घरसंपादकीयअग्रलेखठाकरेशाही समोर शिंदेशाही फिकी

ठाकरेशाही समोर शिंदेशाही फिकी

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा ज्वर आता चढू लागला आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आता जवळपास पंधरा दिवस राहिले आहेत. सात टप्प्यांत ही प्रक्रिया होणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक युती आणि आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जात होता. या लोकसभा निवडणुकीत ही प्रथा बंदच झाली. आता थेट उमेदवारांची यादीच जाहीर केली जाते. त्यानंतरच कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी मिळते, यावरील पडदा उचलला जात आहे.

शिवाय, कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा आल्या, याचा अंदाज काढला जात आहे. गेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने अनुक्रमे २५ आणि २३ जागा लढविल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने २५ आणि १९ जागांवर उमेदवार उतरविले होते. दरम्यानच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. या घडामोडी ‘न भूतो न भविष्यति’ अशाच होत्या.

- Advertisement -

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि खासदारांचा एक गट थेट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला, तर दुसरा गट काँग्रेससमवेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून कायम राहिला. याचा परिणाम म्हणून आतापर्यंत कोणाच्या वाट्याला किती जागा आल्या ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपांच्या चर्चेचे गुर्‍हाळ बराच वेळ सुरू होते, पण एवढे करूनही जागांचे वाटप कसे आहे, हे समोर आलेच नाही.

कारण प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात, असे वाटत आहे. त्यामुळे आता थेट उमेदवारांची घोषणाच केली जात आहे. महायुतीतील भाजपने आतापर्यंत २४, उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ३ जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ८ अशा ३५ जागांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषित ३ जागांपैकी १ जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समता पार्टीला दिली आहे,तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आतापर्यंत २१ उमेदवारांची घोषणा केली आहेत, तर काँग्रेसने १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ५ अशा ३९ जागांची घोषणा केली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील शिवसेनेला २२, काँग्रेसला १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या निवडणुकीचे गणित लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे यावेळी ९ जागा कमी आहेत, मात्र मविआतील अन्य पक्षांचा विचार करता, या पक्षाचे फार नुकसान झाले आहे, असे म्हणता येणार नाही. सद्यस्थितीत या पक्षाकडे तीन खासदार आहेत, मात्र अजित पवार यांच्याकडे सुनील तटकरे हे एकच खासदार आहेत आणि त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

सर्वात मोठी अडचण झाली आहे ती एकनाथ शिंदे यांची. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे २३ उमेदवार रिंगणात होते. महायुतीकडून निवडणूक लढवताना यावेळीदेखील आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, असा आग्रह शिंदे गटाने धरला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातर्फे आतापर्यंत २१ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात त्यांनी विद्यमान ५ खासदारांना पुन्हा संधी देतानाच, गेल्यावेळी पराभूत झालेल्यांवरदेखील पुन्हा विश्वास दाखवला आहे, पण एकनाथ शिंदे यांच्याकडून तसे झालेले नाही. त्यांच्याकडे १३ उमेदवार असतानाही केवळ ७ उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे.

एवढेच नव्हे तर, या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून आलेल्यासाठी रामटेकच्या विद्यमान खासदाराचेच तिकीट त्यांनी कापले. यामुळे उर्वरित विद्यमान ५ खासदारांचे भवितव्यच पणाला लागले आहे. विशेष म्हणजे, ज्या जागांसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत, त्याच जागा त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकीकडे, अजित पवार हे आपला बारामती बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरत असतानाच, एकनाथ शिंदे यांना मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपसाठी सोडावा लागण्याची दाट शक्यता आहे.

अशीच स्थिती ठाणे मतदारसंघाची आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ आपला मुलगा, विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राखून ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शहर अशी ओळख असलेले ठाणे भाजपसाठी सोडावे लागेल, असेच सांगितले जाते. विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे या दोन्ही मतदारसंघांवर विशेष प्रेम होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवरील भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणलेले आहेत, त्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर हे संबंध आणखी चिघळले आहेत.

पालघरमध्येही गेल्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावित यांना भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरविण्याची चर्चा आहे, पण त्यांना स्थानिक पातळीवरच विरोध आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. शिंदे समर्थक खासदार हेमंत गोडसे यांनी या मतदारसंघासाठी कितीही जोरबैठका घेतल्या तरी, इतर मतदारसंघाप्रमाणेच भाजप जो निर्णय घेईल, त्याच्याबाहेर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना जाता येणार नाही. एकूणच महायुतीत दिल्लीतील ‘महाशक्ती’ म्हणेल ती पूर्व दिशा, अशी परिस्थिती आहे, तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तूर्तास तरी ठाकरेशाही समोर शिंदेशाही फिकी पडल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -