घरसंपादकीयअग्रलेखमहाविकास आघाडी थंड!

महाविकास आघाडी थंड!

Subscribe

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन पाच दिवस उलटले. या काळात भाजपने पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली. येत्या दोन दिवसात दुसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही यादी येत्या काही दिवसात जाहीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीत मात्र अजूनही कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची याचीच खलबते सुरू आहेत.

काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे इच्छुक मंडळी संभ्रमात आहेत. दुसरीकडे भाजपचे २० उमेदवार मात्र प्रचारात व्यग्रही झाले आहेत. महाविकासची यादी जाहीर होईपर्यंतचा काळ हा भाजपच्या उमेदवारांना प्रचारासाठी बोनस काळ असेल. या काळात त्यांना प्रचारात आघाडी घेता येईल. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करून भाजप निवडणुकीला सामोरे जात असल्याचे दिसते, मात्र महाविकास आघाडीची मंडळी परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाला लागलेली आहे.

- Advertisement -

वास्तविक गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजप आणि अन्य पक्ष रणनीतीही आखत होते. राम मंदिर असो, कलम ३७० रद्द करणे असो वा नागरिकत्वाच्या कायद्यात सुधारणा करणे असो, निवडणुकीला समोर ठेवून भाजप लोकांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाविकास आघाडीकडून मात्र अद्यापही असे कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो न्याय यात्रा काढली खरी, पण स्थानिक पदाधिकार्‍यांना या यात्रेचे सोने करता आले नाही.

माध्यमांनी दिलेल्या बातम्या वाचून आलेल्या लोकांपलीकडे या यात्रेत फारशी गर्दी दिसली नाही. मुळात अनेक शहरांत स्थानिक पदाधिकार्‍यांनी यात्रेची वातावरणनिर्मितीच केलेली दिसली नाही. ती केली असती तर निवडणुकीत हा पक्ष किमानपक्षी चर्चेत तरी आला असता. यावरून स्थानिक पदाधिकारी भाजपला फितूर झाले की काय, अशीही शंका येते. केवळ भारत जोडो यात्राच नव्हे तर गेल्या वर्षभरात विरोधी पक्षांनी भाषणे आणि पत्रकार परिषदांशिवाय फार काही केले नाही. वास्तविक महागाई, बेरोजगारी, इलेक्शन बॉण्ड, धनदांडग्यांना कर्जमाफी, एकाधिकारशाही, कांदा निर्यातबंदी, शेतकरीविरोधी धोरणे, जुनी पेन्शन योजना, ईडीचा गैरवापर आदी असंख्य मुद्यांना विरोधकांना कवेत घेता आले असते.

- Advertisement -

या मुद्यांच्या अनुषंगाने सातत्याने आंदोलने करीत, रस्त्यावर उतरत भाजपला सळो की पळो करून सोडता आले असते. यानिमित्ताने विरोधकांचा डंका सर्वसामान्य मतदारांपर्यंत वाजला असता, परंतु पुढे निवडणुकीलाही सामोरे जायचे आहे याची विरोधकांना जणू चिंताच नसल्याचे वातावरण काही वर्षांपासून दिसत आहे. पक्ष फुटणे, नेत्यांवर होणार्‍या ईडीच्या कारवाया याशिवायदेखील जनतेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत याचा विसर विरोधकांना पडला. त्यामुळे ते भाजपच्या विरोधात हवे तसे वातावरण तयार करू शकलेले नाहीत. निवडणुका समोर ठेवून आघाडीतील घटक पक्षांच्या कितीतरी बैठका यापूर्वीच होणे गरजेचे होते.

इंडिया आघाडीच्या अशा बैठका झाल्या असल्या तरी महाराष्ट्रात प्रमुख पक्षांच्या संयुक्त बैठका अगदी बोटावर मोजण्याइतक्याच झाल्या. त्यामुळे ऐन निवडणुकीत वंचित आघाडीसारख्या पक्षासोबत बोलाचाली करण्यात महाविकासला वेळ दवडावा लागत आहे. या बोलण्यांना आधीपासूनच सुरुवात झाली असती तर आजवर उमेदवारांची एकतरी यादी जाहीर झाली असती, परंतु आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विरोधकांना खडबडून जाग आल्याने प्रचारासाठीचा अतिशय महत्त्वाच्या असलेल्या काळात बैठकांचे गुर्‍हाळ चालू आहे.

महायुतीत सगळेच आलबेल आहे असे म्हणता येणार नाही, परंतु एकीकडे जागावाटपावरून बैठकांचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी उमेदवार्‍याही जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ज्यांची नावे जाहीर झाली त्यांना मोकळेपणाने प्रचार तरी करता येत आहे, पण महाविकास आघाडीत दररोज वेगवेगळी नावे पुढे येत असल्याने प्रचार सुरू करावा की नाही, असा प्रश्न इच्छुकांसमोर आहे. बर्‍याच मतदारसंघांमध्ये तर उमेदवार दूरच कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सुटणार आहे हेदेखील निश्चित नाही. त्यामुळे तीनही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

त्यातच वंचित आघाडी असो वा एमआयएम या पक्षांसोबतही बोलणी फिस्कटत आहेत. अशा परिस्थितीत उमेदवार ऐनवेळी कुठल्या मानसिकतेत निवडणुकीला सामोरे जाणार? महाराष्ट्रात शिवसेना असो वा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची फोडतोड सर्वसामान्य नागरिकांना रुचलेली नाही. त्यामुळे कुठलेही कर्तृत्व नसताना उद्धव सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहानुभूती मिळत आहे, पण या सहानुभूतीला कॅश करण्याचा काळ महाविकास आघाडी हातचा घालवत आहे. दुसरीकडे चारशे प्लसचा आकडा जाहीर करताना भाजपने निवडणुकीची रणनीती आखली आणि त्यानंतरच ते निवडणुकीला सामोरे गेले.

महाविकास आघाडीत मात्र असे नियोजन दिसत नाही. त्यातच तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये अजिबातच समन्वय नसल्याने वातावरण भाजप विरोधातील असूनही त्याचा फायदा महाविकास आघाडीला घेता येत नाही असे दिसते. अजूनही वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीत सर्वच जागांवरून वाद आहे असेही नाही. असंख्य जागांसाठी महाविकासकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. या उमेदवारांशिवाय महाविकासकडे दुसरा पर्यायदेखील नाही. त्यामुळे किमानपक्षी अशा दमदार नेत्यांना अधिकृतपणे उमेदवारी देऊन भाजपला घाम फोडता येणे शक्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -