेले तरी हा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अशा अस्वस्थ मनाची कैफीयत शिंदे गटातील आमदार भरत गोगावले अधूनमधून मांडत आपले मन हलके करत असतात. नर्मविनोदी शैलीतून कैफीयत मांडताना भरत गोगावले कधी आपल्या संयमाची उदाहरणे देत उपस्थितांना लोटपोट करतात, तर कधी लपलेली रहस्ये उघड करून सहकार्यांसह पक्ष नेतृत्वाचीही कोंडी करून टाकतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट २ जुलै रोजी भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमधली अस्वस्थता उघड झाली, परंतु महिना उलटला तरी शिंदे गटातील आमदारांची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नाही. हे कमी होते की काय म्हणून अर्थ खात्यासह महत्वाची खातीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशा वावड्या उठलेल्या असताना भाजपमधील अनेक इच्छुकांच्या आशादेखील पल्लवित झाल्या होत्या. पण, राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यात अधिवेशन कधी उलटून गेले हेदेखील कळले नाही. मंत्रिपद नाही, पालकमंत्रीपद नाही, गेला बाजार महामंडळ तरी हाती लागेल, अशी अपेक्षा होती. तर तीदेखील शक्यता दूर दूरवर दिसत नाही.
अशा परिस्थितीत शिंदे गटातील आमदारांची नाराजी शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. अचानक सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने शिंदे गटातील आमदारांच्या अपेक्षांना सुरूंग लागला आहे. नव्या सत्ता समीकरणांनुसार शिंदे गटाच्या वाट्याला आणखी जेमतेम ३ ते ४ मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. जिथे अर्धी भाकरी मिळणार होती, तिथे चतकोर भाकरी ताटात येणार असल्याने ती आपल्यालाच मिळावी म्हणून शिंदे गटातील आमदारांतच झुंज सुरू झाली आहे. गेले वर्षभर ज्यांनी मंत्रिपद उपभोगले, त्यांना हटवून आता आम्हाला संधी द्या, अशी जाहीर मागणी काही आमदारांनी केली होती, त्यातूनच मंत्रिपदावर दावा करणार्या २ आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की उभयंतांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची माहितीही सूत्रांमार्फत बाहेर आली. त्यामुळे नागपूर दौर्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना तडकाफडकी मुंबई गाठून परिस्थिती सावरावी लागली.
परवाच अलिबागच्या खानाव येथील जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांच्यासह सरपंच आणि इतर नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भरत गोगावले यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. माझे नाव मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत होते. परंतु आमचे मुख्यमंत्री आम्हाला अडचणीत सापडलेले दिसले. म्हणून मी मंत्रिपदापासून माघार घेतली. पण काय झाले? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन. एकाला फोन करून विचारले काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदे दिली. आम्ही तीनपैकी एकही मंत्रीपद घेत नाही. आम्ही थांबतो. पण, तुला एवढी घाई कशाला? आता बायको आत्महत्या करते बोलल्यावर काय करायचे? त्याची बायको तर वाचवायला हवी. म्हणून मी एकनाथ शिंदेंना म्हटले त्याला देऊन टाका. दुसर्याला नारायण राणेंनी संपवायला नको. आपली एक सीट कमी होईल. म्हणून म्हटले त्यालाही द्या. मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तो आजपर्यंत थांबलो, असा किस्सा भरत गोगावले यांनी सांगिताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
रायगडमध्ये शिवसेनेचे ३ आमदार असूनही ना मंत्रिपद ना पालकमंत्रीपद याचे त्यांना शल्य आहे. त्यातूनच आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा टोलाही गोगावले यांनी यावेळी लगावला. गोगावले हे एक टोक तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे दुसरे टोक. त्यांनी तर स्वत:चीच समजूत काढून मंत्रिपदावर पाणी सोडले आहे. छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद घेणार नाही, ही त्यांची भूमिका. काही का असेना भरत गोगावलेंच्या या वक्त्यव्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा नवा मुहूर्तदेखील मिळाला. याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल. एकूणच काय तर शिंदे गटातील इतर आमदारांचीही अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी असली, तरी भरत गोगावले मात्र आलीया भोगासी असावे सादर या म्हणीनुसार आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवताना दिसतात. त्यामुळे कधी मंत्रिपदासाठी तर कधी पालकमंत्रीपदासाठी बेछूटपणे विधाने करणारे गोगावले शिंदे गटातील अस्वस्थ आमदारांच्या मांदियाळीतही उठून दिसतात.